सफर चिमुकल्या राष्ट्राची

सफर चिमुकल्या राष्ट्राची

पोपच्या देशात जायचे ते तेथील जगविख्यात शिल्पे व चित्रे पाहायला. ही चित्रे व शिल्पे पाहताना देहभान विसरले जाते. काळवेळेचे बंधन तुम्हाला तुमच्या जगात परत यायला लावते.

व्हॅटिकन सिटी हे जगातले सर्वांत चिमुकले राष्ट्र. अगदी रोम शहराला जोडून तरीही स्वतंत्र. एकशे दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या या राष्ट्रातील लोकसंख्या आहे केवळ एक हजार. हे छोटेसे राष्ट्र म्हणजे पोपचा बालेकिल्ला. या व्हॅटिकनचे आपले इटुकले सैन्य, पोलिस, न्यायालय, नोटा सर्व काही आहे. पण, व्हॅटिकन प्रसिद्ध आहे ते इथल्या अप्रतिम कलाकृतींसाठी.

मी माझ्या कुटुंबासहित इथे गेले होते ते सेंट पिटर्स बॅसिलिका, व्हॅटिकन म्युझियम आणि सिस्टिन चॅपेल बघण्यासाठी. जगातील काही अत्यंत प्रसिद्ध शिल्पे आणि चित्रे इथे पाहायला मिळतात. आम्ही आमची सहल सुरू केली सेंट पिटर्स बॅसिलिकापासून. हे जगातले सर्वांत मोठे चर्च आहे. याची लांबी 730 फूट, रुंदी पाचशे फूट आणि उंची 448 फूट आहे. अतिशय भव्य आणि देखणे असे याचे बाह्यरूप. वास्तुकलेचे उत्तमोत्तम नमुने आतमध्येही पाहायला मिळतात. चर्चच्या आत साधारण उजवीकडे दिसते ते मायकेल अँजेलोचे अप्रतिम शिल्प "द पिएता.' याचा अर्थ पिटी किंवा दया. हा एकमेव "पिएता' आहे, ज्यावर मायकेल अँजेलोची स्वाक्षरी आहे. माता मेरी आणि येसूचे हे देखणे संगमरवरी शिल्प आम्ही नजरेच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले आणि बाकीचे चर्च फिरायला सुरुवात केली. जागोजागी संगमरवरी चबुतरे, देखणे पुतळे, सोन्याच्या नक्षीचे ब्रॉंझचे खांब दिसत होते. भव्य सोन्याचा क्रॉस, चारही बाजूंनी सोनेरी देवदूत, स्वर्गाची चित्रे असलेला घुमट असे चर्चचे अंतर्गत रूप बघून मन स्तिमीत झाले. भक्तिभावाने तिथे एक मेणबत्ती लावून आम्ही बाहेर आलो. बाहेर पडल्यावर चर्चला लागूनच दिसते ते एक भव्य प्रांगण. याला "सेंट पिटर्म स्क्वेअर' असे म्हणतात. हा चौक जगातल्या काही सर्वांत सुंदर व मोठ्या चौकांपैकी एक आहे. इथूनच पोप रोम शहर व बाकी जगाला आशीर्वाद देतात. आम्हालाही पोपचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना करून आम्ही तिथून बाहेर पडलो. यानंतर आम्ही जगप्रसिद्ध व्हॅटिकन म्युझियम पाहायला निघालो. हजारो पर्यटकांच्या लांबच लांब रांगा आत प्रवेश करीत होत्या. आम्हीदेखील एका रांगेतून प्रवेश केला. जसे जसे आत जाऊ लागलो तसे तसे मागून एक जिने, चौक, दालने, कक्ष दिसू लागले. प्रत्येक दालन कोरीव कमानींनी सुशोभित केलेले. प्रत्येक दालनाचे छत, भिंती व जमीन कलाकुसरींनी व्यापलेला. इथल्या चित्रांच्या दालनात लिओनार्दो, मायकेल अँजेलो, बॉनीचेल्ली, काराव्हाज्जिओ, राफएल या आणि अशाच जगविख्यात चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचा खजिना पाहायला मिळाला. एकूण एक चित्र वर्णनातीत सुंदर. राफएलचे "स्कूल ऑफ अथेन्स' हे नावाजलेले चित्र बघितले. प्रत्येक चित्र नजरबंदी करणारे. त्यानंतर शिल्पांच्या दालनातील सजीव वाटणारे मनोवेधक पुतळे व मध्यावरच्या अष्टकोनी दालनातील "बेल्व्हडेअर अपोलो' आणि "लाओकून' हे लोकप्रिय पुतळे बघितले. खरोखरंच शिल्पकारांची कला बघून मन विस्मयचकित झाले. बाराशे वर्षांपूर्वी बनवलेल्या नकाशांचा कक्ष, हातानी विणलेल्या अप्रतिम गालिच्यांचा कक्ष बघितले. नकाशांच्या कक्षात आमच्या गाईडने आम्हाला आपल्या भारताचा नकाशा दाखवला.

आता आम्हाला उत्सुकता लागली होती ती चित्रकलेचे मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिस्टिन चॅपेलमध्ये जाण्याची. देश-विदेशचे असंख्य पर्यटक घाईघाईने तिकडेच जात होते. त्या गर्दीतून वाट काढत आम्ही चॅपेलमध्ये प्रवेश केला. सिस्टिन चॅपेल हा संग्रहालयाचाच एक भाग आहे. नवीन पोपची निवडणूकदेखील इथेच घेतली जाते. आत शिरल्यावर भिंतीवर काढलेली बायबलची आकर्षक चित्रे नजरेत भरतात. चॅपेलच्या 68 फूट उंची असलेल्या छतावरदेखील मायकेल अँजेलोने अप्रतिम चित्रे काढली आहेत. इतक्‍या उंच छतावर ही चित्रे या महान कलाकाराने कशी काढली असतील, हे एक आश्‍चर्यच आहे. "द क्रिएशन ऑफ ऍडम' हे त्यातील अत्यंत प्रसिद्ध चित्र. पलीकडे एका संपूर्ण भिंतीवर मायकेल अँजेलोचे "द लास्ट जजमेंट' हे चित्र आहे. या चित्राला कलेचा अद्वितीय नमुना, असे म्हणतात. या चित्रांमधील रंगसंगती, प्रमाणबद्धता, चेहऱ्यावरचे हावभाव यावरून कुणाचीच नजर हटत नव्हती. चित्रे बघून काही पर्यटक थक्क, तर काही मूक झाले होते. आमचीही तीच स्थिती होती.

इथे आल्यापासून एकामागून एक महान कलाकृती बघून आमची नजर दीपली होती. तिथून पाय निघत नव्हता. पण, गाईडने बाहेर पडण्याची सूचना केली आणि वेळेच्या बंधनामुळे आम्हाला तिथून बाहेर पडावे लागले. बाहेर येताना मात्र व्हॅटिकन सिटीत आल्यामुळे इतक्‍या उच्च कोटीची कला आपल्याला याचि देही याचि डोळा पाहता आली याचे समाधान होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com