आईचे मंगळसूत्र

आईचे मंगळसूत्र

आईने मंगळसूत्र विकून मला शिकण्यासाठी पुण्याला पाठवले. तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. माझे यश, कीर्ती, सामाजिक स्थान हे सगळे मंगळसूत्रातील त्या सोन्याच्या मण्यांच्या बदल्यात मिळाले आहे.

माझी आई पंढरीची वारकरी होती. दरवर्षी दिंडीतून मला सोबत घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जात असे. रामायण, एकनाथी भागवत, एकादशी माहात्म्य व हरिपाठ वाचून दाखवायला आई मला आग्रहाने सांगत असे. मी वाचन करीत असताना ती अगदी एकाग्र मनाने ऐकत असे. तिने माझ्यावर पुष्कळ धार्मिक संस्कार केले. खरे तर आईच माझी आध्यात्मिक गुरू आहे.

आई स्वभावाने तापट वाटायची. पण प्रत्यक्षात ती शिस्तप्रिय, मनाने प्रेमळ व हळवी होती. गावाकडे त्याकाळी धूलिवंदनाचा कार्यक्रम मोठा होत असे. शाळेत असताना एका वर्षी मीही धूलिवंदनाच्या कार्यक्रमात सामील झालो. त्या दिवशी आम्ही सगळे मित्र गाढवावर बसून सगळा गाव फिरलो. आईला हे कोणीतरी सांगितले. ती खूप संतापली होती. मी घरी येण्याची वाट पाहत होती. मी घरी आल्यानंतर मला चपलीने बडवले. मी रडू लागलो आणि पुन्हा गाढवावर बसणार नाही असे तिला वचन दिले. थोड्या वेळाने तिने मला मायेने पोटाशी धरले व स्वतःही रडू लागली. असला वात्रटपणा करायचा नाही हे बजावून सांगितले. तेव्हापासून, माझ्यात फरक पडून मी स्वभावाने गंभीर झालो.

एखादा प्रसंग आपल्या जीवनात इतका खोलवर रुतून राहतो, की वर्षे उलटून गेली तरी तो तसाच्या तसा अगदी तपशिलांसह डोळ्यासमोर उभा राहतो आणि मन भरून येते. डोळे पाणवतात. 1968 मध्ये मी बी.एस्सी. प्रथम वर्षाची परीक्षा देऊन बीड जिल्ह्यातील धारूर या माझ्या गावी गेलो. सुटी संपत आली. पुन्हा पुण्याला जाऊन महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला प्रवेश घ्यायचा होता. प्रवेश घ्यायला पैसे नव्हते. आईने अनेकांकडे पैशाची विचारणा केली, पण उत्तर प्रत्येकाकडून नकारात्मक मिळाले. माझा धीर खचत गेला, परंतु आईने हिंमत सोडली नाही. आपल्या मुलांचे भवितव्य हे केवळ शिक्षणामुळे घडणार आहे, ही तिची पक्की धारणा होती. तिने फार मोठा निर्णय घेतला. माझ्या हातात तिचे गळ्यातले मंगळसूत्र ठेवत म्हणली, ""सखा, हे घे माझे मंगळसूत्र, यातील सोन्याच्या चार पुतळ्या मोड आणि तुझी शिक्षणाची फी भर.'' हा अनुभव माझ्यासाठी इतका अनपेक्षित होता की काय करावे ते सुचेना. आईचे मंगळसूत्र विकणे म्हणजे माझ्यासाठी जणू पापच! हे पाप करायला मन धजेना आणि आई काही मागे हटेना. शेवटी आई स्वतःच सोनाराकडे गेली, चार पुतळ्या विकल्या, मला पैसे दिले आणि माझी शिक्षणाची गाडी पुढे सुरू राहिली.

बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण म्हणजे संघर्षाची मालिका होती जणू, माझा जन्म एका खोपटीत झाला. निश्‍चित तारीख माहीत नाही. तेव्हा गावात प्लेगची साथ आली होती. त्यावरून फेब्रुवारी 1949 हा महिना असावा. घरात अठरा विश्‍व दारिद्य्र. पोटपूजा करण्यासाठी आई बरबड्याचे दाणे दळून त्याची भाकरी करून देत असे. गाय-बैलांना चरण्यासाठी न्यायचे आणि येताना त्यांच्या पाठीवर बसून यायचे. त्यांची पाठ ही माझी पहिली पाटी होती. अक्षरांचा आणि अंकांचा श्रीगणेशा तिथे झाला. हळूहळू अभ्यासाची गोडी वाढली. माझा मधला भाऊ मारुती वडिलांना म्हणाला, ""सखाला शाळेत घातल्यास तो चांगला शिकेल.''

शाळेत जायला सुरवात करायलाच उशीर झालेला होता. मग पहिली व दुसरी आणि तिसरी व चौथी अशा दोन-दोन वर्षांचा अभ्यास एकाच वर्षात पूर्ण केला. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेत पहिला आलो. त्याची साठ रुपये शिष्यवृत्ती मिळाली; या शिष्यवृत्तीच्या बळावर दहावीपर्यंत शिकलो. शाळा सुटल्यावर शेतात जात असे. शेतातील गवत वेचून त्याचा भारा बांधायचा आणि गावात विकायचा. या पैशांचीही शिक्षणासाठी मदत झाली. दहावीला पुन्हा शिष्यवृत्ती मिळाली व थेट पुण्यात आलो. पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. व पुढे संख्याशास्त्रात पीएच.डी. संपादन केली. या सगळ्या प्रयत्नात तो आईचा मंगळसूत्र विकण्याचा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या आयुष्यातला "टर्निंग पॉइंट' म्हणा ना! तिने हे धाडस दाखवले नसते तर मी आज कुठे असतो? माझे शिक्षण, पैसा, पत, जनसंपर्क, स्वास्थ्य या साऱ्या गोष्टी मला मिळाल्या असत्या का? माझा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय झाला असता?

आईच्या ऋणातून किंचितही उतराई होता येत नाही. तिला आनंद वाटेल असे काही तरी तिच्यासाठी करणे एवढेच तुमच्या हाती असते. म्हणून मी तिला दरवर्षी गोंदवल्याला नेत असे. तिथेही ती एकच मागणे मागत असे आणि ते म्हणजे "खूप छान आयुष्य गेले, आता आनंदाने मृत्यू यावा.' महाराजांनी तिचे मागणे मान्य केले. आयुष्याची शतकी खेळी हसतहसत कोणत्याही आजाराविना पूर्ण करून आईने लौकिक जगाचा निरोप घेतला. शेवटपर्यंत ती स्वतःची कामे स्वतःच करीत होती. मला शिक्षणाच्या पालखीत बसवून स्वतः ती महाराजांच्या दर्शनासाठी निघून गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com