... राणा गेला!

श्रीराम ग. पचिंद्रे
शनिवार, 17 डिसेंबर 2016

कधी कधी काय होतं, की, एखादा जीव उगीचच जीव लावून जातो. तसा त्याचा आणि आपला काहीही संबंध नसतो, काहीही नातं नसतं. पण त्यांच्याविषयीची काही वाईट बातमी समजली, की, मन विषण्ण होतं, काळजात कालवाकालव होते.

काही महिन्यांपूर्वी विदर्भातल्या उमरेड- कराडला नावाच्या जंगलातला एक वाघ हरवल्याची बातमी कानावर आली. जय हे त्या वाघाचं नाव. तो चक्क जंगलामधून हरवला. अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. समाजातली अनेक मुलं हरवतात, अचानक नाहीशी होतात. मोठी माणसंही अचानक नाहीशी होतात. काय होत असेल त्यांचं? कुठं जात असतील ती?

तर, विषय वाघाचा होता. हा जय नावाचा वाघ कुठं गेला असेल? हरवायला आणि न सापडायला तो काय उंदीर नाहीतर ससा आहे? जंगलातल्या तस्करांनी केव्हाच त्याची शिकार करून कातडी, हाडं आणि मांस अशा सगळ्याची तस्करी करून पैसा केलाही असेल. नाहीतर जंगल खात्याच्या कॅमेऱ्यातही तो सापडत नाही, अथक परिश्रम करूनही, सगळं जंगल पालथं घालूनही जय सापडत कसा नाही? तो काय पळून जाऊन गावात घर भाड्यानं घेऊन राहणार आहे? का विजय मल्ल्या आहे परदेशी पळून जायला? म्हणून असं वाटतं की, त्याची शिकार करून विल्हेवाट लागलेली असेल. हे वाटत असताना अतिशय दुःख होतंय.

परवाच संध्याकाळी अचानक आणखी एक वाईट बातमी कानावर आली आणि नंतर फोंड्याच्या प्रतिनिधीकडून यंत्रणेतून हातात आली; राणा गेल्याची ती बातमी होती. राणा हा बोंडला अभयारण्यातल्या प्राणी संग्रहालयातला वाघ.

राणा माझा कोण होता? भाऊ, मित्र, सखा, नातेवाईक? निदान किमानपक्षी घारत पाळलेला एखादा प्राणी? तो मला ओळखतही नव्हता. पण राणाला पाहिलं की, तो आपला वाटे. बोंडलाच्या प्राणी संग्रहालयात एका भव्य रिंगणात राणा मोठ्या दिमाखात वावरत असायचा, भूक लागली की, डरकाळी फोडायचा. त्याची डरकाळी ऐकताना अंगावर काटा उभा रहायचा. पण तरीही ती डरकाळी ऐकावीशी वाटायची. त्यांच्यासाठी तयार केलेल्या छोट्याशा जलाशयात राणा अनेकदा मजेत डुंबत पडलेला दिसे. संपूर्ण रिंगणभर तो भटकायचा. विशाखापट्टणमच्या प्राणिशास्त्र उद्यानात संध्या आणि त्याची सखी राणा दोघांचाही जन्म झाला होता. गोमंतकीय जनतेला आणि बाहेरच्या पर्यटकांना वाघाची जोडी बघायला मिळावी, म्हणून संध्या आणि राणा यांना बोंडलाच्या प्राणी संग्रहालयात आणलं. एकदम नव्हे, वेगवेगळ्या दिवशी. आणलं तेव्हा दोघंही नऊ वर्षाचे होते. त्यांची आधी ओळख नव्हती बोंडलात आणल्यानंतर त्यांची ओळख झाली. सुरवातीला त्या मोठ्या रिंगणात तो आणि संध्या हे दोघं मजेत फिरत असायचे. नंतर म्हणे संध्याचा स्वभाव भांडखोर झाल्यानं दोघांपैकी एकालाच पिंजऱ्याबाहेर सोडलं जायचं. ती चिडखोर का झाली असावी हा तज्ज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. पण मानवी पती- पत्नींसारखं त्यांचंही पटत नव्हतं की काय असं वाटतं. त्यांना बछडे व्हावेत ही वनाधिकाऱ्यांबरोबरच सर्व पर्यटकांचीही अपेक्षा असणं साहजिकच आहे. पण का कुणास ठाऊक, संध्याच्या पोटी एकही बछडा जन्माला आला नाही. त्यांच्या पोटी बछड्यांचा जन्म झाला असता, तर त्यांचा संसार सुफलित ठरला असताच, शिवाय वन्यप्राणी प्रेमिकांच्याही आनंदाला पारावार राहिला नसता, पण तसं घडायचं नव्हतं. नियतीला ते मान्य नसावं. नाहीतर आज सोळा वर्षं वयाचा राणा गेला, तरी त्याचे मोठे झालेले बछडे तिथं दंगा करताना दिसले असते. तसा तो त्याचं आयुष्य पूर्ण जगून गेला. तरीही हळहळ मनात राहतेच.

