षष्टाक्षरी मंत्र

शीतल श्रीधर माडगूळकर
बुधवार, 14 डिसेंबर 2016

आज आमच्या सहजीवनाला एक्केचाळीस वर्षे झाली; पण तो फर्ग्युसन हिलच्या छोट्या टेकडीचा परिसर जसाच्या तसा मनात कोरला गेला आहे.

आज आमच्या सहजीवनाला एक्केचाळीस वर्षे झाली; पण तो फर्ग्युसन हिलच्या छोट्या टेकडीचा परिसर जसाच्या तसा मनात कोरला गेला आहे.

मोरपंखी दिवस होते ते! माझा व श्रीधर यांचा साखरपुडा गदिमांच्या "पंचवटी'त मोठ्या थाटाने पार पडला. सर्वांच्या अनुमतीने आम्ही पहिल्यांदाच फिरायला बाहेर पडलो. यांचे जीवश्‍चकंठश्‍च तीन मित्रही आमच्यासह होते. ते तिघे म्हणजे आताचे प्रसिद्ध घटनातज्ज्ञ उल्हास बापट, माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस आणि एका मोठ्या जपानी कंपनीचे उपाध्यक्ष यशवंत ढवळे. आज पन्नास वर्षे त्यांच्या मैत्रीला झाली. अजूनही त्या चौघांची मैत्री तितकीच घट्ट आहे. नव्या वहिनीला आवडेल असे वाटून सर्वानुमते फर्ग्युसनहिल जवळची छोटी टेकडी हे ठिकाण निश्‍चित केले गेले. मुंबईच्या कोलाहलात वाढलेल्या मला तो शांत, रम्य परिसर खूपच आवडला. लग्नाआधी आणि लग्नानंतर इथेच फिरायला यायचे, असे मी मनोमन ठरवूनही टाकले.

सगळा परिसर सोनेरी उन्हात न्हाऊन निघाला होता. त्या पुण्याच्या गुलाबी थंडीत ती उबदार किरणे खूप आश्‍वासक वाटत होती. आम्ही टेकडीवर पोचलो. यांचे मित्र जरा बाजूला गेले आणि यांनी लालचुटूक रंगाची, काळ्या रेशमाने भरलेली एक सुंदर पश्‍मिना शाल माझ्या खांद्यावर हळुवारपणे लांबूनच टाकली; आणि हातात एक चिठ्ठी कोंबली. त्यावर लिहिले होते.....
"बंध नव्हे हे पाश रेशमी
जशा श्रावणसरी
सदैव देईल आठव माझी
प्रीतीची ही खुळी कस्तुरी.....'
त्यानंतर एक शेरही हिंदीमध्ये माझ्यासाठी लिहिला होता.
"बडी खुशनसीब है ये शाल
जो आप को हमारे पहलेही समेट लेगी
ये भी खयाल कुछ कम नही
खुश रहने के लिये, श्रीधरकी
कभी कभी ये हमारी याद भी देगी'
लांबूनच हा प्रसंग पाहणाऱ्या यांच्या मित्रांनी यावर टाळ्या वाजवल्या. मीसुद्धा लाजत स्वतः भरलेला मफलर यांना भेट म्हणून दिला.

नंतर लग्नाआधी साडी खरेदीसाठी माझ्या सासूबाईंनी दिलेल्या आमंत्रणानुसार जेव्हा मी परत मुंबईहून पुण्याला आले, तेव्हा यांच्याजवळ फर्ग्युसन हिलच्या छोट्या टेकडीवर फिरायला जाण्याचा हट्टच धरला. नाही नाही म्हणत हे शेवटी तयार झाले. आम्ही हिलच्या माथ्यावर पोचलो. समोर पुणे शहराचा परिसर धुक्‍याने लपेटून बसला होता. मंद वाऱ्याच्या शीतल झुळका मन प्रसन्न करत होत्या. आम्ही टेकडीवर बसून आमच्या भविष्यकाळाबद्दल खूप स्वप्ने रंगवली. संध्याकाळ होऊन केव्हा दिवेलागणी झाली ते गप्पांच्या नादात आम्हाला कळलेही नाही. वरून दिसणारा टेकडी भोवतालचा परिसर आता लखलखत्या दिव्यांनी न्हाऊन निघाला होता. आम्ही घरी परतण्यासाठी उठून उभे राहणार तेवढ्यात जोरजोरात शिट्ट्या ऐकू आल्या. हे एकदम सावध झाले. समोर एक आडदांड माणूस उभा होता. ""काय रे पोरांनो, काय चाललंय? तुमचं नाव काय?'' असं अतिशय उर्मटपणे त्याने विचारलं.

