दोन्ही घरचा पाहुणा

रमाकांत श्रीखंडे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

समारंभाच्या धावपळीत यजमानांकडून आपल्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. ते जाणीवपूर्वक आपल्याला बेदखल वागवत नसतात. त्यांना जाणून घ्यायला हवं आणि उदार मनाने त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे, तरच स्नेह टिकतो.

समारंभाच्या धावपळीत यजमानांकडून आपल्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. ते जाणीवपूर्वक आपल्याला बेदखल वागवत नसतात. त्यांना जाणून घ्यायला हवं आणि उदार मनाने त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे, तरच स्नेह टिकतो.

सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावी महाविद्यालयात प्राध्यापकीय सेवेत होतो. आमच्या एका सहकारी प्राध्यापकांनी त्यांच्या विवाहाचे आग्रहाचे निमंत्रण दिले होते. मी व माझे सहकारी प्राध्यापक आदल्या दिवशी रात्री तेथे जाऊन पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेबाराचा मुहूर्त होता. माझ्या सहकारी प्राध्यापकांची बहीण जवळच्याच गावी राहात होती. बरोबर असलेल्या त्या प्राध्यापकांनी मला त्यांच्याबरोबर येण्याची विनंती केली. आम्ही सकाळी नऊच्या सुमारास गेलो. तेथे गप्पाटप्पा व पाहुणचार झाल्यावर आम्ही तेथून निघालो. माझे सहकारी प्राध्यापक बहिणीच्या आग्रहास्तव तिच्याकडेच जेवले; पण मी फक्त चहा घेतला. साधारणतः सव्वाबाराच्या सुमारास विवाहस्थळी परतलो. लग्न थाटामाटात पार पडले. दुपारचे दोन वाजले तरी जेवणाच्या तयारीचे लक्षण दिसेना. ते गाव एवढे छोटे होते, की तेथे कोठे हॉटेलही नव्हते. लग्नाआधीच पंगत उठली होती. त्या सगळ्या धामधुमीत आमच्या जेवणाची साधी चौकशीही कोणी केली नाही. नंतर संध्याकाळी वधू-वरांची वरात निघाली. रात्री अकरापर्यंत वरात चालली. ज्यांच्या घरी आमची उतरण्याची सोय केली होती, त्या यजमानांना कोठून तरी आमचे जेवण झाले नसल्याचे कळले. खरे तर दिवसभराच्या उपासानंतर जेवण्याची इच्छाही राहिली नव्हती. पण यजमान म्हणाले, ""आमच्या घरी असे कोणी उपाशी राहिलेले आम्हाला बरे वाटणार नाही.'' मग त्या यजमानांच्या पत्नीने रात्री अकरानंतर पिठले- भात करून जेवायला वाढले. आम्हाला त्या माउलीचे आभार कसे मानावेत तेच कळेना. खरे तर आमची व त्यांची ना ओळख, ना पाळख; पण त्यांनी अगत्यपूर्वक आम्हाला जेवायला वाढले. अशा प्रकारे माझ्याबरोबरच्या प्राध्यापक सहकाऱ्याच्या बहिणीघरी व विवाह असलेल्या घरी अशा दोन्ही घरचा मी पाहुणा त्या दिवशी दुपारी उपाशी राहिलो.

दुसरा प्रसंग माझ्या नातेवाइकांच्या लग्नातील. लग्न पार पडल्यावर जेवणाची पंगत बसली. मला एका कोपऱ्यात बसायला जागा मिळाली. पदार्थ वाढताना माझ्या पानापर्यंत येईतोवर वाढप्यांच्या हातातील पदार्थ संपून जाई. सर्वांच्या जेवणाला प्रारंभ झाला; पण माझे ताट मोकळेच राहिले. ही गोष्ट माझ्या सासऱ्यांच्या लक्षात आली. मग त्यांनी वाढप्यांना माझे ताट वाढून आणण्यास सांगितले. ताट वाढून आल्यावर कोठे माझी जेवणास सुरवात झाली.

तिसरी घटना गुलबर्गा (कर्नाटक) येथील आहे. आम्ही राहात होतो तेथील समोरच्या घरातील वकिलांच्या मुलाचा विवाह होता. त्यांचा व माझ्या बाबांचा घनिष्ठ संबंध होता म्हणून त्या वकील साहेबांनी आग्रहाचे निमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी माझे बाबा त्या विवाहास जाऊन आले. पंगत बसल्यावर बाबांना बोलावण्यास कोणाला तरी पाठवतो, असे त्यांनी सांगितले होते. बाबा घरी परतल्यानंतर वेळेत जेवणाच्या पंगती उठल्या; पण यजमान माझ्या बाबांना भोजनाला येण्याचा निरोप द्यायला विसरले. शेवटी सायंकाळी साडेचारपर्यंत वाट पाहून माझ्या आईने स्वयंपाक करून बाबांना जेवायला वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी वकील साहेबांना आठवले. ते सकाळीच घरी आले आणि झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी माझ्या वडिलांची मनापासून माफी मागितली. लग्नाच्या गडबडीत पंगत उठली. इतर धावपळ सुरू होती. त्यात ते बाबांना बोलावण्याचा निरोप द्यायला विसरले होते. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. त्या वेळी जेवायला येण्याची बाबांना व मला त्यांनी अगत्यपूर्वक विनंती केली. जणू त्यांनी त्यांच्या अनवधानाने झालेल्या चुकीचे परिमार्जन केले.

असे घडते कधी कधी. तीनही प्रसंग अपवादात्मक व प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. जाणीवपूर्वक असे कोणीच करणार नाही. अलीकडे तर लग्नाला आलेली पाहुणे मंडळी जेवली की नाही याची चौकशी करायला यजमानांना वेळ असेल याची शाश्‍वती नसते. कामांच्या गडबडीत असे होऊ शकते; म्हणूनच आपणही उदार मनाने आणि क्षमाशील दृष्टिकोनातून अशा घटनांकडे पाहावे. असे केल्याने आपल्या मनाला एक प्रकारचे सात्त्विक समाधान मिळते. आपले एकमेकांशी असलेले दीर्घकालीन स्नेहाचे व सौहार्दाचे संबंध कायम राहतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramakant shrikhande write article in muktapeeth