वाऱ्याचा देश

वाऱ्याचा देश

भन्नाट वारा हे नेदरलॅंड्‌सचे वैशिष्ट्य. समुद्राच्या रूपात नेदरलॅंड्‌सला गिळायला येणाऱ्या राक्षसापासून वाचवण्यासाठी निसर्गाने जणू वाऱ्याच्या रूपात या देशाला वरदानच दिले आहे.

विमानातून उतरण्याआधी तिथल्या हवामानाची माहिती पायलट देतो. तिथले तापमान, पाऊस, वाऱ्याचा वेग वगैरे वगैरे. या माहितीकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्षच करतो. मी तर फक्त तापमान ऐकते, पण वाऱ्याचा वेग वगैरे तर पूर्णपणे नाहीच ऐकत.

काही वर्षांपूर्वी ऍमस्टरडॅमच्या विमानतळावर पंचवीस डिग्री तापमान ऐकून एक छोटेसे जॅकेट घालून बाहेर आले आणि आयुष्यात पहिल्यांदा पश्‍चाताप झाला, पायलटने सांगितलेली माहिती पूर्णपणे न ऐकल्याचा. कारण तापमान जरी पंचवीस डिग्री असले तरी वारा वाहत होता ताशी वीस किलोमीटरच्या वेगाने. त्यामुळे अंगाला जाणवणारे तापमान होते फक्त दहा डिग्री. दिसायला बाहेर स्वच्छ, मस्त, कडक ऊन दिसत होते. पण वाऱ्याने जणू त्या उन्हातली ऊब आपल्याबरोबर वाहून नेली होती.
युरोपमधल्या जर्मनी, स्वित्झर्लंड, बेल्जियम यांसारख्या खूप बर्फ पडणाऱ्या देशांमध्ये जितकी थंडी वाजते, तितकीच थंडी नेदरलॅंड्‌समध्ये बर्फ न पडताही वाजते. कारण फक्त एकच, इथे सतत वाहणारा वारा. युरोपमधल्या बाकीच्या देशांच्या मानाने नेदरलॅंड्‌समधले हवामान तसे समच असते. थंडीत खूप बर्फ नाही पडला तरी काही दिवस आणि थोडासाच. बर्फ पडून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे, असे सहसा होत नाही. उन्हाळाही काही खूप कडक नसतो. तापमान साधारण अठ्ठावीस डिग्रीच्या वर जात नाही.

हवामानाच्या दृष्टीने बघायचे झाले तर सतत वेगाने वाहणारा वारा हे नेदरलॅंड्‌सचे वैशिष्ट्य आहे. चारशे एकावन्न किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेल्या नेदरलॅंड्‌समध्ये, समुद्रावरून जमिनीवर वाहणाऱ्या वाऱ्याला अडवण्यासाठी एक डोंगर काय, तर साधी छोटी टेकडीही नाही. नेदरलॅंड्‌सचा अर्ध्यापेक्षा जास्त भूभाग हा समुद्रसपाटीच्या काही सेंटिमीटर खालीच आहे.

साधारण अकराव्या-बाराव्या शतकापर्यंत नेदरलॅंड्‌स ही युरोपमधल्या चार मोठ्या नद्यांनी आणि समुद्राच्या भरतीने वाहून आणलेला गाळ एकत्र जमून बनलेली जागा होती. छोट्या छोट्या बेटांची, आजूबाजूला सतत भरपूर पाणी असणारी. माणसाच्या वास्तव्यासाठी फारशी योग्य नसलेली. त्या काळात इथे राहणाऱ्या माणसांची घरे लाकडाच्या खांबावर बांधलेली असायची. घरेही पूर्णपणे लाकडाचीच. काही तर अशा ठिकाणी असायची की समुद्राच्या भरतीचे पाणी घराखाली भरायचे आणि घरातली माणसे घरात बसून मासेमारी करायची. सतत घराखाली भरणारे हे भरतीचे पाणी थांबवण्यासाठी इथे राहणाऱ्या माणसांनी घरासमोर छोटे छोटे बांध घालायला सुरवात केली.

