होऊन पक्षी...

रोहिणी भागवत
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

उंच आकाशात पक्ष्यांसारखी विहरत होते. खाली समुद्र अन्‌ वर आकाश. ती पाच मिनिटे चित्तथरारक वाटली.

उंच आकाशात पक्ष्यांसारखी विहरत होते. खाली समुद्र अन्‌ वर आकाश. ती पाच मिनिटे चित्तथरारक वाटली.

गोव्याला कोलम बीचवर पॅरासेलिंग पाहिले. पण आमच्या सोबतच्या कोणाची विशेष इच्छा नसल्याने मी चूप बसले. मात्र दुसऱ्या दिवशी कलंगुटला मी पॅरासेलिंग करायचेच ठरवले. पासष्टीच्या माझ्याबरोबर यायला एक तरुणीही तयार झाली. लाईफ जॅकेट्‌स घातली नि बोटीत जाऊन बसलो. आमची नाव समुद्रात बऱ्याच आतपर्यंत मध्यावर खोल पाण्यात बरेच अंतर कापीत गेली. तेथे दुसऱ्या नावेत आमची उचलबांगडी झाली. सभोवार लाटा वरखाली होत होत्या. दुसऱ्या नावेत आमच्या पायांना वेगवेगळ्या लुपमध्ये अडकवले. कमरेला जाळी लावून त्याचे हुक्‍स पॅराशूटच्या दोरीला अडकवले गेले. दोन्ही हातांनी पॅराशूटच्या दोऱ्या घट्ट पकडायला सांगितले आणि छत्री उघडून हळूहळू आकाशात उड्डाण सुरू केले. सभोवार खाली सर्वत्र अथांग महासागराचे पाणीच पाणी होते. उंच आकाशात एकीकडे आम्ही मुक्तपणे उत्तुंग भरारी मारीत होतो.

मनात भीती असल्याने एकीकडे देवाचे नाव सतत तोंडी होते. त्याच वेळी पक्षासारखे आकाशात विहार करीत असल्याचा आनंदही मनात होता. पाय अधांतरी लोंबत असल्यामुळे हातांची पकड जास्तच घट्ट होत होती. खालून नावाडी आम्हाला दोन्ही हात सोडायला खुणा करून सांगत होता. शेवटी एक हात सोडून त्याला बाय केला. घट्ट पकडून नंतर दुसऱ्या हाताने पटकन बाय केला होता. लांबवर दृष्टी टाकली असता काळी, निळी, लाल अशा रंगीबेरंगी छटा दिसत होत्या. तो किनारा असावा आणि लोकांच्या रंगीबेरंगी कपड्यांच्या त्या छटा असाव्यात हे लक्षात आले. पाच-सहा मिनिटांच्या या खेळात आम्ही दोघी वेगवेगळ्या स्वतंत्र पॅराशूटने भराऱ्या घेत होतो. पूर्ण वेळ अगदी "स्टॅच्यू' खेळातील पुतळ्याप्रमाणे आपापल्या दोऱ्यांना घट्ट धरून बसलो. शेवटी हळूहळू खाली उतरताच माझ्या जीवात जीव आला. नकळत मोठा सुस्कारा टाकला आणि पुन्हा मूळच्या नावेत बसलो. मनातील उत्सुकता, खुमखुमी पूर्ण झाली. मोठ्ठा पराक्रम केल्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावर होता. त्याचबरोबर पॅराशूटने उंच भरारी मारताना आम्हाला आमच्या बरोबरच्या कोणीच बघू शकले नव्हते याची खंतही वाटली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohini bhagwat write article in muktapeeth