सफर अमेरिकेची (मुक्तपीठ)

सफर अमेरिकेची (मुक्तपीठ)

अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसन्सधारकाला बारा पॉइंट्‌स दिले जातात. गुन्हा नोंदला गेल्यास संबंधिताचे पॉईंट कमी केले जातात. बॅलन्स शून्य झाल्यास संबंधिताचे लायसन्स जप्त केले जाते. दंड झाल्यास ऑनलाइन भरणा करावा लागतो, त्यामुळे तडजोड करणे किंवा चिरीमिरी देऊन प्रकरण मिटविण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही!

अमेरिकेला भेट देण्याचे स्वप्न मुलामुळे साकारले. विमानतळावर उतरल्यावर तो कारने नेण्यास आला होता. त्यामुळे सर्वप्रथम दर्शन घडले ते अमेरिकेतील शिस्तबद्ध वाहतुकीचे. रहदारीचे नियम असलेले फलक वाहनचालकांना स्पष्टपणे दिसतील अशा पद्धतीने सर्वत्र लावलेले होते. रस्ते चारपदरी, सहापदरी, तर काही ठिकाणी आठपदरी आहेत. खड्डे पडलेले रस्ते कुठेही आढळले नाहीत. प्रत्येक वाहनचालक लेनची शिस्त कसोशीने पाळतो. वाहतुकीचे सिग्नल चोवीस तास सुरू असतात. कोणीही सिग्नल तोडत नाही. पादचाऱ्यांसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला स्वतंत्र फुटपाथ असतात. त्यांच्यासाठीही स्वतंत्र सिग्नल असतो. रस्ता चौकातूनच ओलांडावा लागतो. नॅशनल हायवेवर कोठेही रस्ता एकमेकांना "क्रॉस‘ होत नाही. हायवेबाहेर पडावयाचे असल्यास तीन मैलांवर "एक्‍झिट रोड‘ असतो. त्याची पूर्वकल्पना अर्धा मैल अगोदरच देण्यात येते. तेथे पेट्रोल पंप, रेस्ट रूम आणि हॉटेल्सची व्यवस्था असते.

ऍटलांटा ते रिचमंड हा 530 मैलांचा प्रवास आम्ही अवघ्या साडेदहा तासांत पूर्ण केला. प्रवासात अजिबात शीण आला नाही. कोठेही गाड्यांचा खडखडाट नाही, की हॉर्नचा आवाज नाही. रस्त्याकडेला कार थांबवून माणसे लघुशंका करीत आहेत, असे दृश्‍य कोठेही दिसले नाही. "लेफ्टहॅण्ड ड्राइव्ह‘ची पद्धत असल्यामुले डाव्या बाजूच्या गाड्या ताशी 120 किलोमीटर वेगाने धावत होत्या. नॅशनल हायवेवर उजव्या आणि डाव्या बाजूने सर्व्हिस रोड असतो. तेथे दीड फुटी स्लॉटेड पट्टा म्हणजे "साइड पट्टी‘ असते. प्रवासात एकाच ठिकाणी टोलनाका लागला. सर्व गाड्यांची नोंद सिग्नलप्रमाणे बसविलेल्या कॅमेऱ्यात होत होती. पावती, पैसे देणे-घेणे इत्यादीविषयक वादावादी अजिबात होत नव्हती.

महत्त्वाची बाब म्हणजे, डाव्या बाजूने जाणाऱ्या गाड्या नेमून दिलेल्या वेगानेच जात होत्या. ट्रॅफिक जाम असल्यास कोणीही सर्व्हिस रोडमधून गाडी पुढे घालण्याचा प्रयत्न करीत नव्हता. हायवेवर यदाकदाचित अपघात झाल्यास त्याची पूर्वसूचना डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून दोन-तीन मैल अगोदरच दिली जाते. हायवेवर घाटात एखादा निसर्गरम्य पॉइंट असल्यास त्याची पूर्वकल्पनादेखील एक-दीड मैल अगोदरच माध्यमातून दिली जाते. त्या ठिकाणी कार-पार्किंगसाठी प्रशस्त जागा असते.

अमेरिकेत शहरी भागांत ऑटोमॅटिक पार्किंग बूथ आहेत. बूथमधील कॉइन बॉक्‍समध्ये नाणे टाकून कार पार्क करता येते. पेट्रोलपंपावर स्वतःच पेट्रोल-हवा भरावी लागते. सर्व व्यवहार क्रेडिट कार्डद्वारे होतात. कोणीही सिग्नल तोडला किंवा अतिवेगाने कार चालविली तर त्या व्यक्तीचे लायसन्स पाहून पूर्वेतिहास कॉम्प्युटरवर पाहिला जातो. प्रत्येक ड्रायव्हिंग लायसन्सधारकाला बारा पॉइंट्‌स दिले जातात. गुन्हा नोंदला गेल्यास संबंधिताचे पॉइंट कमी केले जातात. बॅलन्स शून्य झाल्यास संबंधिताचे लायसन्स जप्त केले जाते. दंड झाल्यास ऑनलाइन भरणा करावा लागतो, त्यामुळे तडजोड करणे किंवा चिरीमिरी देऊन प्रकरण मिटविण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही!

शालेय विद्यार्थ्यांसाठी पिवळ्या रंगाच्या मोठ्या बसेस असतात आणि त्यावर "स्कूल बस‘ असे ठळक अक्षरात लिहिलेले असते. बसच्या चारही बाजूंना पिवळ्या रंगाचे दिवे आणि कॅमेरे लावलेले असतात. मुले उतरत असतात, त्या वेळी चारही बाजूचे दिवे उघडझाप करीत असतात. बसमधून मुले उतरत नाहीत, तोपर्यंत दोन्हीकडील वाहतूक पूर्णपणे थांबवली जाते. लहान मूल गाडीत असल्यास "बेबी ऑन बोर्ड‘ फलक गाडीवर लावणे बंधनकारक आहे. सर्व प्रवासी खासगी वाहनांना दरवर्षी पासिंग करावे लागते. वाहनाचे पासिंग दोन तासांत केले जाते; त्यासाठी कोठेही एजंटची गरज भासत नाही. सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व बसेस, ट्रकच्या केबिनसुद्धा वातानुकूलित असतात. प्रवासी सिटी बसेस विनावाहक असून, ड्रायव्हिंगची कामे महिला करीत असतात.. आपल्या देशात अशी वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, तो सुदिन असेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com