भाषेपलीकडे...

राघवेश हब्बू
मंगळवार, 20 मार्च 2018

भाषा संवादासाठी असते. राजकारण्यांना भाषा वादासाठी लागते. आपण वादापलीकडे जात भाषेच्या जवळ जायला हवे आणि भाषेपलीकडे माणसाला भेटायला हवे.

भाषा संवादासाठी असते. राजकारण्यांना भाषा वादासाठी लागते. आपण वादापलीकडे जात भाषेच्या जवळ जायला हवे आणि भाषेपलीकडे माणसाला भेटायला हवे.

माझी मातृभाषा कानडी. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. अकरावीला शास्त्र शाखेत प्रवेश घेतल्यामुळे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाले. मातृभाषा कन्नड असली तरी मला कानडी लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे मराठी साहित्यच खूप वाचले. कन्नड साहित्य आणि संस्कृती "ऐकीव' माहितीतून आणि चित्रपटातून माझ्यापर्यंत आली. नोकरीनिमित्त मी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांतून खूप हिंडलो. बडोद्याला तीन वर्षे नोकरी केली. त्यामुळे गुजराती भाषेची आवड निर्माण झाली. जागोजागी "अही खमण मलशे'चे फलक वाचले. हो, गुजराती भाषेची लिपी देवनागरीशी मिळतीजुळती असल्यामुळे आपल्याला गुजराती बऱ्यापैकी वाचता येते.

इंदुरला आयशर मोटर्समध्ये कामाला होतो, तेव्हा इंदरसिंग नावाचा सहकारी होता. तो गाणी खूप छान गायचा. त्याची पंजाबी गाणी ऐकून पंजाबी भाषेचा गोडवा कळला. "कली तेरी गुज ते परांदा तेरा लालमी' त्याचे "पेटंट' गाणे. "सोनिये हिरीये तेरी याद आन्दी है, सीनेवीच तडपदा है दील जान जान्दी है' गाणे ऐकले आणि पंजाबीचा आशिक झालो. "जद तू मिलेंगी तैनू दस्सांगे, तेरे नाल मेरी हर खुषी' असे शब्द कुणाला भुरळ घालणार नाहीत?
कामानिमित्त बंगळूरला बऱ्याच वेळा गेलो. ग्राहकाकडे गेल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांशी मी कानडीतच बोलायचो. मी पुण्याहून आलोय, पुण्यात राहतो हे कळल्यावर त्यांना खूप आश्‍चर्य वाटायचे, ते मला विचारायचे, ""सर, तुम्ही इतके छान कानडी कसे काय बोलता?''
मी म्हणे, ""तुमच्याकरिता शिकलो, वरच्यावर इकडे यायचे म्हटल्यावर कानडी यायला नको?''
तसे बंगळूरला कानडीवाचून काही अडत नाही. आपल्या मुंबई, पुण्यात तरी मराठीवाचून फार काही अडेल का? परंतु अडत नाही म्हणून तिथेच थांबू नये. भाषा शिकून घ्यावी, आत्मसात करावी आणि ते तुमच्याच हिताचे आहे. एकदा बंगळूरहून पुढे होसूरला जायचे होते. होसूर हे बंगळूरपासून साधारण पन्नास किलोमीटरवर आहे; पण ते तमिळनाडूत आहे. नेमका तेव्हा कावेरी नदी पाणीवाटपाबाबतचा वाद उफाळून आला होता. बंगळूरच्या ग्राहकांनी मला होसूर भेट रद्द करण्याचा सल्ला दिला. माझा पूर्वीचा सहकारी राजा होसूरला राहतो. राजानेही मला तिकडे न येण्याचा सल्ला दूरध्वनीवरून दिला. मग होसूर भेट पुढे ढकलली.

पुढच्या आठवड्यात पुन्हा बंगळूरला गेलो. निघण्यापूर्वीच राजाशी बोलणे झाले होतेच. दिवसभराचे काम उरकले आणि रात्री राजाला फोन लावला. तो म्हणाला, ""सर, परिस्थिती सर्वसाधारण झाली आहे; पण एक अडचण आहे.'' आता काय अडचण बाबा? मनातले ओळखून तोच म्हणाला, ""सर, कर्नाटकात नोंदणी असलेल्या गाड्या इकडे येऊ देत नाहीत आणि तमिळनाडूच्या गाड्या कर्नाटकात जाऊ देत नाहीत. दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांचा पहारा आहे.''
या वेळेस मला या भेटी संपवायच्याच होत्या. ""राजा, काहीतरी उपाय सांग'', मी म्हटले.
""सर, मॅजेस्टीकडून अत्तीबेलेपर्यंत बस आहे. तिथून तुम्हाला सीमेपर्यंत रिक्षा मिळेल. थोडे अंतर पायी चालावे लागेल. एकदा तमिळनाडूच्या सीमेवरून आत आलात की इकडची रिक्षा करा.''
""ठीक आहे, मी परवा येतोय. तू तुझ्या कामाचे त्याप्रमाणे नियोजन कर. आपण संध्याकाळी भेटू.'' तोही मला भेटायला उस्तुक होताच.

ठरल्याप्रमाणे मी बंगळूरहून अत्तीबेलेपर्यंत बसने गेलो. अत्तीबेलेपासून थोड्याच अंतरावर कर्नाटक राज्य संपून तमिळनाडू राज्य चालू होते. दोन्ही राज्यांच्या सीमेवर दोन्हीकडच्या पोलिसांची तपासणी नाकी होती. सर्व साहित्य तपासून चालत जाऊ देत होते. सशस्त्र पोलिस, अडथळ्यासाठी लावलेले ड्रम्स बघून मला वाटले एका देशातून दुसऱ्या देशात निघालोय की काय? पलीकडे जाऊन रिक्षा ठरविली आणि भेटी पूर्ण केल्या. ठरल्याप्रमाणे पाचच्या सुमारास राजा भेटला. आल्या-आल्याच त्याने बातमी दिली, की माझा दुसरा सहकारी उदयकुमार हाही येतोय. राजाची आणि उदयकुमारची बऱ्याच वर्षांपासून मैत्री होती. उदयकुमार कर्नाटकातील चित्रदुर्गचा. त्याची मातृभाषा कन्नड. उदय आल्यानंतर तिघेही होसूर औद्योगिक वसाहतीतील एका छोट्याशा हॉटेलमध्ये बसलो. मी बऱ्याच कालावधीनंतर त्यांना भेटत असल्याने आमच्या कानडीत गप्पा रंगल्या. मी महाराष्ट्रीयन, उदय कर्नाटकचा, राजा तमीळ आमच्या गप्पा कानडीत, त्याही होसूरमध्ये.

निरोप घेताना मी सहजच राजाला विचारले, ""राजा, तुझे काय मत आहे कावेरी पाणीवाटपाबाबत?''
तो म्हणाला, ""सर, जेवढे पाणी तमिळनाडू राज्य मागतेय त्यापेक्षा अधिक कावेरीचे पाणी बंगळूरमध्ये राहणारे तमिळीयन वापरत आहेत. राजकारण्यांना भांडण्यासाठी कारण पाहिजे असते, बाकी सीमेच्या अलीकडले आणि पलीकडले एकोप्यानेच राहत असतात.''
मला पटले. संवादाच्या भाषेला राजकारणासाठी वादात ओढणे गैर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raghwesh habbu write article in muktapeeth