साहेबांमधील पालक मला भेटला तेव्हा...

विजयमाला पवार, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम सेल, गुन्हे शाखा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

आस्थेवाईक नेता 

आस्थेवाईक नेता 

अचानक वरिष्ठांचा आदेश आला, की दिल्ली हायकोर्टमधील कामासाठी मला तत्काळ विमानाने दिल्लीला जावे लागेल. मला काहीच सुचत नव्हते काय करावे ते! मी दिल्लीला गेले तर माझ्या आजारी मुलाकडे कोण पाहणार? त्याची काळजी कोण घेणार? एक ना अनेक अडचणी डोळ्यांसमोर आ वासून उभ्या राहिल्या. काही तरी मार्ग काढण्याशिवाय पर्यायच नव्हता म्हणून मी माझ्या लहान भावाला कोल्हापूरवरून तत्काळ बोलावून घेतले अन्‌ दिल्लीला निघण्याची तयारी केली. विमानप्रवास अन्‌ तोही एकटीने करावा लागणार होता. पोलिस असूनही विमान रात्री 11 वाजता दिल्लीला लँडिंग होणार असल्याने मनात एक प्रकारची धाकधूक होतीच; पण आमचा स्टाफ घ्यायला येणार असल्याने थोडीफार निवांत होते. 

सर्व सोपस्कार पार पाडून विमानात बसले; पण त्याच वेळी एक आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. माझ्या आयुष्यातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व असलेली अशी व्यक्ती जिच्यावर मी खूप प्रेम करत होते तीही त्याच विमानातून प्रवास करणार होती. ती व्यक्ती म्हणजे माननीय शरद पवार साहेब! सुमारे तीन वर्षांनंतर योगायोगाने साहेबांना पुन्हा भेटण्याची संधी आली होती. काहीही झाले तरी आज साहेबांना भेटायचेच, असं मनोमन ठरविले. विमानाने टेकऑफ घेतल्यावर कसाबसा अर्धा तास वेळ घालवला. मनात विचारांची घालमेल चालू होती. तीन वर्षांपूर्वीची त्यांची मी घेतलेली भेट साहेब विसरले तर नसतील ना? एक ना अनेक प्रश्‍न मनात येत होते... 
धाडस करून साहेबांकडे गेले. साहेबांना माझी ओळख सांगून तीन वर्षांपूर्वी ते स्वतः केंद्रीय कृषिमंत्री असताना नाशिक दौऱ्याच्या वेळी मी त्यांची पायलटिंग ड्यूटी केल्याचे सांगताच त्यांनी तत्काळ मला ओळखले आणि शेजारी रिकाम्या असलेल्या सीटवर बसण्यास सांगितले. हा आदेश शिरसावंद्य मानून मी आनंदाने लगेचच आसनस्थ झाले. मी दिल्लीला कशासाठी जात आहे, याबाबत साहेबांनी विचारणा केली. त्या वेळी मी त्यांना दिल्ली हायकोर्ट रिट पिटिशन केसबाबत सविस्तर सांगितले. 

माझ्या सध्या असलेल्या नेमणुकीबाबत विचारणा करून नवनवीन घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांची माहिती विचारली. माझी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आस्थेवाईक चौकशी करून वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारल्या. मी एवढ्या मोठ्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलते, यावर माझा विश्‍वासच बसत नव्हता. ग्रामीण भागातील मुले-मुली कोठे कमी पडतात, तसेच ज्ञानसंपन्न असूनही बऱ्याचदा ते ज्ञान त्यांना इंग्रजीतून मांडता येत नाही, यावरही चर्चा केली. महिलांनी पोलिस खात्यात येण्यासाठी ते मुख्यमंत्री असताना काय प्रयत्न केले, यावरही ते बोलले. ग्रामीण भागातील मुलीही आता उच्चशिक्षित होत आहेत, हा त्यांचा अनुभव सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. ग्रामीण भागातील मुलींनी स्पर्धा परीक्षा द्यावी यासाठी त्यांनी मुलींसाठी मोफत सर्व सोय असलेली पुण्यात एक संस्था चालू करणार असल्याचे सांगितले.
 
साहेबांना ज्या वेळी माझी आस्थेवाईक विचारपूस केली, त्या वेळी अक्षरशः माझे डोळे पाण्याने भरून आले. त्यांनी दिलेला मोलाचा सल्ला आणि आशीर्वाद मी आयुष्यभर विसरू शकत नाही. माझ्या वडिलांबद्दल त्यांना कमालीचा अभिमान वाटला, कारण ग्रामीण भागात राहत असूनही माझ्या वडिलांनी सर्व मुलांना उच्चशिक्षण दिले होते. माझ्या वडिलांना साहेबांना भेटायचे आहे, असे सांगता क्षणीच त्यांनी मला त्यांच्या भेटीची तारीख आणि वेळ तत्काळ दिली. गावी असलेल्या आमच्या शेतीबद्दल विचारणा करून सर्वत्र पाऊस पडूनही बारामती, इंदापूर, अकलूज, बार्शी, सांगोला, पंढरपूर या भागांत अजूनही पाऊस पडला नसल्याचे सांगत असताना दुष्काळी भागाबद्दल त्यांची असलेली काळजी मनोमन जाणवत होती. 