जेव्हा पहिल्यांदा बोंडल्याला जाऊन राणाला पाहिलं, तेव्हा मला "डरकाळी' या शीर्षकाचं एक कथाबीज सुचलं होतं. अशी कल्पना केली होती की, राणा आणि संध्या यांनी पिंजरा आणि ते रिंगण सोडून पळून जायचं ठरवलं तर ते कसे जातील? ती कथा अशी-

डरकाळी
(गोव्यातील बोंडल्याला अभयारण्य आहे. जंगलातच प्राणी संग्रहालय आहे. तिथे राणा आणि संध्या ही वाघांची जोडी आहे, त्यांची नावे खरी आहेत, एवढेच सत्य आहे. त्यापुढची संपूर्ण कथा काल्पनिक आहे).

दुपारचे बारा वाजून गेले, तसं ऊन्ह वाढलं. उकाडा तर बारा महिने तेरा काळ आहेच. आजुबाजूला घनदाट अरण्य असल्यामुळेच थोडासा काय उष्मा कमी लागतो एवढंच. तशा गरमीत पिंजऱ्याच्या बाहेरील मोठ्या रिंगणात फिरणारा अर्धपोटी राणा दमदार पावलं टाकत पाण्याच्या हौदाजवळ आला. उथळशा रुंद हौदातील पाण्यात एकेक पाय बुडवून घेत तो आरामात बसला. मस्तपैकी जांभई दिली.

त्याच्यासाठी राखून ठेवलेल्या जागेच्या कुंपणाच्या जाळीपलीकडे लोकांची गर्दी दिसत होती. त्यानं जांभई दिलेली पाहून पोरं ओरडली, ""अग आई, बाबा बाबा, बघा वाघानं केवढा मोठ्ठ्यानं आळस दिला, केवढा मोठा जबडा आहे नै? आणि सुळे तर बघा, कसे धारदार आहेत नै?''

राणाला हे काही नवीन नव्हतं. रोज हजारो लोक त्याला आणि "ति'ला पहायला गोव्यामधील बोंडल्याला येत. "ती' म्हणजे त्याची सोबतीण संध्या. त्याने जोरात डरकाळी फोडली, ""संध्याऽऽऽऽऽऽ संध्याऽऽऽऽऽऽ'' आपल्याला बोलता येत नाही, नाही तर आपणही आपल्या जोडीदारणीचं नाव घेऊन हाक मारली असती असं राणाला वाटलं. पण नाव घेता आलं नाही, म्हणून काय झालं? संध्याला आपल्या डरकाळीचा अर्थ अगदी बरोब्बर कळतो, हे त्याला ठाऊक होतं.

त्याची हाक ऐकून संध्याही तिच्या पिंजऱ्याबाहेर आली. मोकळ्या जागेत येऊन तीही त्याच्याजवळ येऊन बसली. तो बसल्याबरोबर तो तिचं अंग चाटायला लागला.
ती नापसंतीदर्शक गुरगुरली. तो म्हणाला, ""असं काय करतेस गं संध्या. अगं आपण वाघ आहोत. माणूस नाही. आपल्याला चालतं माणसांसमोर प्रेम करायला. अन्‌ माणसाचंही तू बघतेसच ना, गोऱ्यापान पोरी पोरांच्या कशा अंगचटीला येतात ते. आणि काळ्या पोरी तरी कुठं मागं आहेत? त्याही आपापल्या प्रियकरांबरोबर किती चाळा करतात. आणि आपण जंगलाचे राजा- राणी, मग आपल्याला काय झालं?''
संध्या गुरगुरतच म्हणाली, ""राजा- राणी म्हणे! बंदीवासातली जोडी आपली.
आपली काय आणि माकडांची काय, जोडी सारखीच! राणा, माझ्या राजा, आपल्याला एकमेकांचे जोडीदार म्हणून इथं आणलंय, कित्ती लांबून आणलंय सांग बरं, पण आणल्यापासनं वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवून दिलंय. आपल्याला एकत्र येऊ दिलं जातं तेही असं बाहेर, सगळ्यांसमोर. तेही दिवसा. हे असं किती दिवस चालायचं?''
संतापानं मोठी डरकाळी फोडून राणा ओरडला, ""संध्या, आपली तुलना माकडाशी करू नको. ह्या प्राणीसंग्रहालयात आपल्याबरोबर हत्तीसुद्धा आहेत, तुलनाच
करायची तर त्यांच्याशी कर.''

