तारेचा घोळ  (मुक्तपीठ)

शर्मिला सुनील प्रदक्षिणे
सोमवार, 25 मार्च 2019

आपण आपल्याच नादात असतो, पण आपली कोणी वाट पाहात असेल तर... त्याला कधी काळजीत टाकता कामा नये. 

पस्तीस वर्षांपूर्वी आम्ही नेवासा येथे राहात होतो. मी नुकतीच दहावीची आणि बहिणीने बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर निकालाची वाट पाहत जाम कंटाळलो होतो. माझी मावस बहीण मद्रासला (चेन्नई) राहते. आम्हाला सुटीसाठी तिच्याकडे पाठवा, असा धोशा लावला. बाबा वकील, त्यांना मेमध्ये सुटी मिळणार होती; पण तोवर थांबायची आमची तयारी नव्हती. शेवटी बाबांनी नाइलाजाने नगरला जाऊन आमच्या दोघींचे रेल्वेचे तिकीट काढले. आई-बाबांनी आम्हाला रेल्वेच्या डब्यात बसवून दिले.

शेजारच्या बर्थवर "माळवणकर' नावाचे तरुण गृहस्थ होते. ते नगरला टेलिफोन खात्यात नोकरीला होते. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी चेन्नईला चालले होते. बाबांनी त्यांना आमची काळजी घ्यावयास सांगितले. आम्ही बहिणीकडे सुखरूप पोचल्याचे तातडीने कळावे म्हणून बाबांनी आम्हाला तेथून तार करावयास सांगितली होती. तारेचा मजकूरही लिहून दिला होता. आम्ही चेन्नईला अगदी वेळेत सुखरूप पोचलो. आम्हाला घ्यावयास जिजाजी स्टेशनवर आले होते. आम्ही त्यांना लगेचच बाबांचा तार करण्याचा निरोप सांगितला. आई-बाबा आतुरतेने तारेची वाट पाहत असतील असेही सांगितले. त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही "तार' ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेलो.

इकडे नेवाशाला आई-बाबा तारेची वाट बघत होते. तिसऱ्या दिवशीही तार आली नाही तेव्हा दोघांचा धीरच खचला. शेवटी बाबाच चेन्नईला निघाले. रेल्वेत जागा मिळणे मुश्‍कील. तरीही दीड दिवसांचा प्रवास उभ्याने करून बाबांनी सकाळी सहा वाजता बहिणीच्या दारावरची बेल वाजवली. जिजाजींनी दार उघडले तर दारात बाबा. आश्‍चर्यचकित होऊन "तुम्ही असे अचानक न कळवता कसे आलात?' म्हणून ते बाबांना विचारत होते. तेव्हा तार मिळाली नाही म्हणून मुलींना बघण्यासाठी आलो, असे बाबांनी सांगितल्यावर ते खूपच खजील झाले.

आपण स्वतः तार केली नाहीच, पण ज्या मित्राला तार करायला सांगितले होते, त्याच्याकडे पाठपुरावाही केला नाही, याचे जिजाजींना आता वाईट वाटले. तेव्हापासून आम्ही मात्र धडा शिकलो की, आपल्यामुळे दुसऱ्याला काळजीत टाकता कामा नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article