तमिळनाडूत राजस्थान

सलाउद्दीन रमजानसाहेब वकील
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पोटासाठी माणूस स्थलांतर करतो. दक्षिणेतील एका छोट्या गावी राजस्थानातील व्यापारी समाजाने वस्ती केलेली आढळली.

पोटासाठी माणूस स्थलांतर करतो. दक्षिणेतील एका छोट्या गावी राजस्थानातील व्यापारी समाजाने वस्ती केलेली आढळली.

खडकवासला येथील "केंद्रीय जल तथा विद्युत अनुसंधान शाला'मध्ये सेवेत होतो. चेन्नईपासून अडीचशे किलोमीटरवरच्या कुडनकुलम येथील इंदिरा गांधी अणुशक्ती केंद्र येथे सर्व्हेक्षण करण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. केंद्राचा परिसर सुमारे दीड हजार एकराचा. झाडांनी व्यापलेला समुद्रकिनारा. परिसराबाहेर समुद्राकाठी एक छोटी वस्ती. बाकी सारा परिसर निर्मनुष्य. अणुभट्टीलगत असलेल्या समुद्रामध्ये वेगवेगळ्या तीन-चार ठिकाणी एका छोट्या होडीत बसून ठराविक वेळेच्या अंतराने समुद्राच्या पाण्याचे तापमान मोजण्याचे काम सहकारी करीत असत. या नोंदी सलग घ्याव्या लागत असल्याने कोणीही आपली जागा सोडून जाऊ शकत नव्हता.

सहकाऱ्यांना लागणाऱ्या गोष्टी, जेवणाचे डबे नेऊन पोचविणे इत्यादी कामे माझ्याकडे होती. सर्व परिसर नारळाची झाडे व विरळ वस्तीचा होता. जवळपास दुकाने अथवा बाजारपेठ नव्हती. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेची अडचण होती. हिंदी किंवा इंग्रजी बोलणारी व्यक्ती क्वचितच मिळे. कोणत्याही समाजाचा वा धर्माचा असो, तो फक्त तमीळ भाषेतच बोले, त्यामुळे बरेच वेळा मला दुभाषाची मदत घ्यावी लागे.
एक दिवस साहेबांनी हार्डवेअरच्या काही वस्तू, इतर काही गोष्टी खरेदी करून आणण्यास सांगितले. वस्तीपासून वीस किलोमीटर दूर एका छोट्या गावी बाजारपेठ होती. जीप घेऊन त्या छोट्या गावी गेलो आणि मी अचंबित झालो. एवढी मोठी बाजारपेठ! त्याहून आश्‍चर्य म्हणजे सर्व बाजारपेठेत मारवाडी स्त्री-पुरुष त्यांच्या पारंपरिक वेशात वावरताना दिसले. पुरुष बाराबंदीचे सदरे व धोतर नेसलेले, डोक्‍यावर तांबडी पगडी, तर स्त्रिया घागरासाडी आणि घुंघट परिधान केलेल्या. मला क्षणभर वाटले, की मी राजस्थानात आलो की काय? बाजारपेठेत कापडाची, सोन्याचांदीची, पादत्राणाची, स्टेशनरीची, हार्डवेअरची, भांड्यांची, औषधांची इत्यादी मोठमोठी वा किरकोळ चांगली सजवलेली दुकाने पाहून मला फार आश्‍चर्य वाटले. या समाजाने उत्तरेकडच्या राजस्थानपासून हजारो मैल प्रवास करून दक्षिणेकडच्या या छोट्या गावात, पूर्णतः अपरिचित तमीळ भाषकांत येऊन व्यापारात बस्तान कसे बसविले असेल?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salahuddin ramjansaheb wakil write article in muktapeeth