कोकीळ येता दारी...

शुभदा अच्युत इनामदार
शनिवार, 5 मे 2018

भूलोकीच्या या गंधर्वांचं अमृतसंगीत ऐकताना, त्यांच्याकडे पाहताना, वेळेला पंख फुटतात. त्याला बागेत निरखताना, त्याचं कूजन ऐकताना हातातील कामं मागे राहतात.

भूलोकीच्या या गंधर्वांचं अमृतसंगीत ऐकताना, त्यांच्याकडे पाहताना, वेळेला पंख फुटतात. त्याला बागेत निरखताना, त्याचं कूजन ऐकताना हातातील कामं मागे राहतात.

"मुझे ना बुला, मुझे ना बुला' असं म्हणण्याची वेळ आणलीय या कोकीळ द्विजकुलानं! त्यांना बघण्याच्या मोहानं सारखे आतबाहेर करावं लागतंय! मग हातातील कामं मागे राहतात. सोसायटीची बाग, मोकळ्या जागेत केलेले यशस्वी वृक्षारोपण आणि बंगल्याची सुनियोजित बाग, यामुळे बाल्कनीसमोर सुंदर हिरवागार वनश्रीचा आयताकार पट्टा तयार झालेला. आंबा, कडुनिंब, पिंपळ, बूच, कांचन, शेवगा, पळस, पांगारा, बाभळी, अशी अनेक झाडं. वाढत्या पुण्यातील या ओऍसिसकडे पक्षी आकर्षित तर होणारच!

गेली दोन वर्षे मॉन्सून चांगला बरसलाय. त्यातून वृक्षप्रेमींची निगराणी. त्यामुळे हा हिरवा पट्टा वसंतात चांगलाच बहरलाय. भारद्वाज, फॅनटेल, सनबर्ड, हमिंगबर्ड, साळुंक्‍या, घारी, पोपट, चिमण्या, खंड्या एक ना दोन अनेकांचं अनेकवार दर्शन होतंय! वृक्षांवर घरटीही बांधलीत काहींनी! पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून छान दिसतं सारं. यंदाची चैत्रपालवी तर विशेषच सुखावणारी ठरलीयं. अनेक कोकीळ कुटुंबांचं वसतीसाठी इथं आगमन झालेलं आहे. गेला महिनाभर "कुहू कुहू बोले कोयलिया' या गीताचा सारखा प्रत्यय येतोय्‌ आणि चक्क कोकिळांचं वारंवार दर्शनही होतंय!
"नर कोकीळ' काही फारसा देखणा पक्षी नाही. गुंजेसारखे लालभडक डोळे, फिकट पांढुरकी चोच, काळभोर रंग... कावळ्यापेक्षा आकारानं थोडा छोटा. कोकिळा मात्र त्या मानानं देखणी... अंगावर पांढऱ्या रंगाची सुबक नक्षी असलेली! वसंत ऋतूत कोकीळ गाणं म्हणत तिचं प्रणयाराधन करताना दिसतो. हा त्यांचा प्रजननाचा काळ आहे आणि हे सारं दुर्बिणीतून मनसोक्त पाहता येतंय! प्रेमाची याचना करणाऱ्या नर कोकीळ पक्ष्याला धुत्कारून रूपगर्विता कोकिळा फाडकन्‌ उडून गेलेली पाहून खूप गंमत वाटली. तसेच "कोकीळ कुहू कुहू बोले- तू माझा-तुझी मी झाले' हे गीत सत्यात उतरलेलं... कडुनिंबाच्या दाट हिरव्या पाना-फांद्यांमध्ये ओझरतं अस्पष्ट पाहता येतंय्‌!

दोन दिवसांपूर्वी निसर्गातील एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. एका मोठ्या झाडावर कावळ्यांची दोन घरटी आहेत. कावळे घरट्याशेजारी बसलेल्या कोकिळेला सारखे हुसकून लावत होते. नंतर चिकाटीनं निरीक्षण केलं- तर दिसलं की कोकिळा बहुदा कावळ्यांची अंडी खाली ढकलून देतेय. कदाचित त्या जागी तिनं आपली अंडी घातली असावीत. माहिती काढल्यावर समजलं- कोकिळेला परिस्थिती पाहून, योग्य वेळी, योग्य ठिकाणी अंडी घालण्याची कला निसर्गानं दिली आहे. त्यातलाच हा प्रकार असावा. आळशी कोकीळ आपली पिलं-वंश असाच वाढवीत असते. त्यामुळे कावळा कोकिळेचं विळ्या-भोपळ्याचं सख्य असतं!
चैत्र महिन्यापासून ही सारी धावपळ पाहताना छान वाटतंय.

भूलोकीच्या या गंधर्वांचं अमृतसंगीत ऐकताना - त्यांच्याकडे पाहताना - वेळेला पंख फुटतात आणि काही आख्यायिका आठवतात. यंदा ज्येष्ठ महिना अधिकमास आहे. आषाढ अधिकमास असतो तेव्हा स्त्रिया कोकिळा व्रत करतात. अधिकमासात कोकिळेचं कूजन ऐकून उपवास सोडतात. यावरून वाचलेलं आठवतंय, बऱ्याच वर्षांपूर्वी अधिक मासात काही अंधश्रद्धाळू लोकांनी हिकमतीने कोकीळ पकडले. पिंजऱ्यात बंदिस्त केले आणि रोज महिनाभर त्यांचा आवाज ऐकून पुण्यप्राप्ती करून घेतली म्हणे. या निमित्ताने शाळेत अभ्यासलेला अन्योक्ती हा अर्थालंकार... त्याचं "कोकिळान्योक्ती' हे उदाहरण आठवतंय-
येथे समस्त बहिरे राहतात लोक
कां बूषणए मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यास किमपिही नसे विवेक
वर्णावरून तुजला गणातील काक

या पद्यावलीचा अर्थ समजून घेतला, तर वाटतं... खरंच अशी अवस्था बहुतांश ठिकाणी दिसते का? मतलबाच्या वर्तुळातून बाहेर पडता आलं तर - थोडा वेळ काढता आला तर - निसर्गातील लपलेला बहुमोल ठेवा आपण पाहू शकतो. त्याचं जतन करू शकतो. काही पक्षिप्रेमी मित्र अत्यंत तळमळीनं पशु-पक्ष्यांसाठी - पर्यावरणासाठी काम करताना दिसतात. मग मनाला वाटतं... "आम्रा त्या पीक सेविता, समसमा संयोग की जाहला!'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shubhada inamdar write article in muktapeeth