आण्याची गोष्ट

रोहिणी भागवत
मंगळवार, 2 एप्रिल 2019

आयुष्यात कधीही समाधान व आनंद उसनवारीवर किंवा "क्रेडिट कार्ड'वर घेता येत नाही.

आयुष्यात कधीही समाधान व आनंद उसनवारीवर किंवा "क्रेडिट कार्ड'वर घेता येत नाही.

शाळेच्या मधल्या सुटीत आम्ही मैत्रिणी एकत्रच डबा खात असू. एकमेकींच्या डब्यातील भाजी-पोळीचा स्वाद घेण्याची मजा वेगळीच होती. शाळेसमोर फाटकाजवळ एक म्हातारी बोरे, चिंचा, पेरू, लिमलेटच्या गोळ्या विकत असे. तिच्याकडील मिठाची खारवलेली, उकडलेली बोरे खूपच चविष्ट असायची. एका आण्यात द्रोण भरून बोरे मिळत. आम्ही मैत्रिणी आलटून-पालटून पैसे आणून ती बोरे खायचो. त्या खारावलेल्या बोरांची चव आजही तोंडात रेंगाळत आहे. एका दुपारी मैत्रिणींनी आज तुझ्याकडूनच बोरे घेऊन खाणार, असे म्हणत हट्टच धरला. माझ्याजवळ पैसे नव्हते. तसे मी त्यांना सांगितले. दुसऱ्या दिवशी पैसे आणून बोरे नक्की देईन, असेही सांगितले. पण कोणीच ऐकेना. "आता आम्ही तुला पैसे उसने देतो व तू उद्या परत कर,' असे म्हणाल्या. माझ्या होकाराची वाट न पाहताच परस्पर बोरे आणून सर्वांनी खाल्ली.

घरी न सांगता परस्पर पैसे उसने घेऊन, खर्च करणे मला अजिबात पटले नव्हते. पण दुसऱ्या दिवसापर्यंत थांबण्याची मैत्रिणींची तयारी नसल्याने नाइलाज झाला. घरी आल्यावर शाळेच्या गमती सांगण्याचा रोजचा कार्यक्रम असायचा. त्यात आज बोरांची भर पडली. वडिलांना सत्य परिस्थिती सांगितली. माझ्या वतीने एका मैत्रिणीने पैसे दिल्याचेही सांगितले. वडिलांनी पैसे देताना एक मोलाचा कानमंत्रही दिला. ते म्हणाले, ""प्रश्‍न एका आण्याचा नाही, पैसे उसने घेण्याचा आहे. आयुष्यात कधीही उसनवारी करू नये. आपले अंथरूण पाहूनच नेहमी हातपाय पसरावेत.'' दुसऱ्या दिवशी शाळेत मी आधी त्या मुलीचा एक आणा परत केला आणि माझ्या मनावरचा ताण कमी झाला. आजच्या काळात बऱ्याचशा वस्तू "क्रेडिट कार्ड'ने खरेदी केल्या जातात व नंतर महिन्याला हप्ते भरले जातात. पूर्वी कमी उत्पन्नातही सगळे आनंदाने व समाधानाने राहात. मला बाबांनी दिलेला सल्ला पुरेपूर पटल्याने मी तो सदैव आचरणात आणला आणि त्यामुळे आनंदी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohini bhagwat write article in muktapeeth