सौम्य पण उपरोधिक आवाजात गुरगुरत संध्या म्हणाली, ""झ्या लाडक्‍या राणा, हत्तींना राहण्यासाठी जागा मोठी आहे, फिरायलाही रान मोकळं आहे. आपण मात्र कैदेत आहोत. आपल्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य हत्तींना आहे. त्यांचं मिलन होतं, त्यांना पिल्लं होतात. आपल्यावर मात्र सक्तीचं ब्रम्हचर्य लादलंय, ह्या स्वार्थी माणसांनी.''
""होय गं संध्याराणी, एक लक्षात घे, हत्तींना कोणी हिंस्र म्हणत नाही.
त्यांच्या पाठीवर माणूस बसून जाऊ शकतो. ते बलदंड आणि रुबाबदार तरी असतात. आपली तुलनाच करायची असली तर हत्तीशी कर, माकडाशी नको. ती माणसासारखी जराशी दिसतात, पण माकड म्हणजे माणूस नव्हे. माणूसदेखील माकडासारखा चाळा करताना आपण पाहतोच की रिंगणाबाहेर, पण तरीही माणूस तो माणूसच. माणसाशिवाय दुसरा कोणता प्राणी आपल्याला बंदीवान बनवू शकतो? सांग बरं...हत्ती नाही अन्‌ माकड तर नाहीच नाही. आपल्याला क्रूर मानतो माणूस. आपण शिकारी प्राणी आहोत. पण खरा क्रूर माणूसच आहे. माणसानं गुरा-ढोरांची हत्या केली तर ते चालतं, कारण तो माणूस आहे. त्याच्याजवळ खाण्यासारखं खूप काही आहे, तरी तो मांस खाण्यासाठी अशापासून उंटापर्यंत सर्व तऱ्हेचे प्राणी मारतो.

आपल्याला मात्र मांस खाणं अपरिहार्य असूनसुद्धा शिकारीचं स्वातंत्र्य नाही. शाकाहाराचा पर्याय आपल्याला नसला तरी आपल्याला शिकार करू देत नाही माणूस, याचं दुःख होतंय मला.''

एक उसासा टाकत संध्या म्हणाली, ""हं. आपल्याला दिवसातून एक वेळा तयार मांस मिळतं एवढ्यावर समाधान मानायचं. रात्री खाऊन घ्यायचं, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत नाही. असं वाटतंय, मांस घालायला माणूस जर आत आला, तर पहिला फडशा पाडावा.''

राणा पुन्हा चिडला, ""संध्या, तुझ्या अशा आततायी वागण्यानंच आपल्याला वेगळं रहावं लागलंय, आठवतंय की नाही?'' संध्याला तो दिवस आठवला. राणा वयात आला. त्याला जोडीदारीण हवी म्हणून प्राणीसंग्रहालयाच्या चालकांनी सरकारमार्फत प्रयत्न केले. राणा विशाखापट्टणमचा; तशी संध्याही तिथलीच. पण दोघांची ओळखच नव्हती. अगदी बछडा असल्यापासून राणाला गोव्यातील बोंडलाच्या संग्रहालयात आणून ठेवलं होतं.

संध्याचा जन्मही विशाखापट्टणमचाच. ती वयात आल्यावर राणाची जोडीदारीण म्हणून तिची निवड झाली. पण संध्या बालपणापासूनच मोठी कुर्रेबाज. राग अगदी नाकाच्या टोकावर आणि शेपटीच्या झुबक्‍यावर! सरकारनं मोठ्या निसबतीनं संध्याला बोंडल्याला आणलं.

