मुक्काम किर्लोस्करवाडी

शांताराम वाघ
गुरुवार, 11 मे 2017

किर्लोस्करवाडी ही केवळ उद्यमनगरी नव्हती, ती माणसे उभी करणारी, त्यांच्यातील सर्जकता उमलवणारी नगरी होती. ती आयुष्याची शाळा होती.

किर्लोस्करवाडी ही केवळ उद्यमनगरी नव्हती, ती माणसे उभी करणारी, त्यांच्यातील सर्जकता उमलवणारी नगरी होती. ती आयुष्याची शाळा होती.

तो दिवस होता आठ नोव्हेंबर 1965. मी त्यादिवशी किर्लोस्करवाडी स्टेशनवर सायंकाळच्या पॅसेंजरने उतरलो. एक फाटकी तुटकी बॅग व कागदपत्रे, बस्स! एवढ्या शिदोरीवर मी माझ्या आयुष्याचा "श्री गणेशा' केला. सायंकाळ होताच मिणमिणत्या प्रकाशात मला दारिद्य्राचे वास्तव जास्तच जाणवू लागले. स्टेशनवर गॅसचे दिवे मिणमिणले अन्‌ मग माझी धागधुग सुरू झाली. आता रात्रीचा मुक्काम कोठे करावयाचा? स्टेशनवरच्या पोर्टरने हटकले. दारिद्य्रात सहकार्य तरी कोण करणार? मी बाजूला झालो. पुन्हा स्टेशनमध्ये आलो. त्याला मी रात्रीच्या वेळी इथेच मुक्काम करणार असल्याचे सांगितले. पोर्टरला माझी दया आली अन्‌ मला त्या स्टेशनवरच्या बाकड्यावर बसावयाची "अधिकृत' परवानगी मिळाली. जसजशी रात्र होत गेली तसतसे अनंत विचार मनांत येऊ लागले. अन्‌ एकदम आठवले "हे ही दिवस जातील!'...

मी नोकरीत लागल्यानंतर पाच-सहा महिने झाले होते. त्या दिवशी अचानक सबनीस नावाच्या क्‍लार्कच्या नेतृत्वाखाली कामगारांचा संप सुरू झाला. मी नोकरीत नवीन असल्याने त्या संपात सामील झालो नाही. त्यानंतर कारखाना सुटल्यानंतर मारहाण सुरू झाली. मला फौंड्रीतील एका कामगाराने मारण्याची धमकी दिली. मी त्याला समजावून सांगितले व नोकरीच्या भीतीपोटी मी संपात सामील होऊ शकत नाही. योगायोगाने काही दिवसांतच वातावरण निवळले. कर्मधर्म संयोगाने त्या कामगाराचा माझा कामानिमित्त वारंवार संपर्क येऊ लागला. पुढे काही वर्षांनंतर तो फोरमन झाला. एके दिवशी त्याला सर्व आठवले व त्याने माझी माफी मागितली.

माझे वरिष्ठ होते गोपालकृष्ण तोलपाडी. प्रॉडक्‍शनमधील "फाय फाउंडेशन पारितोषिक विजेते' व बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे अभियांत्रिकी पदवीधर. अत्यंत हुशार व भीतीयुक्त दरारा असलेला माणूस! त्यांच्या हाताखाली अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली हे केवढे भाग्य! त्यांच्या प्रेरणेनेच मी बहिस्थ विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्र घेऊन पदवीधर झालो होतो. त्यांनी मला नॅशनल प्रॉडक्‍टिव्हिटी कौन्सील इन सुपरविझन' या परीक्षेसाठी कंपनीतर्फे बसण्याची परवानगी दिली. तोलपाडी यांची शिक्षणाची तळमळ व योग्य मार्गदर्शन मी आयुष्यांत विसरलो नाही.

वाडीतल्या सोशल क्‍लबमध्ये अनेक नामवंताची भाषणे व कार्यक्रम होत. जगन्नाथराव जोशी, राम केशव रानडे, शांता शेळके, ग. दि. माडगूळकर, सुधीर मोघे, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांची भाषणे व बांगला देश मुक्तीनंतर सॅम माणेकशॉं यांचा झालेला सत्कार व त्यांची जोशपूर्ण वाणी, ह्या गोष्टी आयुष्यांत विसरता येणार नाहीत. शांता शेळके यांच्या बरोबर कवितेविषयी केलेली चर्चा व त्यांचा साधेपणा मला कायमचा स्मरणात राहिला. राम नाईक यांची सामान्याविषयीची तळमळ नजरेत भरली. राम केशव रानडे यांच्या आध्यात्मिक विचाराने नवी दिशा मिळाली. हे साहित्यातील आनंदाचे क्षण "किर्लोस्करवाडीनेच' दिले!

एकदा काही कामानिमित्त शंतनुराव किर्लोस्करांना भेटण्याचा प्रसंग आला. काही कामामुळे त्यांना त्यांनी दिलेल्या वेळेपेक्षा भेटण्यास थोडा उशीर झाला. त्या वेळी त्यांनी वेळेच्या नियोजनाविषयी सांगितलेल्या गोष्टी खरे तर आयुष्यभर विसरता येण्यासारख्या नाहीत. "वेळ एक अमूल्य ठेवा' हा त्यांनी सांगितलेला मंत्र मी आयुष्यांत जपण्याचा प्रयत्न केला.

कंपनीच्या "विकास चॅरिटेबल ट्रस्ट'मध्येही स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संस्थेतर्फे आदर्श शाळा पुरस्कार दरवर्षी देण्यात येऊ लागला. अनेक शाळांची तपासणी करण्याची संधी व शिक्षकांचे अनुभव ऐकण्याचा अमूल्य ठेवा गवसला. ग्रामीण भागातली कराडजवळील तळमावले येथील उत्कृष्ट शाळा पाहण्याची व त्यातील अनेक योजना सभोवतालच्या शाळेत अनेक शिक्षकांनी राबविल्याचे पहावयास मिळाले. किर्लोस्कर वाडी येथील नागरिकांकडून घरात असलेली खेळणी गोळा करून ती जवळच्या बालवाड्यांना देताना मन खरेतर आनंदाने भरून आले. कोल्हापूर येथील अनाथाश्रमास वह्या व पुस्तकांची मदत करताना व छोट्या अनाथ मुलांना पाहून मनांत विलक्षण कालवाकालव झाली. जीवनांतील हाही एक विलक्षण अनुभव होता. अशा अनेक कामांत सहभागी होता आले. जीवनांत एक समाजसेवेचा खारीचा वाटा खरे तर उचलता आला.

एकूणच किर्लोस्करवाडी म्हणजे आयुष्याची शाळाच होती. या शाळेत शिकल्यामुळेच आमच्यासारख्या अनेकांना विचारांची श्रीमंती लाभली! किर्लोस्करवाडीचे हे ऋण कधीही विसरता येणार नाही!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shantaram wagh write article in muktapeeth