आयुष्य घडले

श्रद्धा जोशी
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

आई-वडिलांबरोबरच जवळच्या नातलगांनी केलेल्या संस्कारांमुळे आयुष्य घडवायला मदत झालेली असते.

आई-वडिलांबरोबरच जवळच्या नातलगांनी केलेल्या संस्कारांमुळे आयुष्य घडवायला मदत झालेली असते.

मी माझ्या मावशीकडे राहात होते. मावशीचा व्यवसाय होता. ती पीएच्‌.डी.साठी अभ्यासही करत होती. घरात लोकांची कायम वर्दळ असायची. येणाऱ्यांना चहा-कॉफी करणे, त्यांना काय हवे-नको पाहणे अशी छोटी-मोठी कामे करावी लागायची. त्यामुळे लोकांशी कसे वागायचे, बोलायचे ते समजले. मावशी सतत कामात असल्यामुळे दूध, भाजी, थोडाफार किराणा यासाठी ती मला पैसे द्यायची. पैसे संपले असे सांगितल्यावर परत द्यायची. तिने कधी हिशेब मागितला नाही; पण त्यामुळे मला पैशांचा हिशेब ठेवायची चांगली सवय लागली. मावशी म्हणायची, स्वतःच्या पायावर उभे राहा. आम्हाला स्वावलंबी बनविण्यासाठी तिने प्रयत्नदेखील केले.

मला पहिल्यांदा तिची साडी फॉल लावायला दिली होती. साडी महागाची होती. मला खूप भीती वाटत होती. ती मला म्हणाली, "घाबरू नकोस, फॉल लावायला चुकला तरी चालेल. पण तूच फॉल लाव.' फॉल उलटा लागला. मग उसवून परत लावला. त्यानंतर आजतागायत कधीही फॉल लावण्यास मी चुकले नाही. घराजवळच्या भरत कला केंद्रात मला फॉल लावायचे काम मिळाले. फावल्या वेळात मी फॉल लावायचे. माझ्या हातात माझे हक्काचे पैसे आले. दिवाळीसाठी पणत्या आणून रंगवायचे. गणपती उठल्यापासून सुरवात व्हायची. सगळे भांडवल मावशीचे. विक्री मावशीच करायची. तिच्या ओळखीतील खूप जण घ्यायचे. पणत्या बनवायला आम्हाला पैसेही द्यायची आणि श्रमपरिहार म्हणून जेवायला एक दिवस हॉटेलमध्ये न्यायची. यातून बरेत काही शिकायला मिळाले.

लहानपणी आपल्यावर जे संस्कार घडतात ते कायमचे मनात घर करून राहतात. ते विसरूच शकत नाही. आई-वडील तर आपल्या मुलांवर संस्कार करतातच; पण काका, काकू, मावशी यांनी दिलेल्या संस्कारामुळे आयुष्य घडवायला मदत झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shradha joshi write article in muktapeeth