संध्याला बघून राणानं आनंदानं फोडलेल्या डरकाळीनं सारं प्राणीसंग्रहालय दणाणून गेलं. पण तिनं एक जोरदार जांभई देऊनच त्याला उत्तर दिलं. त्याचा जीव वरखाली व्हायला लागला. आणि खरं तर तिचाही. पण एवढ्या लवकर त्याला जवळ येऊ द्यायचं तिच्या मनात नव्हतं. जरा खेळवू या की, जातोय कुठं?

त्याच्यासाठीच आपल्याला आणलंय, मग आधी त्याला जरा खेळवू, घोळवू; मग आहेच की प्रेम, प्रणय आणि बछड्यांचा जन्म! संध्याला त्याच्या पिंजऱ्यात सोडल्यावर लवकरच एकांतात राणा तिच्या जवळ जाऊन अंगाला अंग घासायला लागला.
तिनं गुरगुर करून नापसंती दर्शवली. त्यानं प्रेमळपणानं गुरगुरून विचारलं, ""का गं, मी आवडलो नाही का तुला?''
""शांत बस जरा. जा, त्या कोपऱ्यात जाऊन बस. दमलेय मी. खूप लांबून आणलंय मला.''
""अगं हो, पण जरा प्रेमानं बोल की.''
""काय रागानं बोललेय? आल्याआल्याच अंगचटीला आलास तर मी काय करायचं?
अजून धड ओळखसुद्धा नाही आपली.''
""बरं बाई, वाघीणच आहेस तू. वाघिणीसारखंच वागलं पाहिजे तुला, घे विश्रांती. नंतर बोलू आपण...'' काहीशा नाराजीनं राणा गुरगुरला.
दोघं पिंजऱ्यातच दूर दूर पडून राहिले.
दोघांसाठी आलेलं मांस पोटभर खाऊन दोघं झोपून गेले. रात्रभर छान झोप झाल्यावर सकाळी नऊ वाजता दोघांना बाहेरच्या रिंगणात सोडण्यात आलं. तिथंही राणा रंगात आला; संध्याशी मस्ती करायच्या इराद्यानं तिच्या अंगाला अंग घासत फिरू लागला. त्याचा हेतू तिला माहीत होता, पण तिनं लटका राग दाखवत त्याच्या मानेचा चावा घेतला. एका तरण्या वाघीणीचा चावा होता तो. राणा वेदनेनं कळवळून बाजूला झाला. तेवढ्यात तिनं त्याला पंजाही मारला व जास्तच चावे घ्यायला सुरुवात केली. तो प्रतिकार न करता दुःख सहन करत राहिला.

त्याचा जीव तिच्यावर जडला होता. तिला दुखवायची त्याची इच्छा नव्हती. पण तिनं तो भित्रा आहे असा त्याचा उलटा अर्थ काढला. मग कधी ती त्याला प्रेमाची डरकाळी फोडून प्रतिसाद द्यायची, अन्‌ तो जरा जवळ आला, की, त्याच्यावर हल्ला चढवायची. राणा बिचारा जेरीला आला. वाघाची जात असून एका मिजासखोर वाघिणीमुळे त्याच्यावर "बिचारा' म्हणवून घेण्याची वेळ आली होती.

प्राणी संग्रहालयाचे वैद्यकीय अधिकारी, राणाची देखभाल करणारे कर्मचारी, मांस देणारे सेवक अशा साऱ्यांनाच कोडे पडले. प्राण्यांच्या वर्तनाचे अभ्यासकही आले. "असेही होऊ शकते, त्यामुळे काही काळ त्यांना एकमेकापासून बाजूला ठेवा, नंतर त्यांना एकमेकाबद्दल ओढ निर्माण होत आहे असे दिसले, तर पुन्हा एका पिंजऱ्यात ठेवा...' असा सल्ला त्यांनी दिला. तेव्हापासून त्यांना वेगळे ठेवण्यात यायला लागले. त्या क्षणापासून संध्याला पश्‍चात्ताप व्हायला सुरुवात झाली.

