चालावे समुद्री ! (मुक्तपीठ)

अंजली काळे
सोमवार, 31 डिसेंबर 2018

समुद्रात चालण्याचा अनुभव विलक्षण होता. आत तीन किलोमीटरपर्यंत चालत जात पाण्याखालील सृष्टी निरखता आली. 

सागरी सृष्टी निरखण्यासाठी देशविदेशात समुद्रपर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, पण समुद्रात पायी फिरत पाण्याखालील नजारा पाहण्याची कल्पना काही औरच! गुजरातमधील पिरोटन बेटाच्या "सी-वॉक'ची दुर्मिळ संधी आमचे परममित्र राजीव पंडीत यांच्यामुळे चालून आली. खरे तर या बेटावर जायला बंदी आहे. केवळ अभ्यासक विशेष परवानगीने जाऊ शकत होते.

आता त्यांना जाणेही कठीण झाले आहे. तिथे जाण्याचा प्रवासही काहीसा थरारक होता. आधी बोटीतून एका छोट्या बेटावर जाऊन बोट बदलली नंतर दीड तासाच्या जलप्रवासानंतर. या मोठ्या बोटीतून छोट्या बोटीत जायचे होते, पण ते भर समुद्रात! दोन्ही बोटी जवळ आणल्या. त्या हेलकावत असतानाच अचूक वेळ साधून या बोटीतून त्या बोटीत उडी मारायची होती. धडधड वाढली, पण मारली एकदाची उडी! 

"पिरोटन'ला पोचल्यावर ओहोटी सुरू झाली होती. खाजणात सर्वत्र "पिलुडी'ची झुडपं होती. त्याची फळे खायला गुलाबी मैना व पांढऱ्या गालाचे बुलबुल यांची धांदल चालू होती. येतानाही रोहित, गल्स, टर्नस्‌ यांचे थवेच्या थवे दिसले होते. आम्हाला समुद्रात तीन किलोमीटरपर्यंत जायला परवानगी होती. "सी वॉक' चालू केल्यावर सुरवातीला घोट्यापर्यंत पाणी होते. अत्यंत पारदर्शक! बरोबर चालताबोलता ज्ञानकोष रूपेश बलसारा असल्याने या अनोख्या सृष्टीची डोळस सैर घडली. कॉरल्सचे अक्षरशः असंख्य प्रकार होते. स्पॉंज, ट्यूलिप, स्टार, डायमंड, ब्रेन; तसेच कार्पेट ऍनिमोन, ऑक्‍टोपस, सी हॉर्स, स्टोन क्रॅब्र, स्पायडर क्रॅब, स्टारफिश, पफरफिश यांना प्रत्यक्ष अगदी जवळून पाहताना फारच भारी वाटले. एव्हाना पाणी कमरेपर्यंत वाढल्याने बरेच जण मधूनच परत फिरले होते, पण ही संधी पुन्हा येणे नाही. म्हणून आम्ही शेवटपर्यंत रूपेशची पाठ सोडली नाही.

समुद्राच्या "रत्नाकर' नावाची यथार्थता पटली. परतताना पुन्हा मध्ये खोल समुद्रात बोट बदलण्याचे दिव्य होतेच. पिरोटनच्या या पदभ्रमणाने आमच्या अनुभवविश्‍वात मोलाचे स्थान पटकावलेच, पण भोवतालच्या सजीव सृष्टीकडे पाहण्याची एक नजर दिली !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeth Article