साहेबांसोबत विमानातील तो सव्वातासाचा वेळ कसा गेला, ते समजलेच नाही. विमानाचे लँडिंग झाले तरी मी अजून मनाने साहेबांसोबत विमानातच होते. माझा माझ्यावरच विश्‍वास बसत नव्हता. साहेबांनी भेटीसाठी दिलेली 2 सप्टेंबर ही तारीख मनातून जातच नव्हती. कधी एकदा फोन करून ही गोष्ट वडिलांना सांगतेय, असे झाले होते. विमानातून उतरून सर्व प्रवाशांसोबत बसमध्ये मीही आले. साहेब व्हीआयपी गाडीने लगेच निघून गेले. एअरपोर्टवर लगेच घेण्यासाठी मी वाट पाहत बराच वेळ थांबले होते अन्‌ अचानक "विजयमाला पवारजी कौन है?' असा आवाज माझ्या कानावर पडला. काही सेकंद मी स्तब्ध झाले. दिल्ली एअरपोर्टवर मला कोण शोधत असेल बरे? एअरपोर्टवरील कर्मचारी मला शोधत असल्याचे दिसले. मी त्यांना मीच विजयमाला पवार आहे, असे सांगितले तेव्हा त्यांनी मला माननीय शरद पवारजी सुमारे 20 मिनिटांपासून एक्‍झिट गेटवर माझी वाट पाहत आहे, असे सांगितले. क्षणभरासाठी मला काही सुचलेच नाही. 

त्या सद्‌गृहस्थ कर्मचाऱ्याने माझी बॅग मागून पाठवतो अगोदर साहेबांना भेटा, असे सांगता क्षणीच मी क्षणाचा विलंब न करता एक्‍झिट गेटकडे धावले. साहेब माझी एक्‍झिट गेटवर वाट पाहून गाडीत जाऊन बसले होते. मी गाडीकडे गेले. मला पाहताच साहेबांनी विचारले, "एवढ्या रात्री तू कशी जाणार? आणखी एक गाडी आहे. मी सोडण्यास सांगतो.'' साहेबांनी हे विचारता क्षणीच मला अक्षरशः गहिवरून आले. आज एवढ्या मोठ्या पदावर असणारी व्यक्ती माझं त्यांच्याशी कोणतंही काहीही नातं नसताना, स्वतःच्या पदाचा कोणताही अभिमान आणि लाज न बाळगता एक्‍झिट गेटवर रात्रीच्या वेळी 20 ते 25 मिनीट माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीसाठी वाट पाहत असताना परमुलखात एक पालक म्हणून त्यांनी निभावलेलं त्यांचं कर्तव्य अवर्णनीय!

खरंच मी नतमस्तक झाले अशा देवमाणसासमोर! मी नम्रपणे साहेबांना माझा स्टाफ घ्यायला आला आहे. मी सुरक्षित महाराष्ट्र सदनला जाईन, असे सांगितले. त्यांना माझ्या सुरक्षिततेची खात्री पटल्याने ते रवाना झाले. 
2 सप्टेंबर 2016 सायंकाळी पाच वाजता मी वडिलांसोबत भेटायला गेले. वडिलांची खूप वर्षापासूनची साहेबांना भेटण्याची इच्छा पूर्ण केल्याचा आनंद मला झाला होता. साहेबांना भेटायला आलेल्या आमदारांना थांबायला सांगून मला आणि वडिलांना त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला. माझ्या वडिलांशी त्यांनी शेती, दुष्काळ या गोष्टींवर चर्चा केली. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन एक मुलगी सहायक पोलिस निरीक्षकपदावर आहे, याचा त्यांना वाटत असलेला अभिमान त्यांनी सुप्रियाताई यांच्याशी ओळख करून देत असताना व्यक्त केला. 

साहेबांना भेट म्हणून काही पुस्तके मी घेऊन गेले होते. ती पुस्तके पाहताच साहेब उद्‌गारले, "माझ्याकडे आहेत ही सर्व पुस्तके आणि ती सर्व मी वाचलेली आहेत.'' यावरून लक्षात आले, की साहेब म्हणजे एक नुसते राजकारणी नसून एक वाचक, अभ्यासकही आहेत! 
त्यांच्यातील एका आदर्श व्यक्तिमत्त्वाला, एका पालकाला आणि सर्वसामान्यांच्या विठ्ठलाला माझा सलाम! आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा! त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar cares for a lady inspector and all