नेत्रानुभव

सीना सुरेश गरसोळे
शनिवार, 1 जुलै 2017

"डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे' असे म्हणतानाच "डोळे हे जुल्मी गडे, रोखूनी मज पाहू नका' असेही लाडीकपणे सुचवले जाते. आपले दुःख-आनंद व्यक्त होते ते डोळ्यातून. हे नेत्रपुराण आपल्या आयुष्याला लगटून असते.

"डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे' असे म्हणतानाच "डोळे हे जुल्मी गडे, रोखूनी मज पाहू नका' असेही लाडीकपणे सुचवले जाते. आपले दुःख-आनंद व्यक्त होते ते डोळ्यातून. हे नेत्रपुराण आपल्या आयुष्याला लगटून असते.

त्याच्या डोळ्यांतून नुसता अंगार ओसंडत होता. क्रोध, संताप, चीड या भावनांचा उद्रेक होऊन तो डोळ्यांतून उमटत होता. खरेच डोळे हे माणसाच्या मनाचा आरसा असतो. मनातल्या भावभावना डोळ्यावाटे बाहेर पडतात. डोळ्यांच्या नजरेची भाषा असते. मृदु मुलायम, नाजूक भावना सात्विक डोळ्यातून निघताना दिसतात. तसेच शृंगारिक, अबोल भावना डोळ्यांच्या कडांमधून किंवा पापण्यांच्या हलक्‍याशा उघडझापीतून दिसतात. "नैनसे नैन नाही मिलावो, देखत सूरत आवत लाज, सैयो...' अशी विनवणी लटक्‍या स्वरात प्रेयसी करते आहे. तर, "डोळे माझे, त्यात तुझे गीत कसे?' असा प्रश्‍न प्रियकर तिला विचारतो. दुःखाची वेदनाही डोळ्यावाटे झरते आणि डोळ्यातून श्रावणधारा रिमझिम पडू लागतात. "नैन लड गयी है' होऊनही "नैनोमे बदरा छाये'ची अवस्था होते. कारण नयन तुजसाठी आसुसलेले असतात. दुःखाप्रमाणेच आनंदाचेही अश्रू डोळ्यातून पाझरतात.

चंद्र, सूर्य हे परमेश्‍वराचे डोळे आहेत असे मानले जाते. ईश्‍वर त्यातून आपल्याकडे नजर ठेवून असतो. राम, कृष्ण अगर इतर देवतांच्या डोळ्यांनाही कमलाक्ष म्हणजेच कमळाप्रमाणे डोळे किंवा आकर्णनयन म्हणजे कानापर्यंत लांब डोळे आहेत असे म्हणतात. डोळ्यांमध्ये अनेक प्रकारचे रंग असतात. उदा. निळे डोळे, राजकपूरच्या अशा डोळ्यांकडे बघूनच "मेरा दिल ले गया तेरी नीली नीली आँखे' म्हटले आहे. काळेभोर डोळे, कृष्णाचे डोळे "पावसाळी नभापरि' म्हटले गेले आहे. काळ्याभोर, टपोऱ्या, बोलक्‍या डोळ्यात एखादे प्रतिबिंब दाखवून त्याचे मनभावना दाखवितात!
डोळ्यातूनच माणसांची संस्कृती, प्रकृती, तसेच विकृती समजते. चिनी, जपानी, नेपाळी, मंगोलियन वंशातील माणसांचे डोळे बारीक आणि मिचमिचे असतात, तर दक्षिण भारतीय लोकांचे डोळे मोठे, पाणीदार, आकर्षक असतात. दुसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकताना प्रथम आपली नजर त्याच्या डोळ्याकडेच जाते. त्यातूनच त्यांचा प्रेमभाव, कृतज्ञता, भक्तीभाव दिसून येतो. त्या व्यक्तीची ओळख त्यामुळे त्याची नीति, रीती, कृती घडली जाते किंवा समजते. डोळ्यांनी खुणावणे, संकेत तसेच संदेश देणे ही महत्त्वाची कार्ये घडतात. राजाज्ञा डोळे मिटून दिली जाते किंवा मान्यता मिळाली असे मानतात. डोळ्याच्या बुबळांत सारे सृष्टीसौंदर्य दाखवून जाहिरात केली जाते. डोळ्यांच्या सौंदर्यावरून, आकारावरून, रंगावरून मुलामुलींची नावे ठेवण्याची प्रथा नेत्रमहात्म्य सांगते. उदा. ः मीनाक्षी, नयना, कमलाक्षी, हरिणाक्षी, सुनेत्रा, अभिनेत्री.

