ब्रह्मानंदी लागली टाळी

ब्रह्मानंदी लागली टाळी

विवाहानंतर सात वर्षांनी सासरच्या उत्सवाला प्रथमच जाणं हे आपल्या संस्कृतीत ऑडच. पण तसं घडलं खरं. उत्सवाला हजेरी लावल्याच्या क्षणापासून मी गावाच्या आणि उत्सवाच्या प्रेमात आहे. मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी-कोल्हापूर राज्य महामार्गाच्या मधल्या त्रिकोणात वसलेलं खानू गाव. त्यातलं भवानी गांगेश्वराचं देऊळ आणि त्रिपुरी उत्सव हा उर्जेचा स्रोत आहे. म्हणूनच असेल सहाव्या वर्षापासून माझ्या मुलाला उत्सवाची गोडी लागली ती उत्तरोत्तर वाढतेच आहे. 

विवाहानंतर सात वर्षांनी सासरच्या उत्सवाला प्रथमच जाणं हे आपल्या संस्कृतीत ऑडच. पण तसं घडलं खरं. उत्सवाला हजेरी लावल्याच्या क्षणापासून मी गावाच्या आणि उत्सवाच्या प्रेमात आहे. मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी-कोल्हापूर राज्य महामार्गाच्या मधल्या त्रिकोणात वसलेलं खानू गाव. त्यातलं भवानी गांगेश्वराचं देऊळ आणि त्रिपुरी उत्सव हा उर्जेचा स्रोत आहे. म्हणूनच असेल सहाव्या वर्षापासून माझ्या मुलाला उत्सवाची गोडी लागली ती उत्तरोत्तर वाढतेच आहे. 

देऊळ शंकराचं, त्यामुळे गावाबाहेर. घरापासून एक-दीड किमी दूर. त्यामुळे शिस्त संपूर्ण उत्सवात दिसते. अगदी आरती सुरू करायच्या वेळेपासून ते आरत्यांच्या क्रमवारीपर्यंत. ठरलेल्या वेळी ठरलेल्या आरत्या ठरलेल्या क्रमाने ठरलेल्या चालीतच होणार. एवढंच काय, पण देवळाभोवती होणाऱ्या भोवत्यातील गजर आणि आरत्याही ठरलेल्या. अनेक उत्सवात बहुतेक ठिकाणी ‘कर्पूर गौरं करुणावतारम्‌ नंतर सुखकर्ता दुःखहर्ताने आरत्यांना सुरुवात होते. आमच्याकडे ‘आवडी गंगाजळे देवा न्हाणिले’ या विष्णुच्या आरतीने आरंभ. शंकराचे देवळात आरतीचा पहिला मान विष्णूचा. उत्सवातला मुख्य सोहळा तुळशी लग्नाचा. हा जसा देवांच्या बाबतीत सर्वसमभाव तसाच माणसांमधेही. उत्सवात विविध जातींची माणसे सहभागी होतात. एकमेकांच्या कामात ढवळाढवळ नाही.

कार्तिकी एकादशीपासून सुरू होणा-या उत्सवात मुख्य दिवस त्रिपूरीचा. दुपारी महाप्रसाद, रात्री दहा ते बारा गावक-यांचं सुरेल भजन. रात्री बारानंतर सुरू होतो तो त्रिपूर पूजन आणि तुलसी विवाह. शंभर-दीडशे पणत्या, त्रिपूर आणि परिसरात उजळतात. मग रितसर देवक वगैरे ठेवून तुलसी विवाह सुरू. ढोल, ताशे वाजंत्रीच्या गजरात बाळकृष्ण मिरवणुकीने विवाहासाठी येतात. मागे करे-दिवे घेउन सजलेल्या करवल्या. 

एकतर निबीड रानात देऊळ. बाजूलाच वन खात्याची रोपवाटिका आणि जैव विविधता उद्यान त्यामुळे रानाचा गर्दपणा अधिकच वाढलेला असतो. पौर्णिमेचा चंद्र माथ्यावर. सगळे प्रखर दिवे मालवलेले. चांदण्याचा चुरा आसमंतात उधळलेला. गूढरम्य अशा वातावरणात लग्न लागते. त्यानंतर आरत्या आणि भोवत्या.

प्रत्येक भोवतीत आबालवृद्ध स्त्री पुरुष गोलाकार रिंगण करुन मनसोक्त नाचतात. विठूचा गजर हरीनामाचा, ज्ञानेश्वर माउली, श्रीमन्‌ नारायण, ब्रह्मानंदी लागली टाळी, या या जेजुरी नगरात अशा गजरांवर तरुण मंडळी इतक्‍या विविध आणि लालित्यपूर्ण पदन्यास करतात की नजर ठरत नाही. रिंगणाच्या मध्यावर तबला, पेटी, मृदुंग आणि गायक हे सगळे लाइव्ह परफॉर्म करतात. गाणारी वाजवणारी सगळी गावातीलच तरुण मंडळी. त्यामध्ये रिक्षावाले शिंदे काका आणि त्यांचे चिरंजीव यांची मक्तेदारी. ब्रह्मानंदी लागली टाळी या एका गजरात ते इतक्‍या गजरांची गुंफण करतात पण समेवर येताना पुन्हा ब्रह्मानंदी लागली टाळीवर. यावर्षी शेजारच्या गावातले दहा-पंधरा मित्र खास नाचण्यासाठी आले होते. 

या वर्षीच्या उत्सावात अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग घडला. एका ग्रामस्थाचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साजरा झाला. पुरोहितांनी अभिष्टचिंतनपर मंत्र म्हणून सुवासिनींनी एकावन्न दिव्यांनी त्यांचं औक्षण केलं. साऱ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. साऱ्या गोष्टींच्या ध्वनींचा, आवाजाचे महत्त्व अशासाठी की ज्यांचा वाढदिवस साजरा झाला त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी फक्त ध्वनीच उपयुक्त होता, कारण दुर्दैवाने ती व्यक्ती जन्मांध आहे. (जो रुग्णाइत नेत्रांचा, दीपोत्सव त्याते कैचा, या माडगूळकरांच्या ओळी मला पुन्हा पुन्हा आठवत होत्या.) नक्कीच त्यांच्या आयुष्यातला हा एक अविस्मरणीय क्षण ठरला.

उत्सवांना उन्मादी रूप न येता असे उत्सवी रुपच कायम राहिले, उणीदुणी निघाली नाहीत तर असा आनंदमेळा नाही. पूर्वजांनी उत्सव सुरू करण्याचे महत्त्व अशावेळी जाणवतं. वर्षभराचं कंटाळवाणं रहाटगाडगं ओढायला लागणारी उर्जा यातून नक्कीच मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com