"मी श्रीधर माडगूळकर. ही माझी नियोजित वधू. आम्ही गप्पा मारत बसलो होतो.'' यांनी शांत आणि ठामपणे उत्तर दिलं. "माडगूळकर' नाव ऐकल्यावर समोरचा माणूस चपापला. ""ग. दि. माडगूळकरांचे तुम्ही कोण? आम्हाला लहानपणी शाळेत त्यांच्या कविता होत्या.'' ""मी त्यांचा मुलगा'' हे म्हणाले. ""बरं झालं, ओळख झाली.'' त्याचा स्वर आता अगदी निमाला होता.
परत जोरजोरात शिट्ट्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. यांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ""दे ना शिट्‌टीला उत्तर!'' तो खजील होऊन बघतच राहिला. त्याच्या गळ्यात हात टाकून हे म्हणाले, ""चल, आता ओळख झालीय तर "वैशाली'त कॉफी पिऊ.'' मी आश्‍चर्याने यांच्याकडे बघतच राहिले. चांगले आम्ही दोघे गप्पा मारीत होतो, हा कोण उपटसुंभ आला आणि चक्क त्याला कॉफी प्यायचं आमंत्रण.....

तो "नाही, नाही' म्हणू लागला. त्याचा हात घट्ट धरून हे चालू लागले. मध्येच हात सोडवून गयावया करून तो पळून गेला. यांचा "मुड' एव्हाना पूर्ण गेला होता. हे अधिकच गंभीर झाले. आम्ही हिलवरून उतरल्यावर काहीही न बोलता यांनी मला "पूनम' हॉटेलवर सोडलं. आई व मी तिथे उतरलो होतो.
आदल्या दिवशीच्या यांच्या विचित्र वागण्याचं कोडं मनात बाळगत मी दुसऱ्या दिवशी साडी खरेदीसाठी ठरल्याप्रमाणे "पंचवटी'वर पोचले. माझ्या मधल्या वन्संपण आल्या होत्या. त्या मला म्हणाल्या, ""नशिबाने काल वाचलात.'' मी प्रश्‍नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं. त्या म्हणाल्या, ""फर्ग्युसनच्या छोट्या टेकडीवर अशीच माझी एक जवळची मैत्रीण तिच्या नियोजित पतीसह फिरायला गेली होती. तिथे एका टोळीने त्यांना लुबाडलं. त्यांच्याकडचे सर्व पैसे, अंगठ्या, चेन, घड्याळ तर त्यांनी काढून घेतलंच. एवढंच नाही, तर नको त्या प्रसंगालाही तिला सामोरं जावं लागलं. तिचा नियोजित पती तिचं संरक्षण न करता पळून गेल्यामुळे तिने तिचं लग्नही मोडलं.'' हे ऐकल्यावर मी अवाक्‌च झाले. भोवतालच्या जगावर अतिविश्‍वास असणाऱ्या मला एवढ्या कठीण प्रसंगाच्या गांभीर्याची पुसटशी जाणीवही झाली नाही. या प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडल्यामुळे मी मनोमन परमेश्‍वराचे आभार मानले.

नंतर भेटल्यावर यांना म्हटले, की तुम्हाला तो माणूस गुंड आहे हे कळले होते, तर तुम्ही त्याला कॉफी प्यायला का बोलावत होता? हे त्यावर म्हणाले, ""अगं, वैशालीत माझे खूप मित्र होते त्या वेळी. त्याला धरून चोपच देणार होतो. खरं तर त्याला हिलवरून ढकलून द्यायचा विचारही क्षणभर मनात आला होता; पण तू होतीस म्हणून... सोडलं त्याला.''

आज आमच्या सहजीवनाला एक्केचाळीस वर्षे झाली; पण तो फर्ग्युसन हिलच्या छोट्या टेकडीचा परिसर जसाच्या तसा मनात कोरला गेला आहे.
यांचं प्रसंगावधान, परमेश्‍वरी कृपा आणि गदिमांच्या छत्रछायेमुळेच आम्ही या भयानक प्रसंगातून वाचलो.

खरंच, "माडगूळकर' ही मंत्राक्षरं आहेत. "खुल जा सिमसिम' हा अलीबाबाच्या गुहेसाठी जसा मंत्र होता, तशीच "माडगूळकर' नावाची मंत्राक्षरं आमच्या भाळावर नियतीने कोरली आहेत. म्हणून कुठल्याही गुहेचे दरवाजे आमच्यासाठी आपोआप उघडले जातात. गदिमांचा 14 डिसेंबर हा महानिर्वाण दिन! लग्नाआधी मी थोडंफार लिहीत होते, कविताही करत होते. गदिमांच्या काव्याची, गीतांची, गीत रामायणाची भक्त तर मी होतेच होते.

लग्नानंतर गदिमा म्हणत, ""या मुलीच्या मनात सकाळचं जेवण तयार झालं, की संध्याकाळी काय करायचं याचा विचार असतो. रात्रीचं जेवण झालं, की सकाळी न्याहारीला काय करायचं याचे तिला वेध लागतात. त्यापेक्षा तिने थोडंतरी लिहीत जावं.'' आज त्यांच्या या बोलण्याची अचानक आठवण झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sheetal madgulkar's muktapeeth article