""राणा, माझ्या राजा, मी फार त्रास दिला रे तुला. आता आपल्याला एकत्र येऊ दिले, तर मी तुझीच होऊन राहीन रे. बाहेरच्या रिंगणात आपण एकत्र असतो खरे, पण तिथं तर दिवसभर माणसांची गर्दी असते. सगळे आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. आपण तिथं काही केलं तर त्यांचा दंगा किती उसळेल, ते काय काय करतील, हे सांगता यायचं नाही. आपल्यावर दगड-धोंडे फेकून मारायला कमी करायचे नाहीत ही दुष्ट माणसं.''

राणाला हे पटत होते. पण हे व्हायला संध्याचं वागणंच कारणीभूत होतं हे तो तिला सतत सांगत रहायचा. ""राणा, चूक झाली माझी. मला मान्यच आहे माझी चूक. कित्ती वेळा तेच तेच उकरून काढशील? त्यापेक्षा काही उपाय सुचतोय का बघ की. मलाही तू हवाच आहेस रे राजा...''

""संध्या, आपण ह्या रिंगणात आणि छोट्याश्‍या पिंजऱ्यात जिथून आलो. आपले पूर्वज जिथे मानाने जगले, जंगलचे राजे म्हणून ज्या राज्यात त्यांचा दिमाख होता, ते जंगल आपल्या आजुबाजूला सर्वत्र पसरलेलं आहे. आपले पिंजरे आणि हे रिंगण यांच्या कारावासातून आपण बाहेर पडू शकलो, माणसाच्या काचातून निसटू शकलो, तर आपल्या जगण्याला खराखुरा अर्थ येईल. जंगलातल्या एकांतात आपलं मीलन होईल, आपल्यालाही बछडे होतील. वाघांची वंशावळ आपण वाढवत राहू. बोल संध्या, बाहेर पडायची हिंमत आहे तुझी?''

आभाळात वीज कडाडताना संध्यानं अनेकदा पाहिली होती. आताही त्याच विजेच्या तेजाचा लोळ पडावा, तसे संध्याचे डोळे दिपून गेले. स्वातंत्र्य! माणसाच्या कैदेतून स्वातंत्र्य!! आपला जीव आजवर असा का घुसमटत होता, कशासाठी आपण तगमगत होतो,आपल्याला नेमकं काय हवं होतं, आपल्या अंतःकरणाला कशाची ओढ आहे? हे तिला आता उमजलं. आपण वाघ आहोत. मार्जार कुळातले प्राणी अशी आपली ओळख असली, तरी वाघ ही आपली स्वतंत्र ओळख आहे. आपण वाघ आहोत. आपला जन्म कैदेत पडून राहण्यासाठी नाही. आपल्या जिवलगाशी आपलं मीलनही होऊ शकत नाही, असलं आपलं जगणं! अशा कारावासातून सुटका करून घ्यायची...जगावेगळी झेप घ्यायची.
संध्यानं आनंदानं डरकाळी फोडली.
""तू माझे डोळे उघडलेस राणा! मी तयार आहे. इथून बाहेर पडू. मी जन्मभर तुझ्यासोबत राहीन. तुझ्या बछड्यांची आई म्हणून मी जगेन. आता तयारीला लाग. आपण निकराचा प्रयत्न करू या.''
""आता एकच स्वप्न..मुक्त व्हायचं. ह्या जंगलाचे राजा-राणी म्हणून वावरायचं.'' राणाची डरकाळी आसमंत भेदून गेली.
""राणा, आपण आता एकदिलानं जगायचं. मी तुझी आहे. आपलं सहजीवन आतापासूनच सुरू होऊ दे. माझ्या राजा, तुझ्यापुढं मला जगाची काय पर्वा? ये, आजच, आत्ताच मी तुझ्या स्वाधीन होते. मला आता जनाची पर्वा नाही अन्‌ मनाचीही. आपण वाघ आहोत. जन्मतःच मुक्त आहोत. आभाळात सूर्य, सभोवताली जंगल आणि ह्या पाण्याच्या हौदात आपण दोघं. आता हे विश्व फक्त आपलं. आपल्या दोघांचं!''
राणा प्रेमभरानं संध्याला चाटायला लागला. त्याचा आवेग वाढत गेला. त्याचे सुळे आणि नख्या आपल्या देहात रुतवून घेत संध्या क्षणाक्षणानं मोहरत राहिली. आधी एक नर आणि एक मादी असलेले प्राणी जणू एकच झाले.लोकांच्या गलक्‍याला न जुमानता पाण्याच्या त्या हौदातच राणा आणि संध्या एकरूप झाले.