तेराव्या शतकात हे छोटे छोटे बांध एकमेकांना जोडून एक मोठीच्या मोठी भिंत बनवली गेली. भिंत बनली होती लाकूड, दगड, माती यापासून. तरीही कधी कधी समुद्राला जास्त भरती आली तर भरतीचे पाणी भिंत ओलांडून जमिनीवर यायचे. एकदा का पाणी आत आले तर सलग बांधलेल्या भिंतीमुळे आतच अडकून पडायचे. हे पाणी छोटी छोटी मडकी भरून पुन्हा समुद्रात टाकावे लागायचे. अर्थातच हे काम खूप कष्टाचे आणि खूप वेळ लागणारे होते. इथे मदतीला आला, सतत आणि वेगाने वाहणारा वारा, पवनचक्कीच्या रूपाने. नेदरलॅंड्‌समधली पहिली पवनचक्की वापरली गेली तेराव्या शतकात. पूर्वीच्या काळी आपल्याकडे छोटी पाळणी बांधलेला पायरहाट असायचा ना विहिरीतून पाणी काढण्यासाठी, तशाच प्रकारे भरतीचे पाणी बाहेर काढण्यासाठी पवनचक्की वापरली जायची.

सुरवातीला फक्त जमीन वाळवण्यासाठी वापरली जाणारी पवनचक्की नंतर पिठाची गिरणी, लाकूड कापणे, कागद बनवणे यांसारख्या कामांसाठीही वापरली जाऊ लागली. असे म्हणतात, की जगातील पहिली औद्योगिक वसाहत, अठराव्या शतकात, एकाच ठिकाणी चालणाऱ्या तेवीस लाकूडकापी पवनचक्‍क्‍यांच्या रूपात नेदरलॅंड्‌समध्येच अस्तित्वात आली. काही काळानंतर माणसांनी तंत्रज्ञानात अजून प्रगती केली. नवनवीन प्ररकारच्या ऊर्जेवर चालणारी यंत्रे शोधून काढली. उदाहरणार्थ वाफेवर चालणारी यंत्रे. या यंत्रांसाठी लागणारी ऊर्जा निर्माण करणे संपूर्णपणे माणसाच्या ताब्यात होते. तर या उलट पवनचक्कीसाठी लागणारा वारा पूर्णपणे निसर्गाच्या ताब्यात. अर्थातच पवनचक्कीचा वापर कमी कमी होऊ लागला.

कितीतरी पवनचक्‍क्‍या जागतिक महायुद्धामध्ये शत्रू राष्ट्रांच्या हल्ल्यामुळे मोडल्या. काही काही डागडुजीअभावी वापरण्यासाठी अयोग्य झाल्या. सध्या प्रदूषण कमी करण्यासाठी व जागतिक तापमानवाढीवरही नियंत्रण मिळवण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा म्हणून काही राष्ट्रांनी सौरऊर्जेचा पर्याय निवडला. मात्र, नेदरलॅंड्‌सने त्यांच्या ऐतिहासिक पवनऊर्जेचा स्वीकार केला. नेदरलॅंड्‌स सरकारने पुन्हा एकदा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पवनचक्‍क्‍या बांधून पवनऊर्जा निर्मितीला मोठ्या प्रमाणावर सुरवात केली. आज नेदरलॅंड्‌समध्ये चालणाऱ्या सर्वच्या सर्व ट्रेन्स फक्त पवनऊर्जेवर चालतात.

जागतिक पातळीवर पर्यायी ऊर्जा वापरणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत आज नेदरलॅंड्‌सचा खूप वरचा क्रमांक लागतो. याचं श्रेय जातं फक्त आणि फक्त, सतत वाहणाऱ्या इथल्या वाऱ्याला. समुद्राच्या रूपात नेदरलॅंड्‌सला गिळायला येणाऱ्या राक्षसापासून वाचण्यासाठी, निसर्गाने जणू वाऱ्याच्या रूपात या देशाला वरदानच दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com