सखी

शैलजा-नीलम खामकर
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

सखीला नैराश्‍येने घेरले होते. सतत झोपून असायची. योग करायला लागली आणि पंधरवड्यातच तिने जगण्याचा उत्साह परत मिळवला.

सखीला नैराश्‍येने घेरले होते. सतत झोपून असायची. योग करायला लागली आणि पंधरवड्यातच तिने जगण्याचा उत्साह परत मिळवला.

सखी हे नाव आम्हा दोघींना मिळालेले. आम्ही दोघी जावा-जावा एकाच मांडवात लग्न झालेल्या. सासरी एकाच वेळी आलो आणि घट्ट मैत्रिणी झालो. सखी आधीच बारीक अंगाची, त्यात पाच बाळंतपणांनी आणखी बारीक झाली होती. एकदा खूप आजारी पडली. तेव्हा माझा हात हातात घेऊन म्हणाली, ""मला काही झाले तर माझ्या मुलांना सांभाळशील ना?'' आम्ही आता सर्वच वेगवेगळे राहू लागलो होतो. दीर वारले आणि सखीला नैराश्‍येने घेरले. वर्ष झाले, सखीच्या तब्येतीत फरक पडेना. सखी दिवसभर डोक्‍यावर चादर घेऊन न खाता-पिता राहू लागली. उत्साहाचा खळाळता झरा असा दिसामासांनी खंगू लागला. डोळ्यांतून सतत अश्रू. काय होतेय सांगता येत नव्हते. पंधरा किलो वजन कमी झालेले. काया शुष्क झाली. एक दिवस मी घरी घेऊन येण्याचा निश्‍चय करून सखीकडे गेले; पण ती अंथरुणातून उठण्यास तयार होईना. मी रागावूनच सांगितले, "माझ्याबरोबर येणार नसलीस तर माझा आजपासून संबंध संपला.' सखी डोळ्यांत पाणी आणून म्हणत होती, "मला बरे वाटले की मी नक्की राहायला येईन.' मी हताश घरी परतले.

दुसऱ्या दिवशी सकाळी दारात बॅग घेऊन सखी उभी. मी धावतच बॅग घेतली. दोघींनी एकमेकीला घट्ट मिठी मारली. सखी खूप रडली. शांत झाल्यानंतर माझ्या सुनेने दिलेला मोसंबी रस पिऊन शांत झोपली. दुपारी सर्वांबरोबर जेवायला बसवले. दुपारी परत छान झोप झाली. थोड्या थोड्या वेळाने आडवी होणाऱ्या सखीला दुसऱ्या दिवशी चारला योगाच्या वर्गाला नेले. "मला ताकद नाही', म्हणणारी सखी चारच दिवसांत माझ्याआधी योगाला तयार होऊन बसू लागली. हलके-फुलके "पीटी' प्रकार, प्राणायाम यामुळे सखीत सुधारणा झाली. तिलाच वाटू लागले, इथे सर्व बायकांमधे छान वाटतेय. मैत्रिणी मिळाल्या. जगण्याचा उत्साह वाढला. पंधरा दिवसांनी ती तिच्या घरी परतली; पण आताही तिकडे योगवर्गाला जाते आहे. माझी सखी पूर्णपणे त्या योगामुळे बरी झाली. माणसात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shailaja nilam khamkar write article in muktapeeth