डोळे हे ज्ञानाचे बाह्य साधन (इंद्रिय) आहे. त्यामुळेच डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट खरी मानली जाते. ह्यालाच "चक्षुर्वेसत्यम' म्हणतात. गुन्ह्याचा तपास लावताना याचा प्रत्यक्ष प्रमाण म्हणून उपयोग होतो. अनेक ठिकाणी मुख्यतः क्रिकेटची कॉमेंट्री करत असताना "आँखो देखा हाल' सांगतात. आपल्याला परिचित चित्रात अर्जुन रथावर उभा राहून कृष्ण सारथी असताना युद्धभूमीवर तो गीता सांगतो. त्याने जी गीता अर्जुनाला सांगितली ती संजयाने अंध धृतराष्ट्राला वर्णन करून सांगताना, त्याला चामड्याच्या (नेहमीच्या) डोळ्यांनी दिसत नाही. तेव्हा त्याला दिव्यचक्षू देतात, मगच यो युद्ध पाहू शकतो. इंद्राला हजार नेत्र आहेत, परंतु अहल्येच्या लालसेने त्या डोळ्यांवरच संक्रांत येते. परमपुरुषाचे वर्णन करताना सहस्राक्ष, सहस्रपाद म्हटले आहे. गीतेत श्रीकृष्णाने विभूतीयोगात अनेक भयंकर डोळे जे आग ओकतात, तसेच सुंदर नेत्रही दाखविलेले आहेत. मानवाप्रामणे ईश्‍वराला बरोबर डोळ्यांच्या ठिकाणीच डोळे असतील असे नाही ते इतर इंद्रियांच्या ठिकाणीही असू शकतात, म्हणूनच तो ईश्‍वर सर्व बाजूंनी आपल्याला पहातो आहे असे म्हटले जाते.

मोराला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला होता, तेव्हा त्याच्या पिसाऱ्यावरील डोळ्यांना दिसणर नाही असा शाप दिला होता, अशा कथा आहेत. डोळे नसणाऱ्यांना आपण अंध म्हणतो. परंतु, खरे तेच डोळस असतात, त्यांचे सहावे इंद्रिय जागृत असते. नुकतीच त्यांची क्रिकेटची मॅच पाहिली आणि आश्‍चर्यचकीत झाले. अत्यंत सराईतपणे ते खेळत होते. तसेच अंधांचे एक संस्कृत नाटकही पाहिले होते. त्यांच्या स्टेजवर वावरण्यापासून एकमेकांसमोर आपले संवाद बोलणे, पुन्हा विंगेत कुठेही धक्का न लागता जाणे, खरोखरीच सारेच अवर्णनीय तसेच अनाकलीय. लहानपणी माझे वडील संभाजी पार्कमध्ये अंधांचा बॅंड पहायला आवर्जून नेत असत, त्यांची वाद्ये हाताळण्याची, वाजविण्याची क्रिया पाहून आश्‍चर्य वाटे.

आळंदीच्या मरकळ रस्त्यावरील "अंध मुलींची शाळा' पाहण्याचा योग वसुधा गोखले यांच्याबरोबर आला. त्या मुलांची डोळस कृती पाहून मन थक्क झाले. आळंदीच्या शताब्दीपूर्ती करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकवणारा अंध विद्यार्थी, केवळ श्रवणभक्तीने आणि गुरुमुखातून ज्ञानेश्‍वरीतील अध्याय आणि गाथेतील अभंग तोंडपाठ म्हणून दाखवत होता, ही डोळस भक्ती गुरुशिष्यांतील नाते दृढ करीत होती.
असे हे नेत्रपुराण सांगावे आणि ऐकावे तितके थोडेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sina garsole wirte article in muktapeeth