अशीही बनवाबनवी

रमेश वैशंपायन
शनिवार, 2 जून 2018

थोडी सजगता दाखविल्यास मोठी समस्या निर्माण होत नाही. बॅंकेत नोकरी करताना कर्मचाऱ्यांना प्रत्येक गोष्टीची खातरजमा करावीच लागते.

थोडी सजगता दाखविल्यास मोठी समस्या निर्माण होत नाही. बॅंकेत नोकरी करताना कर्मचाऱ्यांना प्रत्येक गोष्टीची खातरजमा करावीच लागते.

मी एका राष्ट्रीयीकृत बॅंकेतील डोंबिवली येथे शाखा व्यवस्थापक असतानाचा अनुभव आहे. महिन्याचा पहिला आठवडा असल्यामुळे शाखेत नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. केबिनमध्ये एका खातेदाराशी चर्चा करत असताना माझे लक्ष बाहेर हॉलमध्ये गेले. एक तरुण मुलगी तावातावाने एका अधिकाऱ्याला काहीतरी सांगत होती. असे पाच ते दहा मिनिटे तरी चालले असेल. मी चपराशामार्फत तिला आत बोलावले. ती घुश्‍यातच आत आली व आवाजाची पट्टी आणखी वाढवून मला म्हणाली, ""तुमच्या शाखेत बरीच वर्षे आमचे बचत खाते आहे. नेहमी पैसे काढते पण आज मला सहकार्य मिळत नाही.'' मला आश्‍चर्यच वाटले. मी संबंधित कर्मचाऱ्याला केबिनमध्ये बोलावून समस्या विचारली. तेव्हा तो म्हणाला, ""नेहमी एक वयस्कर बाई येतात. त्यांना मी चांगले ओळखतो, पण त्यांनी आज या मुलीला पाठवले आहे. पैसे काढण्याच्या स्लिपवरती अंगठा आहे. (नुसता शाईचा डाग असावा असे दिसत होते.)'' त्यावर तिने सांगितले, की मावशी आजारी असल्यामुळे तिला सही करता येत नाही, म्हणून मी अंगठा लावून स्लिप आणली आहे. मी सांगितले, ""स्लिपखाली तुमच्या फॅमिली डॉक्‍टरचा शिक्का व व्हेरिफिकेशनची सही पाहिजे होती.'' त्यावर तिने उत्तर दिले, की डॉक्‍टर गावाला गेले असल्यामुळे नाइलाज झाला.

मला खरे वाटले. मी सांगितले, ""आमचा कर्मचारी ऑफिसचे काम संपल्यावर तुमच्या बरोबर येईल व मावशीचा समक्ष अंगठा घेईल. तुम्हाला वैद्यकीय उपचारासाठी आवश्‍यक रक्कम मिळेल.'' त्यानंतर ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती एकदम केबिनचे दार उघडून आत आली. ""साहेब तुम्ही म्हणाला होतात, पण काल कुणीच आलं नाही. मावशी आजारी आहे याची तुम्हाला कल्पना आहेच.'' चौकशी केल्यावर कामामुळे संबंधित अधिकारी जाऊ शकला नव्हता असे कळले. ""ती तुझी मावशी आहे का?'' मी तिला विचारले, ""माझी लांबची मावशी आहे, पण तिची मी आईसारखी काळजी घेते. मी कॉलेजसाठी तिच्याकडे राहते.'' मी तिला सांगितले, की मला तुझी अडचण समजली आहे. मी तुझ्याबरोबर दुपारी येतो. आम्ही निघालो, कोणत्या तरी जुन्या चाळीसमोर तिने रिक्षा थांबविली. तिसऱ्या मजल्यावरील छोट्याशा खोलीत आम्ही आत शिरलो. कॉटवर एक म्हाताऱ्या कृश आजीबाई पडून होत्या. ""मावशी, अगं तुला औषध आणायची आहेत ना? बघ बॅंकेतील मोठ्या साहेबांना मी घेऊन आले आहे.'' मावशी निपचित पडून होती. तापामुळे आलेल्या ग्लानीमुळे बहुतेक तिला झोप लागली होती. ती हूं का चू करेना. ती मुलगी तिच्यावर ओरडतच होती. मला जरा विचित्रच वाटले. काही केल्या ती डोळे उघडायला तयार होईना. मी म्हणालो, ""सध्या राहू दे. आजींना बऱ्यापैकी कळायला लागल्यावर मी त्यांना सविस्तर समजावून सांगतो व त्यांच्या मान्यतेनंतर अंगठा घेतो. आवश्‍यक असेल तर मी तुमच्या केमिस्टकडे येतो व आवश्‍यक ती औषधे देण्याची व्यवस्था करतो. पण अशा परिस्थितीत मी पैसे देऊ शकणार नाही.'' (दोन दिवसांसाठी पंधरा हजार कशाला लागतात असा मला संशय आला.) ती युवती परत आली नाही व मी पण हा प्रसंग विसरलो. साधारण पंधरा ते वीस दिवसांनंतर मुलुंड येथून एक मध्यमवयीन उच्चशिक्षित जोडपे मला भेटावयास आले. ""साहेब, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत,'' असे पत्नी म्हणाली. मला समजेना, की माझे आभार मानायचे कारण काय असावे. थोडा वेळ विचार केला पण काही आठवेना. मग त्या बाईंनी सविस्तर माहिती सांगितली. ""माझी थोरली बहीण प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. नवऱ्याचे अकाली निधन झाले व मूलबाळ नव्हते. तेव्हा सेवानिवृत्तीनंतर डोंबिवलीत चाळीत राहात आहे. वय झाल्यामुळे थोडा अशक्तपणापण आला होता. म्हणून गेले महिनाभर कोणाच्यातरी सांगण्यावरून अर्धवट माहिती घेऊन एक मुलगी तिने केअर टेकर म्हणून ठेवली होती. महिनाभर तिने विश्‍वास संपादन केला. पण ती चोर निघाली. बॅंकेतील रक्कम हळूहळू काढून पोबारा करायचा तिचा विचार होता. तुम्ही योग्य नियम दाखवून पैसे द्यायला नकार दिला म्हणून तुमचे आभार.''

हॉस्पिटलायझेशन नसताना एकदम पंधरा हजार कशाला लागतात ही शंका मला अगोदरच आली होती. तिथे घरातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू अगदी देवाची उपकरणीसुद्धा घेऊन पळाली आहे व तिचा अजून काहीही थांगपत्ता लागलेला नाही. आता आम्ही तिला काही दिवस मुलुंडला आमच्या घरी ठेवणार आहोत.'' हा अनुभव माझ्यासाठी विलक्षण होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh vaishampayan write article in muktapeeth