लोकांचा आरडाओरडा ऐकून संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना काही कळेना. ते रिंगणाजवळ आले. व्याघ्र दांपत्याचा तो जंगली प्रणय होऊन गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेही आनंदून गेले. त्यांचा हेतू सफल झाला. वरिष्ठ स्तरावर बातमी पोहोचली. निर्णयाची प्रक्रिया वेगवान झाली. थोड्याच दिवसात एकाच पिंजऱ्यात संध्या आणि राणा सुखानं नांदू लागले. माणसांसमोर कामक्रीडा करण्याची आवश्‍यकता आता त्यांना राहिली नव्हती; पण आता तो संकोचही राहिला नव्हता. दोघांची इच्छा झाल्यावर त्यांना खरोखरच "रान मोकळे' झाले होते.

एके रात्री, खाणं झालं. संध्या राणाला चाटता चाटता म्हणाली, ""राणा, तुला हवे ते मिळाले. आता तू तृप्त आहेस आणि मीही. पण राजा, आपल्याला ह्या कैदेतून मुक्त व्हायचंय; आपण दोघांनी तसा निश्‍चय केला होता. आता तुला विसर पडलेला दिसतो. काय, खराय ना?''
राणानं जोरदार जांभई दिली.
""जांभई देऊन विषयांतर करू नको राणा! आपल्याला स्वातंत्र्य हवंय...''
राणा गुरगुरत म्हणाला, ""होय गं बाई, मला जारा विचार तर करू दे.''
""तू सुखासीन झालायस राणा, आयतं अन्न मिळतं, सुरक्षितता आहे, माझ्याकडून
सुख मिळतं. आता विचार करण्याचा तुझा फक्त वेळकाढूपणा आहे. आता आपण पळून जाण्याची योजना आखू...''
राणाच्या मनातील स्वातंत्र्याच्या विझलेल्या स्फुल्लिंगाला फुंकर घालण्यात संध्याचा बराच वेळ गेला. संध्याकाळ झाली. पिंजऱ्यात शिरल्यावर राणाने संध्याच्या अंगाला अंग घासायला सुरुवात केल्या केल्या राणी ओरडली, ""दूर हो माझ्यापासून; आता तुला काही मिळणार नाही. जेव्हा आपली सुटका होईल, आपण दाट जंगलात शिरू, तेव्हाच माझ्याजवळ यायचं. तोवर नाही.''

राणा हिरमुसला होऊन बाजूला जाऊन बसला. आता मात्र त्याच्या डोक्‍यात मुक्तीचा विचार खेळायला लागला. काय करता येईल? कसे करता येईल? बराच वेळ पिंजऱ्याच्या गजांना डोकं घासून घासून त्यानं विचारचक्र वेगवान करण्याचा प्रयत्न केला.
""संध्या, आपल्यासमोर दोन शक्‍यता आहेत. एकतर ह्या पिंजऱ्यातून निसटता येते का? आणि दुसरी, आपल्याला बाहेर सोडल्यावर तिथून बाहेर पडता येते का?- ह्या दोन शक्‍यतांचा विचार करू. ह्या पिंजऱ्यातूृन कसं निसटता येईल?
आपल्याला खायला घालण्यासाठी पिंजऱ्याचं दार उघडलं जातं, ही वेळ रात्रीची असते, अंधार असतो, सगळीकडं सामसूम असते, ही गोष्ट फायद्याची खरी, पण त्याचवेळी बाहेरची सारी दारं बंद असतात. सर्व प्रकारचा बंदोबस्त असतो.''
बराच वेळ तो मूक राहिला.

संध्या म्हणाली, ""आता झोप माझ्या राजा, उद्या बाहेर सोडल्यावर दुसरी शक्‍यता तपासून पाहू.''
दोघंही मुक्ततेचा विचार करत अस्वस्थ मनानं झोपी गेले. सकाळी बाहेरच्या रिंगणात दोघंही जोडीनं फेऱ्या मारत राहिले. भरभर चालता चालता दोघांच्याही विचाराची चक्रं फिरत होती. एवढ्यात रिंगणाबाहेरच्या झाडांवर बराच गोंधळ चालल्याचा आवाज ऐकायला आला. दोघांनी वर पाहिलं. माकडांचा दंगा चालला होता. ते पाहून संध्याच्या मनात वीज चमकून गेली. एवढ्यात जिभली चाटत राणा म्हणाला, ""भांडता भांडता ह्यातली
एक-दोन माकडं जरी खाली पडली, तरी आपली चैन होईल, नाही?''
""तुला नुसतं खाणं सुचतंय, अरे जरा विचार कर, माकडं झाडावर चढतात, तसं आपल्यालाही झाडावर चढता येतं. इथलं एखादं झाड जरी तसं उंच असलं, तरी आपण झाडावर चढून रिंगणाबाहेर उडी मारण्यात यशस्वी होऊ.''

