प्राजक्त मैत्री

शुभदा सप्रे
बुधवार, 16 जानेवारी 2019

प्राजक्ताचे फूल म्हणजे विरक्तीची भूल. पण या प्राजक्तानेच अनेक मैत्रिणी दिल्या अन्‌ तोही मित्र झाला.

प्राजक्ताचे फूल म्हणजे विरक्तीची भूल. पण या प्राजक्तानेच अनेक मैत्रिणी दिल्या अन्‌ तोही मित्र झाला.

झाड बहराला आल्यावर दारासमोर पारिजातकाचा सडा पडण्यास सुरवात झाली. प्रातःकाळी ती फुले गोळा करता करता माझी त्याच्याशी मैत्री झाली. सकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडून देवासाठी फुलांची मागणी असते. मी बाहेर नसले तरी दरवाज्याला पिशवी अडकवून मैत्रिणी पुढे जात व मी त्यात फुले भरून ठेवी. त्यातूनच एकी-दोघींशी पुस्तकांवर दारातच चर्चा सुरू झाली. आमचा पाच-सहा जणींचा "कविता ग्रुप' तयार झाला. एकीने त्याला "सदाफुली ग्रुप' नाव दिले व त्यावर चार ओळींची कविताही केली. सगळ्याजणी सत्तरच्या पुढच्या. प्राजक्‍ताचा सडा पडू लागला, की बरेच जण फुले गोळा करायला येतात. त्यामुळे मला "प्राजक्‍ताच्या घरा'त राहणाऱ्या अशी ओळख मिळाली आहे. रोज देवघरातील देव त्या फुलांनी सजतात व त्याचा मंद सुगंध घरात दरवळत राहतो. समोरच एक स्वामींचे मंदिर आहे. त्यांच्यासाठी रोज मध्यभागी तांबडे जास्वंदाचे फूल घालून केलेला हार अत्यंत देखणा दिसतो. माझ्याकडे साफसफाई करण्यासाठी एक बाई येत असे. ती म्हणायची, ""बाई, पखरण किती छान दिसते.'' तिच्या तोंडून "पखरण' शब्द ऐकताना खूप आश्‍चर्य वाटले व आनंदही झाला.
पूर्वी प्राजक्ताचा "लक्ष' वाहण्याची प्रथा होती. त्या वेळी लक्ष कमीत कमी दिवसांत पूर्ण करणे ही चढाओढ असे. माझ्या आत्या, मामी यानी लक्ष केलेले आहेत. त्यासाठी मामांबरोबर मोठमोठ्या टोपल्या घेऊन सायकलवरून डेक्कन जिमखान्यावर आर्यभूषण छापखान्याच्या आवारात जात असू. तेथे खूपच प्राजक्‍ताची झाडे होती. टोपल्या भरून पहाटेच्या वेळेला फुले आणत असू. आजी ती मोजून वाहत असे. गेल्या दहा वर्षांत मीपण इतकी फुले देवाला वाहिली आहेत, की माझा पण "लक्ष' झाला असेल. समुद्र मंथनातून निघालेला हा वृक्ष माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्याच्या खाली उभे राहणे, त्याच्याशी गुजगोष्टी करणे मला आवडते. असा हा अंगणीचा पारिजात माझा आनंदमित्र आहे. मला दिवसभर आनंदी ठेवण्यात याचा फार मोठा वाटा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shubhada sapre write article in muktapeeth