प्रयागराजचा कुंभमेळा (मुक्तपीठ)

दीप्ती श्रीधर कुलकर्णी
सोमवार, 4 मार्च 2019

प्रयागराजचा कुंभमेळा गर्दीसाठी, तेथील राजेशाही ऐश्‍वर्यासाठी जसा लक्षात राहील, तसा तेथील स्वच्छतेसाठीही.

हिंदी "गीतरामायणा'च्या निमित्ताने कुंभमेळ्याचा योग आला. एरव्ही कुंभमेळ्यात स्वतःहून जाण्याचा धीर केला नसता. कुंभच्या दोन महिने आधी गंगेच्या किनारी नदी ज्या दिशेने वळते, त्याच्या विरुद्ध दिशेला या मेळ्याची छावणी असते. आमची राहायची व्यवस्था स्वामी अवधेशानंद गिरीजींच्या शिबिरात होती. पंचवीस एकरांवर वसलेले मोठे गावच होते ते. एखाद्या चित्रपटातील राजवाड्याचा "सेट' असावा तसे हे शिबिर होते. अत्यंत अद्ययावत.

सगळी व्यवस्था पाहून डोळे दिपून गेले. कुंभमेळ्यात आहोत याचाही क्षणभर विसर पडला. स्वामीजींचे दर्शन झाले. अत्यंत तेजस्वी पुरुष. स्वामी अवधेशानंद गिरी हे सध्या जुना आखाडाचे प्रमुख आचार्य आहेत, त्यामुळे त्यांना शिबिर वसवण्यासाठी मोठा भूखंड मिळाला होता. ते खूपच शिस्तप्रिय आहेत. सर्व भक्त स्वयंसेवक म्हणून काम करतात. त्यांच्या शिबिर उभारणीचा एकूण खर्च तीस कोटी रुपये. सर्व खर्च भक्तांच्या देणग्यांतून झाला आहे. शिबिराची उभारणी केवळ एका महिन्यात पूर्ण झाली. हे केवळ ईश्‍वर कृपेनेच घडू शकते, अशी सर्व भक्तांची भावना.

गंगा-यमुना संगम बघायला जायचे म्हणून शिबिरामधून बाहेर पडलो. संगमाच्या दिशेने आधी गाडीतून आणि नंतर नावेतून असा छोटा प्रवास होता. गाडीतून जाताना बाहेर पाहात होतो. प्रचंड गर्दी असूनही स्वच्छता, शिस्त पाहून थक्क झालो होतो. अत्यंत आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. मनात विचार आला, की आपल्याकडे वारीमध्येही अशीच गर्दी असते; पण स्वच्छता?.... नदीकाठ म्हटल्यावर तर सांगायलाच नको. पण तसेही इथे काहीच नव्हते. भाविक गंगेत स्नान करत होते; पण कुठेही अस्वच्छता नव्हती.

गंगेचे पाणीही स्वच्छ होते! या सगळ्यामधली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही प्लॅस्टिकचा वापर केला नव्हता. रस्त्याच्या बाजूला अन्नाचे, कचऱ्याचे, प्लॅस्टिकचे असे कसलेही ढीग पडले नव्हते. कुठेही दुर्गंधी नाही. गरिबी, अशिक्षितता या गोष्टींचा स्वच्छतेशी काहीही संबंध नसतो, हे इथे अगदी स्वच्छ समजले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article