लवकर निजे, लवकर उठे....

लवकर निजे, लवकर उठे....

डॉक्‍टरांनी मुलं कधी झोपतात, हे विचारल्यानंतर मला तर धक्काच बसला. त्यांनी मुलांनी लवकर झोपण्याची केलेली शिफारस अमलात आणायला गेले, अन्‌ त्याची महतीही प्रत्ययाला आली...

आपल्याकडे "लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे' अशी किती साधी सोपी म्हण आहे. पण ती कायम पुस्तकापुरतीच मर्यादित होती. शाळेत असताना आयुष्यच आईच्या ताब्यात होते. तेव्हा तिच्या धाकाने का होईना, म्हणीचं आचरण होत होतं. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर पूर्णपणे लवकर झोपणं गायबच झालं. सकळी लवकर उठून अभ्यास कधी जमलाच नाही, जमला नाही म्हणण्यापेक्षा कधी करावासाच वाटला नाही. मग लग्न, नोकरी, मुलं यांत तर अठरा तासांचा दिवस आणि सहा तासांची रात्र हे समीकरण ठेऊनसुद्धा कामं संपेनाशी झाली. आपलं काहीतरी चुकतंय, ही बोच होतीच मनाला. माझी मुलं पण माझ्यासारखीच. रात्री जागणारी. काही मुलांना लवकर झोपायची सवय असते, पण माझी मुलं न कळत्या वयापासूनच, दामटून झोपवल्याशिवाय न झोपणारी. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा आहे म्हणून दहा वाजेपर्यंत का होईना मीच त्यांना झोपवायची. गाणी, गोष्टी सांगून झोपवण्यापासून ते रागावून, ओरडून, भीती दाखवून झोपवण्यापर्यंत सगळे प्रयत्न करून बघितले. पण "लवकर निजे...' ही म्हण काही त्यांच्या आयुष्यात उतरायला तयार नव्हती.

सुमारे दोन वर्षांपूर्वी युरोपला येईपर्यंत ही अशीच स्थिती होती. युरोपमध्ये आल्यावर मुलांच्या पहिल्या जनरल चेकपवेळी डॉक्‍टरचा प्रश्‍न. मुलं किती वाजता झोपतात? डॉक्‍टर असे प्रश्‍न विचारतात हे ऐकून आधी मला आश्‍चर्य वाटलं आणि माझं दहा वाजता, हे उत्तर ऐकून डॉक्‍टरला आश्‍चर्याचा धक्काच बसला. ज्या युरोपमध्ये लहान मुलांनी आठच्या आधी झोपलं पाहिजे, असं मानतात; त्यांच्या दृष्टीने दहा म्हणजे मध्यरात्रच नाही का? पुढच्याच क्षणी डॉक्‍टरचं सडेतोड वाक्‍य माझ्या कानी पडलं, "मुलांची सवय बदलली पाहिजे. उशिरा झोपणं इथं चालत नाही. आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.'

सांगणं सोपं आहे हो! पण इतके प्रयत्न करून मला जे जमत नव्हतं, ते डॉक्‍टरच्या सांगण्याने बदलणार का होतं? फरक एवढाच होता, की आता सोनारानेच कान टोचल्यामुळे पुन्हा प्रयत्न करण्याचा उत्साह आला. युरोपमध्ये राहायला लागल्यावर एक गोष्ट जाणवली, की इथं लहान मुलंच नाही, तर मोठी माणसंही लवकर झोपतात. मग मी हा प्रयोग करायचं ठरवलं. सुरवात जेवणाच्या वेळेपासून केली. युरोपीय लोकांप्रमाणे संध्याकाळी साडेसातला जेवण आणि साडेआठला झोप. मीही मुलांबरोबर लवकर झोपायला लागले. अगदी साडेआठला नाही, तर निदान साडेनऊला तरी. सुरवातीला सगळ्यांसाठी अवघड गेलं, पण आपल्याबरोबर आई लवकर झोपते, हे बघून मुलं स्वखुशीने लवकर झोपायला लागली. माझ्यासाठी मात्र ते कठीणच होतं. नुसतं गादीवर लोळत पडण्यापेक्षा काहीतरी काम करावं, असा मोह व्हायचा. पण कष्टाने त्यावर विजय मिळवला. अर्थात या सगळ्यात मला सर्वांत जास्त फायदा झाला, युरोपमधल्या थंडीचा आणि संध्याकाळी सहा वाजताच होणाऱ्या सूर्यास्ताचा. लवकरच्या काळोखामुळे मुलांना आपण काही वेगळं करतोय, असं वाटलंच नाही. मुलं आईचं किती अनुकरण करतात, हेही यामुळे मला प्रकर्षाने जाणवलं.

लवकर झोपण्याचे माझे प्रयत्न बघून, मुलांचाही उत्साह वाढला आणि प्रयत्नांना यश आलं. "लवकर निजे लवकर उठे' या म्हणीने हळूहळू आमच्या आयुष्यात प्रवेश केला. सकाळी अर्धवट झोपेतून उठून शाळेत जाणारी माझी मुलं आता पूर्णपणे खडखडीत जागी होऊन जात होती. अभ्यासावर त्याचा चांगला परिणाम जाणवला. या बदलामागे युरोपीय कार्यपद्धतीचा घारीचा वाटा होता, असंच मी म्हणेन. इथं आल्यापासून नवरा संध्याकाळी लवकर घरी यायला लागला. अर्थात, काही दिवसांचा अपवाद वगळता, त्याच्या वेळेत घरी येण्यामुळेच लवकर जेवून, लवकर झोपणं शक्‍य झालं होतं. आपल्याला भारतीय संस्कृती, एकत्र कुटुंबपद्धती, लग्नसंस्था यांचा अभिमान असतो, असायलाच हवा. पण या कुटुंबात जी माणसं असतात, त्यांना एकमेकांच्या वेळेचीही तितकीच गरज असते, हे आपण विसरत चाललोय. काहीच्या बाही कामाच्या वेळा, येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ यात आपल्याकडच्या माणसाला स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी वेळच उरत नाही.

इथं उद्या सकाळी सात वाजता मिटिंग आहे, हे ऐकून पहिल्यांदा मला आश्‍चर्यच वाटलं होतं, नंतर समजलं, की इथल्या माणसांचा दिवस सकाळी लवकर चालू होतो आणि संध्याकाळी वेळेवर संपतो. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मीटिंग, हे दोन वर्षांत खूपच कमी वेळा ऐकलं मी. जे भारतात असताना माझ्यासाठी अगदीच नॉर्मल होतं.

इथल्या माणसाला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी द्यायच्या वेळेचं महत्त्व पटलंय आणि म्हणून त्यांनी ते आपल्या जीवनात नीट सामावूनही घेतलंय.
युरोपमधली दुकानंही संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान बंद होतात. इथली माणसं साडेसातला रात्रीचं जेवण करतात आणि लवकर झोपतात. आपल्या पूर्वजांनी लवकर झोपून लवकर उठण्याचं महत्त्व सुंदर पद्धतीने सांगितलंय. लवकर उठण्यासाठी "काकड आरती'सारख्या धार्मिक विधीचं निमित्तही दिलंय. आता आपल्याला त्याचं शास्त्रीय महत्त्वही कळतंय. मग पाश्‍चात्त्यांचे कपडे, त्यांचं मोकळं ढाकळं वागणं, व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पना यांचं अंधानुकरण करण्यापेक्षा त्यांच्या "लवकर निजे, लवकर उठे' या सवयीचं अनुकरण करूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com