कोण होता तो!

श्रीधर जोग
सोमवार, 29 मे 2017

संपूर्ण प्रवासात तो तरुण आमच्याशी बोलला नाही की हसला नाही. सहप्रवास असा नव्हताच जणू. पण त्यानंच आम्हाला एका संकटातून वाचवलं.

संपूर्ण प्रवासात तो तरुण आमच्याशी बोलला नाही की हसला नाही. सहप्रवास असा नव्हताच जणू. पण त्यानंच आम्हाला एका संकटातून वाचवलं.

मी व माझी पत्नी रेखा अमेरिकेत सॅंडिएगो शहरात वास्तव्यासाठी गेलो होतो. मुलीकडे. सॅंडिएगो एक अतिशय देखणं शहर आहे. एका बाजूला समुद्रकिनारा, तर दुसऱ्या बाजूला डोंगर-दऱ्यांचा निसर्गरम्य आणि विलोभनीय परिसर असलेले हे शहर आहे. साधारण पुण्यासारखं हवामान असल्यामुळे तब्बेत खूष होते. दर आठवडाअखेरीला भटकंती व्हायची. आमच्या दीड वर्षाच्या नातवाबरोबर आमचे सहा महिने कसे गेले कळलेच नाही. परतीचा दिवस आला तेव्हा डोळे भरून आले. तिथून आमचा पाय निघेना. परंतु व्हिसाचा काळ संपल्यामुळे परतणं भाग होतं.

आमची परतीची विमान यात्रा लॉस एंजलीस- दुबई- मुंबई अशी होती. लॉस एंजलीसला विमानतळावर सोडण्यासाठी मुलगी- जावई- नातू आले होते. परदेश प्रवासाला जाताना आम्ही "डॉक्‍युमेंट पाउच बेल्ट' नेहमी वापरतो. त्या दिवशीही तो मी बांधला होता आणि त्यात आमचे पासपोर्ट व इतर कागदपत्रं ठेवली होती. बराच वेळ गप्पा मारल्यावर मुलगी व जावई आम्हाला बाय बाय करून परतले. आम्हीही चेक इन करून डिपार्चर गेटवर आलो.

विमानाची वेळ झाली होती. आम्ही जरा आवरून बसलो आणि अचानक घोषणा झाली, की आमचं विमान चार तास उशिरा सुटेल. अरे बापरे! आता किती तरी वेळ थांबावं लागणार, असा विचार करत बसलो होतो. एका तासाने परत उद्‌घोषणा झाली, की विमान नादुरुस्त झाल्यामुळे आणि पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे आमची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल. त्या आधी जेवणाची कुपन्स दिली जातील.
झालं! हे ऐकल्यावर प्रवाशांनी काउंटरकडे धाव घेतली. कुपन्ससाठी एकच झुंबड उडाली! बहुतेक प्रवासी भारतीय होते. शिस्त राखत कुणीही रांगेत उभे राहिनात. ही सगळी गडबड तासभर चालली होती. आमच्या मोबाईलमध्ये इंटरनॅशनल कार्ड नसल्यामुळे मुलीशी संपर्क साधता येईना. तेव्हा एका सहप्रवाशाला विनंती करून आम्ही मुलीला स्थितीची माहिती दिली. आम्हाला कुपन्स मिळाली आणि आता आम्ही हॉटेलकडे निघणार तेवढ्यात पुन्हा घोषणा झाली, की पर्यायी व्यवस्था झाली असून विमान चार तासांनी सुटेल. ते ऐकून हायसं वाटलं.

अशा रीतीने परतीचा प्रवास सुरू झाला. विमानात बसल्यावर मनात आलं, की आता मुंबई- दुबई फ्लाइट चुकणार. विमानात आमच्या शेजारी एक तीस- बत्तीस वर्षांचा तरुण बसला होता. संपूर्ण प्रवासात तो एकदाही आमच्याशी बोलला नाही की पाहून हसला नाही. मी त्याचं नाव विचारलं. तो चंद्रशेखरन होता आणि चेन्नईला निघाला होता. विचारलेल्या प्रश्‍नाला जेवढ्यास तेवढं उत्तर देत तो पुन्हा गप्प. सहप्रवास, सहप्रवासी हे शब्द त्यानं ऐकलेले नसावेत जणू.

लॉस एंजलीस- दुबई हा सोळा तासांचा प्रवास पुढच्या फ्लाइटच्या चिंतेतच गेला. परंतु दुबई जवळ आल्यावर विमानात सांगितले गेले, की सर्व प्रवाशांच्या पुढच्या प्रवासाची व्यवस्था जुळवली गेली आहे. या बदललेल्या प्रवासाची सुधारित तिकिटे दुबईला मिळतील. विमान कंपनीने केलेल्या व्यवस्थेबाबत आम्ही मनोमन आभार मानले.
विमान दुबईला उतरल्यावर आम्ही विमानतळावरील काउंटरकडे गेलो. विमान कंपनीने पुढच्या प्रवासाची व्यवस्था केली होतीच. आता आमचे पासपोर्ट दाखवायचे आणि तिकिटे घ्यायची एवढेच काम होते. मी पासपोर्ट काढायला गेलो तर.... "डॉक्‍युमेंट पाउच बेल्ट' नाही! अरे बाप रे! माझं तर डोकंच चक्रावलं. आता काय करायचं, या कल्पनेनंच धाबं दणाणलं. पासपोर्ट कसे शोधायचे? तो बेल्ट कुठे पडला असेल? पासपोर्ट नाही मिळाले तर पुढचा प्रवास कसा करायचा, कुणास ठाऊक. बरं, विमानाकडे परत जाता येत नव्हतं. आता पुढचा प्रवास करायचा कसा, काही कळेना. काही सुचेना. चिंता वाढत चालली.

तेवढ्यात, विमानात आमच्या शेजारी बसलेला चंद्रशेखरन्‌ धावत आला आणि म्हणाला, ""अंकल युवर बेल्ट. विमानात हा पाऊच पडलेला दिसला, तुम्हाला हाकाही मारल्या; पण आपण खूप घाईत निघून आलात.'' काय बोलावं मला सुचेचना! माझ्या तोंडातून शब्द फुटेना. मी त्याचे हात हातात घेतले आणि म्हटले, ""अरे तू तर देवदूतासारखा आलास. तुझे आभार कसे मानायचे तेच कळत नाही.'' मी आणखी काही बोलायच्या आत तो म्हणाला, ""मी निघतो. मलाही माझ्या काउंटरवरून तिकीट घ्यायचंय'' आणि झटकन्‌ निघून गेला. आणि आम्ही त्या सहृदयी माणसाकडे बघतच राहिलो.

कोण होता तो तरुण! काय होतं आमचं आणि त्याचं नातं? कुठले ऋणानुबंध होते कोण जाणे! त्यांनं जर बेल्ट आणून दिला नसता तर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shridhar jog wirte article in muktapeeth