दोरीचा आधार

उषःप्रभा पागे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पाचशे रुपयांचे पारितोषिक मिळाल्याचा आम्हाला आनंद झाला. कारण त्यातून आता सह्याद्रीच्या चढाईसाठी दोर घेता येणार होता. 

सह्याद्रीमध्ये मनसोक्त भटकंती सुरू होती तेव्हाची गोष्ट. गड-कोट-किल्ले, घाटवाटा यांच्या इतिहासाचे, सुळके, कडे, भित्ती यांच्या चढाईचे आकर्षण असलेले आम्ही सुटीची वाट पाहत असायचो. पुण्यात असलेल्या मला ठाण्याहून मित्राचा फोन यायचा की, निघायचो. सुट्यांच्या सोयीनुसार भिडू येत-जात राहायचे. असे करता करता आनंदा, दिलीप, शशी, नंदू आणि मी असा चमू तयार झाला. मग भटकंतीमध्ये एक सूत्र ठेवले. प्रत्येकाकडे वेगली कौशल्ये होती.

दूरच्या गडावर संध्याकाळी पोचलो की भन्नाट वाऱ्याने आमच्या घामेजल्या शरीरावर थंडीचे शहारे यायचे, मग आम्ही दोघे-तिघे सुक्‍या काटक्‍या, लाकूडफाटा जमा करायचो. आनंदा चहा-साखरेच्या पुरचुंड्या सोडून चहाची तयारी करायचा, चूल पेटवायचा. तोवर नंदू पाण्याची टाकी शोधून पाणी आणायचा. भातपिठले होईपर्यंत आम्ही रात्रीच्या निवाऱ्यासाठी गुहा, देवळी, चौकी अशा जागा पाहून ठेवायचो, भातपिठले ओरपून झाले की, त्याच पातेल्यात पाणी ओतून मंद आचेवर ठेवले की सकाळी ते पटकन स्वच्छ घासले जायचे की पुन्हा त्यात सकाळचा चहा व्हायचा. कुठलेच काम कुणाला कधी सांगावे लागले नाही. 
आमचा असा घट्ट डोंगरमैत्रीचा चमू जमल्यावर सह्याद्रीतील साहसी चढायांची आमची तहान वाढू लागली. त्यासाठी दोर आणि अन्य सामग्रीची गरज आणि उणीव तीव्रपणे जाणवू लागली.

आम्ही सगळे मध्यम वर्गातले, नोकरदार. साहित्य विकत घ्यायची ऐपत कोणाकडेच नव्हती. एके दिवशी नाशिकचे निवृत्त सेनाधिकारी कप्तान पिसोळकर भेटले. नाशिकच्या ब्रह्मगिरीची डोळस प्रदक्षिणा कमी वेळात पूर्ण करण्याची स्पर्धा त्यांनी ठेवली होती. आमच्या चमूसाठी ही चांगली संधी चालून आली होती. स्पर्धेचे निकष बरेच होते, तुमची पर्यावरणाची जाण, वाटेतल्या ग्रामीण लोकांशी तुमचा संवाद आणि तुमच्यातील संघभावना. हेही विशिष्ट कालमर्यादेत.

दहा-पंधरा गट यात सामील झाले. मला आतून जाणवत होते की, आपला गट ही स्पर्धा जिंकणार. घडलेही तसेच. पाचशे रुपयांचे रोख पारितोषिक आम्हालाच मिळाले. केवढा तरी आनंद झाला आम्हाला. आम्ही लगेच त्यातून चढाईसाठी दोर खरेदी केला, थोडे इतर साहित्य घेतले. मोक्‍याच्या वेळी घेता आलेला तो दोरच आमच्या गिरीप्रेमी संस्थेच्या वाढीचा आधार ठरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article