निवांत दुपारी (मुक्तपीठ) 

रोहिणी भागवत
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

डोक्‍यावर फिरत असलेला पंखा अचानक खाली पडला. त्या आवाजाने धस्स झाले. आजही डोक्‍यावर पंखा फिरत असताना मनात अनामिक भीती वाटते. 

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आम्ही तिनसुकीयाला (आसाममध्ये) होतो. तेव्हाचा प्रसंग अजूनही जसाच्या तसा डोळ्यांसमोर दिसतोय. एका निवांत दुपारी मी व सासूबाई जेवत होतो. यांचे जेवण झाल्याने बाहेरच्या हॉलमध्ये आराम करीत होते. मुले शाळेत होती. आमच्या गप्पा सुरू असताना अचानक मोठा आवाज झाला. मी धावतच बाहेरच्या हॉलमध्ये आले व समोरचे दृश्‍य आ वासून पाहतच राहिले. हॉलच्या मधोमध सिलिंग फॅन पडलेला होता. एव्हाना हे पण दचकून उठले होते.

सासूबाई व शेजारीण पण लगेच आल्या. हॉलच्या सिलिंगला रॉडच्या साहाय्याने पंखा लटकलेला होता. बऱ्याच जुन्या काळचे मॉडेल असल्याने वजनाला खपू जड होता. त्याच्या ब्लेडस पण मोठ्या जड होत्या. पंखा वेगात फिरतानाच पडल्याने त्याच्या ब्लेडमुळे तख्ताची लाकडी कपची कापली गेली होती. नशिबाने तख्तावर झोपलेल्या यांना इजा झाली नव्हती. दुसऱ्या दिवशी जड पंख्याचे ते धूड 3-4 माणसांनी उचलून बाजूला केले. 
नेमके त्याच दिवशी त्या वेळेस पंख्याखाली कोणीही बसलेले नव्हते. नाही तर कपाळमोक्षच झाला असता.

मला जास्त उकडत असल्याने बऱ्याच वेळा भाज्या निवडणे, शिवणकाम, भरतकाम इत्यादी कामे पंख्याखाली बसूनच करीत असे. मुलांचे पत्ते, कॅरम, पुस्तक वाचन सर्व हॉलमध्ये पंख्याखालीच असायचे. पाहुणे मंडळी पण तेथेच विराजमान असायची. अशा वेळेस पंखा पडला असता, तर फारच अवघड झाले असते. आमचे व इतरांचेही नशीब बलवत्तर म्हणून ही अप्रिय घटना त्या वेळी घडली नाही. पंख्याच्या ब्लेडस मात्र वेड्यावाकड्या झाल्या होत्या. पण, या व्यतिरिक्त इतर कोणतेच नुकसान झाले नव्हते. खालच्या फरशीला तडा गेला होता. यांचा हात थोडक्‍यात वाचला होता. नाहीतर त्या दिवशी काय घडले असते, याची कल्पनाही करवत नाही. शेवटी देवानेच आम्हाला या प्रसंगातून वाचवले होते. 

अशा रीतीने सिलिंग फॅन सुरू असताना निखळून खाली पडू शकतो, हे कधी लक्षातही आले नव्हते. आताही पंखे सुरू असताना नकळत त्या दिवशीच्या चित्तथरारक प्रसंगाची आठवण येऊन अंगावर काटा येतो. एक निवांत दुपार या भयानक प्रसंगामुळे कायमच मनात राहिली आहे. देवाचे शतशः आभार मानले आणि पुढील कामाला लागले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article on Relax Noon