माझे पुरातत्त्वीय आख्यान

शुभदा सप्रे
मंगळवार, 8 मे 2018

वय न लहान मिळवण्यास ज्ञान, हे सूत्र मनाशी बाळगले, की सत्तरीतही महाविद्यालयात जाता येते. प्राचीन विद्या शिकता येते. प्राच्यविद्या इतरांपर्यंत नेता येते. नवे विश्‍व आपल्यासमोर उलगडत जाते.

वय न लहान मिळवण्यास ज्ञान, हे सूत्र मनाशी बाळगले, की सत्तरीतही महाविद्यालयात जाता येते. प्राचीन विद्या शिकता येते. प्राच्यविद्या इतरांपर्यंत नेता येते. नवे विश्‍व आपल्यासमोर उलगडत जाते.

माझ्या शाळामैत्रिणीच्या मुलीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यासक्रम उत्तम गुणांनी पूर्ण केला. मग ती माझ्या मागे लागली, की शाळेत तुझे इतिहास- भूगोल विषय चांगले होते, असे आई सांगते, तर तू का करीत नाहीस हा कोर्स? आता जरा शिकणे, अभ्यास करणे, पेपर देणे कठीण वाटत होते, तरीही आता सत्तरीत मी खरेच मनावर घेतले. प्रा. मंजिरी भालेराव यांनी माझ्या शंकांचे उत्तम निरसन केले. मी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. अभ्यासक्रम व त्यातील विषय यांची काही कल्पना नव्हती. पाचवीत असताना हडप्पा मोहोंजदडो थोडे शिकले होते. जसजसे विषय समजत गेले, तसतशी त्या अभ्यासक्रमाची गोडी लागली. आपली पुरातन संस्कृती किती संपन्न होती हे साद्यंत समजले.

खरी गंमत पुढेच झाली. माझ्या नऊ वर्षांच्या नातवाला झोपताना रोज एक गोष्ट लागते. परत तीच चालत नाही. म्हणून मग मी गेल्या साधारण एक वर्ष उत्खनन म्हणजे काय, त्यात काय सापडते व त्यावरून काय निष्कर्ष काढतात, हे त्याच्या भाषेत रोज त्याला सांगण्यास सुरवात केली. ते तो व्यवस्थित लक्षात ठेवत होता. माझे घर सिंहगड रस्त्यावर आनंदनगर येथे आहे. सभोवताली बरीचशी बाग आहे. त्यात तो रोज माती व पाणी खेळतच असतो. त्याच्या मित्रांबरोबर काही खणत असतो, काही बिया, पाने ठेवत असतो, त्यामुळे फारसे लक्ष देत नव्हतो. परंतु एक दिवस घरातील सजावटीत ठेवलेले बौद्ध लोकांचे जपाचे साधन घेऊन तो अंगणात फिरत होता.
मला म्हणाला, ""उद्या खूप काम आहे. हे मला जमिनीत पुरायचे आहे.''
""का रे?''
""अगं, आपले घर दोनशे-तीनशे वर्षांनी पडले की मग उत्खननात हे सापडेल ना!''
मी अवाक्‌. माझा पुरातत्त्व शिकण्याचा परिणाम असा कधी डोक्‍यात आला नव्हता. मी ब्राह्मी लिपीचा अभ्यास करीत होते, तेव्हा त्याने पण सर्व लिपी बघून ती आपल्या वहीत लिहून काढली. दुसऱ्या दिवशी शाळेत आपल्या बाईंना दाखवली. त्याच्या या कृतीची मला खूप गंमत वाटली.

खरेच याने ते साधन पुरले असते आणि काही शे वर्षांनी ते सापडले तर त्या वेळी लोक अनुमान काढतील की हे घर बौद्ध धर्मीयांचे होते. त्यामुळे हा सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम शिकताना असा विचार आला, की सातवी- आठवीच्या विद्यार्थ्यांना हे सारे शिकविण्यास काय हरकत आहे? त्यासाठी त्यांना समजेल त्या भाषेत तो अभ्यासक्रम तयार करावा व सोशलचे दोन-चार तास घ्यावेत, म्हणजे त्यांना या विषयाची गोडी लागू शकते. आपल्या संस्कृतीबद्दल ज्ञान झाल्यावर, तसाच भारत आपण परत बनवू व ती आपली जबाबदारी आहे, असा विचार एखादेवेळी त्यांच्या मनात निर्माण होईल. संपूर्ण शाळेत जरी अशी पाच-दहा मुले तयार झाली तरी ते पुढच्या पिढींसाठी खूप होईल.

माझ्या एका मैत्रिणीचा वाचनकट्टा आहे. एकदा मला तिने या विषयाची माहिती सांगण्यास त्या वाचन कट्ट्यावर बोलावले होते. मी त्यांना आपल्या संस्कृतीच्या अनेक गमतीजमती सांगितल्या. आपल्याला हे सर्व माहीत असणे कसे जरूर आहे, कसे सर्व विषय माहितीपूर्ण आहेत, हेपण सांगितले. या स्त्रियांना ते खूपच आवडले. उत्खनन, आपली पुरातन संस्कृती समजून घेण्यात व आपल्या संस्कृतीची घडण जाणून घेण्यात या साऱ्यांना रस असल्याचे लक्षात आले. मी माझ्या संपर्कातील बऱ्याच लोकांना हे शास्त्र म्हणजे काय, हे मला जसे जमेल तसे सांगत असते. आमचे कुटुंब बरेच मोठे असल्यामुळे, महाविद्यालयात जाणारी किंवा नोकरी करणारी माझी काही नातवंडे या विषयांवर माझ्याशी चर्चा करीत असतात व त्यांना त्यामुळे बरेच गोडी लागली आहे.
माझी दोन वर्षे फार मजेत गेली. परत एकदा महाविद्यालयाच्या बाकावर बसून नोट्‌स काढत अभ्यास करणे, वेगवेगळी टिपणे सादर करणे, हे शब्द आयुष्यात आले. मुख्य म्हणजे खूपच मोलाची माहिती मिळाली. आता परीक्षा संपली आहे. उत्तीर्ण निश्‍चितच होईन. किती गुण पडतील देव जाणे! हे देव वगैरे मूर्तिशास्त्र माणसाच्या मनाचे खेळ आहेत, हेपण येथेच शिकले.

जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांना सांगावे। शहाणे करून सोडावे, सकल जन।। या उक्तीप्रमाणे मी माझे हे ज्ञान वाटण्याचे कणभर काम करीन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shubhada sapre write article in muktapeeth