दोघं आपला परिसर नीट न्याहाळायला लागले. आपल्या रिंगणात असलेल्या झाडांची उंची किती, जाडी किती याची तपासणी ते करायला लागले. बहुतेक सारी झाडे लहान. काही बऱ्यापैकी जाड पण सरळसोट गेलेली. ज्याच्या फांद्या रिंगणाबाहेर गेलेल्या आहेत, असं दोन वाघांचं वजन पेलू शकणारं जाडजूड झाड सापडत नव्हतं.
संध्याकाळपर्यंत विचार करून, सर्व बाजूंनी पाहणी करून ते पिंजऱ्यात परतले. काहीच मार्ग सापडला नव्हता.

दोघांना दररोज मांस देणारे बाबुकाका आल्याची चाहूल लागली तसे दोघे सावध झाले. लहानपणापासून राणाला बाबुकाकाच मांस द्यायचे. अगदी लहान असताना तेच राणाला बाटलीनं दूध पाजवायचे. संध्या आल्यापासून तिलाही तेच मांस द्यायला लागले. त्यांनी पहिला दरवाजा उघडला, पिंजऱ्याच्या दुसऱ्या कप्प्याचाही दरवाजा उघडून ते आले. त्यांनी मांसाचा ढीग ओतला आणि राणा व संध्या असलेल्या कप्प्याचा दरवाजा उघडला, दोघं बाहेरच्या कप्प्यात आले. राणा प्रेमानं त्यांचा हात चाटायला लागला.

""खा राणा, खा संध्या, पोटभर खाऊन घ्या. दिवसातनं एकदाच खायाला घालतो तुम्हांला लेकरानो...'' असं म्हणत त्यांनी राणाच्या पाठीवरून हात फिरवला.
दोघांचं खाणं झालं, मग काकांनी थाळ्यात दूध ओतलं, तेही त्यांनी चाटुनपुसून पिऊन टाकलं. त्यांचं झालेलं पाहिल्यावर बाबुकाका बाहेर पडले.

संध्या आणि राणा पाठमोऱ्या बाबुकाकांकडे पहात राहिले. ते गेल्यावर दोघांनी एकमेकाकडे सहेतूकपण पाहिलं. सकाळ झाली. पिंजऱ्याबाहेर येताच राणानं सारं शरीर ताणलं, तो ताजातवाना
झाला. संध्यानंही त्याचं अनुकरण केलं.
""संध्या आजही शोध घेत राहू. आज आपण रिंगणात सर्व बाजूंनी फिरून कुठं उंची कमी आहे का याचा तपास करू.''
संध्या म्हणाली, ""आजवर ह्याच रिंगणात आपण किती फेऱ्या मारल्या असतील त्याची काही गणती आहे का? याआधी आपल्याला तशी जागा कुठंच आढळून आलेली नाही.''
""आपण आजपर्यंत कधीच पळून जाण्याच्या दृष्टीनं रिंगणाची पाहणी केली नव्हती, म्हणून तशी जागा सापडली नव्हती. आता आपण तोच शोध घेत आहोत, तर नक्कीच तशी एखादी जागा सापडेल.''

फिरता फिरता ते आपल्या पिंजऱ्याची मागील बाजू कोठे येते हे पहायला गेले. चार-पाच फेऱ्या मारल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की, पिंजऱ्याची मागची बाजू एका मोकळ्या जागी उघडते आणि तिथली उंची कमी आहे. उंच गजांच्या रिंगणातून बाहेर निसटण्यासाठी बाहेरून काही संधी नसली, तरी पिंजऱ्यातूनच ती मिळेल असा विश्वास राणाला वाटायला लागला. पिंजऱ्याची पुढील बाजून रिंगणात उघडत असे आणि मागची बाजू मोकळ्या सपाट जागेत. पिंजऱ्यातून मागील बाजूला येता आले, तर मोकळ्या जागेतून कठडा ओलांडून निसटणं अवघड नव्हतं.

