बाप-लेकीचं नातं

बाप-लेकीचं नातं

आमचं खरं नातं सासरे व सून असं; पण त्यांची मी कधी लेक होऊन गेले मलाही कळलं नाही.

माझ्या सासऱ्यांना जाऊन वर्ष झालं. पण वाटतं की, ते पलंगावर झोपले आहेत. कधीही हाक देतील. कारण काही वर्षे आजारांनी त्यांची पाठ सोडली नव्हती आणि जाण्यापूर्वी दोनएक वर्षे पलंग हाच त्यांचा सोबती झाला होता.

खरं तर पाटणकरांच्या घरात सून म्हणून प्रवेश केला. तेव्हा कुठल्याही मुलीच्या मनात असते तशी हुरहूर माझ्याही मनात होती, की घरातली माणसं कशी असतील; पण सासरीही आईवडीलच मिळाले आहेत हा विश्‍वास आई-बाबांनी माझ्या मनात निर्माण केला. आई-बाबा आणि मंदार-मी अशी आमची एक छान चौकट तयार झाली आणि त्या चौकटीत रंग भरण्याचा एक छान योग माझ्या लग्नानंतर लगेचच जुळून आला. तो म्हणजे आमच्या बाबांची एकसष्टी. आतापर्यंत त्यांची खाण्याची, खिलवण्याची खूप प्रमाणात हौसेनं करण्याची, प्रत्येक कार्यात उत्साहानं भाग घेण्याची आवड माझ्या लक्षात आलीच होती. त्या दिवशी इतरांनी सांगितलेले अनुभव ऐकून माझ्या मनातील त्यांची प्रतिमा अजून उंचावली. त्यांची भाज्यांची आवड लक्षात घेऊन केलेल्या भाज्यांच्या हाराचे त्यांनी मनापासून कौतुक केलं.

पण सगळे दिवस सारखे नसतात. याचा प्रत्यय आला तो मंजिरीच्या म्हणजे माझ्या नणंदेच्या अकाली मृत्यूनं. हा आघात पचवणं सगळ्यांसाठीच अवघड होतं. बाबांना ते विशेषत्वानं जड गेलं आणि त्यांच्या आयुष्याची गाडी उताराला लागली ती कायमचीच. मानसिकदृष्ट्या खचलेल्या बाबांवर अनेक शारीरिक आघातही झाले. सुरवातीला बायपासची शस्त्रक्रिया, खांद्यावर शस्त्रक्रिया, स्पॉंडीलायटीस व शेवटी कंपवातानं त्यांना कवेत घेतलं. हा सगळा काळ आमची परीक्षाच बघणारा होता. विशेषत्वानं आईसाठी. त्या काळात आईचं सार विश्‍वच बाबांभोवती एकवटलं गेलं होतं. अबोलपणे त्या बाबांच्या सरबराईत मग्न असायच्या. मी घरूनच काम करत असल्यानं आई-बाबा व मी असं एक छान त्रिकूटच तयार झालं होतं. बाबांचा आजार आता बरा होण्यातला नाही. त्यामुळे काळजी घेऊन तो आटोक्‍यात ठेवणंच आमच्या हातात आहे म्हटल्यानंतर आम्ही एक ठरवून टाकलं की, घरातलं वातावरण आनंदी ठेवायचं.
बाबांच्या आजारपणामुळे आमच्यात असूनही ते आमच्यात नसायचे. आतापर्यंत सतत वर्तमानकाळात असणारे बाबा अलगदपणे भूतकाळात जायचे. वर्तमानकाळ ते भूतकाळ यातला प्रवास अगदी श्‍वासातल्या सहजतेनं व्हायचा. त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे त्या काळात बिनीची ठरणारी बॅंकेची नोकरी त्यांनी स्वीकारली आणि शेवटपर्यंत स्टेट बॅंकेशी असलेली नाळ तुटलीच नाही. बॅंकेतील आठवणी हा त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होता. बॅंकेतील सहकाऱ्यांना मनापासून मदत केल्याने बॅंकेतला मित्र परिवारही त्यांना सतत भेटायला येत असे. लेडीज स्टाफपैकी कोणी आलं, की आम्ही आज बाबांची "गर्लफ्रेंड' आली होती म्हणून चिडवायचो. बऱ्याच वेळेला ते एकटेच कुणाशी तरी बोलत बसलेले दिसायचे. कोणाशी बोलता, विचारले की कुठली तरी अगम्य नावं सांगायचे. मग त्यांच्या या भासांना आम्ही "मिस्टर इंडिया' असं नाव ठेवलं होतं. बऱ्याच वेळा बाबा पलंगाच्या टोकावर दोन्ही हात टेकवून बसायचे. ते थेट माधुरी दीक्षितच्या "देवदास'मधील "मार डाला'च्या पोजसारखे.
ते तसे बसले की, आम्ही त्यांना चिडवायचो, ही चेष्टा-मस्करी त्यांना कितपत कळायची माहीत नाही; पण खुदूखुदू हसायचे खरे. मला सतत कामाचे फोन येत असत. ते सगळं बोलणं ते ऐकत आणि मी फोनवर कशी बोलते याची नक्कल करून दाखवत. कुठे तरी शून्यात नजर लावून बसलेले बाबा एकदम बॅंकेच्या व्यवहाराबद्दल, गुंतवणूकीबद्दल बोलायला लागत. आईचं वय व मंदारच्या कामामुळे बाबांच्या व्यायामाची जबाबदारी मी घेतली होती. त्यांच्याकडून व्यायाम करून घेणं म्हणजे एक दिव्यच होतं. कधी त्यांना अत्यंत प्रिय जिलेबी आणण्याचं आमिष दाखवत, तर कधी चक्क डॉक्‍टरांना सांगण्याची धमकी देत ते काम पार पाडावं लागायचं.

खूप वेळेला तोंडातून गळणाऱ्या लाळेचं त्यांना भान नसे. अशा वेळेला जशी सार्थकचं म्हणजे माझ्या मुलाचं तोंड मी स्वच्छ करते त्याच सहजतेनं मी बाबांचं तोंडही स्वच्छ करत असे; पण यामुळं एक झालं की, त्यांच्यातलं आणि माझ्यातलं सासरा-सून हे नातं फिकट होता होता वडील-मुलगी हे नातं गडद होतं गेलं. आम्ही फिरायला गेलो की, अनेकांना आम्ही बापलेकच वाटायचो. छोट्या सार्थकलाही ते आपल्या बरोबरीचेच वाटायचे. त्यांच्याकडून काहीच प्रतिकार नसल्यानं त्यांच्या खोड्या काढणं हा त्याचा आवडता उद्योग. नातवाला खेळवणं हे कुणाही आजोबांचं स्वप्न असतं. त्या अर्थानं बाबा सार्थकला कधीच खेळवू शकले नाहीत. पण तो सतत त्यांच्या मनात असायचा.
बाबा आज पुनःपुन्हा आठवत आहेत. एवढंच सांगावसं वाटतं की, बाबा तुम्ही खूप लांबच्या प्रवासाला निघून गेलात. पण आठवणींच्या रूपात कायमच आमच्याबरोबर आहात आणि राहाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com