संध्या आणि राणा खेळण्याच्या निमित्ताने उंच आणि लांब झेप टाकण्याचा सराव करायला लागले. बघायला आलेल्या लोकांना तो कौतुकाचा विषय झाला होता.
संग्रहालयाचे कर्मचारीही ह्या जोडीचे खेळ पाहून चकित झाले. महिनाभराच्या सरावानंतर दोघांना आपलं वजन पेलून लांब आणि उंच झेप घेता यायला लागली.
दरम्यान दररोज संध्याकाळी बाबुकाका खाद्य घालायला कसे येतात, कोणता दरवाजा कधी उघडतात, कसा उघडतात, कसा बंद करतात याचं दोघांनीही बारकाईनं निरीक्षण सुरू ठेवलं होतं.

आताशा राणाप्रमाणे संध्याही बाबुकाकांशी लाडात येऊ लागली होती. त्यांना तिचाही लळा लागला. त्यांच्याबाबत ते थोड थोडे गाफील होऊ लागले. असेच एके दिवशी ते मांसाचा थाळा घेऊन आले. ठरवल्यानुसार राणा आणि संध्या दोघांनी खायला सुरुवात केली. आधी राणा कळवळल्यासारखं करून खाली लोळायला लागला.
त्याच्या पाठोपाठ संध्याही. बाबुकाका दोघांच्या पाठीपोटावरून हात फिरवायला लागले. तरीही दोघांचं कळवळणं थांबेना. हळुहळू दोघं निपचित पडले.
भयभीत बाबुकाका तसेच दरवाजे उघडे टाकून बाहेर धावत गेले. दोघांनी डोळे किलकिले केले. काका गेल्याचे पाहताच अंदाज घेत ते उठून उभे राहिले.
संध्या म्हणाली, ""चल ऊठ, घाई कर. ती बाहर पडली. तिच्या पाठोपाठ राणा!
पिंजऱ्याचे सगळे कप्पे ओलांडून ते बाहेर आले. समोर कमी उंचीची भिंत होती. राणाने आपल्या उडीचा अंदाज घेऊन एका झेपेत भिंत गाठली. त्याची उडी बरोबर भिंतीच्या कडेवर पडली होती. आपल्या नख्या घट्ट रोवून तो भिंतीवर उभा राहिला. त्याने मागे वळून संध्याकडे पाहिलं आणि पुन्हा वळून बाहेरच्या अंधारात झेप घेतली. पाठोपाठ संध्याही झेपावली. राणा वाट बघत थांबलेला दिसल्यावर तिनेही बाहेर उडी घेतली. प्राणी संग्रहालयाला जाग येण्यापूर्वी दोघंही जंगलात घुसले. सर्वस्वी अनोळखी जंगल, नव्या वाटा, कुठं जायचं,

कुठं रहायचं काही काही माहीत नाही. दोघं पळत राहिले. पळत राहिले. सारं जंगल सर्व बाजूंनी साद घालत होतं. पळून पळून किती अंतर कापलं कळत नव्हतं.
एका पाणवठ्यावर आल्यावर दोघांनी पाणी पिऊन घेतलं... आणि एका सुरात, एकसाथ स्वातंत्र्याची डरकाळी फोडली. वन खात्याच्या झाडात लावलेल्या कॅमेऱ्याने मात्र बोंडल्याच्या अभयारण्यात वाघाची जोडी फिरत असल्याची नोंद घेतली!

(ही कथा इथंच संपली. प्रत्यक्षात राणा आणि संध्या यांचं मीलन झालं होतं की नाही? तो पिंजरा आणि तो तेवढाच मर्यादित परिसर सोडून जंगलात पळून जायची त्यांची इच्छा होती की नाही? हे फक्त त्या सर्वशक्तिमान नियतीलाच ठाऊक. पण माझ्या कथेत जोडीनं जंगलात पळून जाण्यात यशस्वी झालेला राणा प्रत्यक्ष आयुष्यात आता हे जग सोडून गेलेला आहे. त्याची संध्या एकाकी राहिलीय. राणा नावाचा देखणा वाघ आता आपल्याला पुन्हा दिसणार नाही, एवढं खरं!) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rana gone - Shriram Pachindre blog