अ.. आ... आई

सई
रविवार, 14 मे 2017

हाय! हाऊज गोईंग लाईफ?... ऑल इज वेल!... का नाही?... काय झालं?... आय नो आय नो...

माणसाच्या मनाला सतावणारे मोस्ट ऑफ प्रॉब्लेम्स हे माणसाच्या वागणुकीमुळेच निर्माण झालेले असतात, नै का?... ह्याने असं केलं, त्याने तसं करायला नको होतं, किमान माझ्या बाबतीत तरी ती असं कधी वागेल असं वाटलं नव्हतं, तो असं म्हणूच कसं शकतो? नाही ओळखता आलं मला त्याला... असंच काही काही... सही ना फ्रेंडस्‌, आपल्या बऱ्याचशा दुःखांचं मूळ?

हाय! हाऊज गोईंग लाईफ?... ऑल इज वेल!... का नाही?... काय झालं?... आय नो आय नो...

माणसाच्या मनाला सतावणारे मोस्ट ऑफ प्रॉब्लेम्स हे माणसाच्या वागणुकीमुळेच निर्माण झालेले असतात, नै का?... ह्याने असं केलं, त्याने तसं करायला नको होतं, किमान माझ्या बाबतीत तरी ती असं कधी वागेल असं वाटलं नव्हतं, तो असं म्हणूच कसं शकतो? नाही ओळखता आलं मला त्याला... असंच काही काही... सही ना फ्रेंडस्‌, आपल्या बऱ्याचशा दुःखांचं मूळ?

इतरांना, विशेषतः आपण ज्यांना ‘आपलं’ म्हणतो त्यांना आपण ओळखू न शकल्याचं दुःख किंवा त्यांना आपण ओळखतो, पूर्णपणे ओळखतो, असं वाटत असताना त्यांनी आपला पूर्ण अपेक्षाभंग होईलसं वागणं खटकतं; नव्हे, काळजाला खूप दुखवून जातं आपल्या!... पण खरं सांगू का, आपण कितीही म्हटलं की, आपण अमक्‍या-तमक्‍याला फार जवळून ओळखतो, अमक्‍या-तमक्‍याबद्दल आपण इतक्‍या खात्रीनं सांगू शकतो वगैरे... तरी ते पूर्णतः कधीच खरं असू शकत नाही. कारण एखाद्या विशिष्ट क्षणी, विशिष्ट प्रसंगी माणूस कसा वागेल, हे त्याचं त्याला स्वतःलाच जर ठामपणाने सांगता येत नसेल तर दुसरा कोणी कसं काय सांगू शकेल, नाही का? हां, नाही म्हणायला, या जगातली एक व्यक्ती मात्र आपल्याला आपल्याही पेक्षा जास्त आणि जास्त चांगल्या तऱ्हेनं ओळखत असते. बोलो कौन? गेस्स... नाही आठवत? नाही ओळखता येत?... अरे जरा ताण द्या मेंदूला - मनाला... येस्स! राईट!! आई! आपली आई... ही एकच व्यक्ती या जगात असते, जी आपल्याला इतरांपेक्षा किमान नऊ महिने जास्त ओळखत असते, अधिक ओळखत असते. खरंय ना? तसंही कुणीतरी म्हणून ठेवलंच आहे, की देव एकाच वेळी सगळीकडे असू शकत नव्हता म्हणून त्यानं आपल्या साऱ्या लेकरांची काळजी घेण्याकरिता ‘आई’ निर्माण केली. आणि ती स्त्री म्हणून कशीही असली तरी तिच्यातल्या ‘आई’चं हृदय त्यानं इतकं विशाल ठेवलं की, लेकरांना तिनं ‘शेवटची’ संधी पुन्हा पुन्हा द्यावी, त्यांच्या चुका तिनं मोठ्या मनानं सदैव माफ कराव्यात, त्यांच्या भल्यासाठी तिनं आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत झटावं, प्रार्थना करत राहावं!

बट टेल मी फ्रेंडस्‌, जी आई आपल्याला इतकं ओळखते, ओळखून असते, तिला आपण किती ओळखतो? ओळखण्याचा, जाणून घेण्याचा कितीसा प्रयत्न करतो? जगात प्रेमानंतर सर्वाधिक कविता आईवरच केलेल्या आढळतात. जगातली मोठमोठी माणसं आपल्या जडण-घडणीचं श्रेय आईलाच देतात. अनेकांनी आपल्या लेखणीनं आईचं गुणगान केलंय. पण तरीही टेल मी यार, आपण आपापल्या आईला कितपत ओळखतो? तिच्याबद्दल कितपत जाणतो?...

जगातल्या अनेक देशांत मे महिन्याचा दुसरा रविवार आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ‘मातृ दिन’ किंवा ‘मदर्स डे’ म्हणून साजरा करतात आणि यंदा तो तसा परवा १४ तारखेला येतो आहे. त्यानिमित्तानं मागे एकदा वाचनात आलेली व्हॉटस्‌ऍपवरची एक फॉर्वर्डेड पोस्ट आठवली. शाळेत असताना हमखासपणे निबंधाच्या काही विषयांपैकी एक विषय ‘माय मदर’ किंवा ‘माझी आई’ हा असतोच. त्या विषयाला धरून ही पोस्ट होती. ती वाचताना तुम्हालाही तुमची आई किंवा आपलं आपल्या आईशी वागणं, आठवतं का, पाहा बरं ताडून...

राहुल गृहपाठ झाला का? हो आई! ‘आई’ या विषयावर बाईंनी निबंध लिहून आणायला सांगितला होता.
...माझी आई मला लवकर उठवते. गृहपाठ करून घेते. अभ्यास शिकवते. मला गोष्ट सांगते. बरं नसेल तर दवाखान्यात नेते...
पुरे पुरे! चल बॅग भर लवकर. नाश्‍ता ठेवलाय. डबा भरून घे. राहुलची धावपळ उडाली. आईनं भराभर मदत करून शाळेत पाठवलं. पण संध्याकाळी राहुल आला तो हिरमुसला होऊन. कारण सगळ्या मुलांनी निबंध लिहिले होते. बाईंनी मात्र वेगळंच सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘नो! आई तुमच्यासाठी खूप काही करते म्हणून ती तुम्हाला आवडते. पण या आईबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तिच्या आवडी-निवडी, तिचे छंद, तिचं शिक्षण, तिचा वाढदिवस, तिच्या श्रमांबद्दल तुम्हाला, तुमच्या वडिलांना, भावंडांना काय वाटतं? तुम्ही सर्वजण तिच्यासाठी काय करता? या सगळ्याचं निरीक्षण करा. लिहिताना हवं तर तुमच्या ताईची किंवा दादाची मदत घ्या. वडिलांनाही विचारा. आईला मात्र विचारायचं नाही. तुम्ही आठवीतली मुलं. थोडं विचारपूर्वक लिहा...'

सगळी मुलं विचारात पडली. म्हटलं तर सोपा, म्हटलं तर कठीण असा हा निबंध.
राहुलच्या निरीक्षणाला सुरुवात झाली.
आईच्या आवडी-निवडी?... आपण फक्त बटाट्याची भाजी खातो. आई तर सगळ्याच भाज्या-चटण्या खाते. सर्वांना ताजं वाढते आणि कधी कमी पडलं तर थोडंसंच खाऊन उठते. जास्त उरलेलं फुकट जाऊ नये म्हणून नको असतानाही खाते. शिळं स्वतःच्या पानात घेते. अरे, आपण कधीच आईला म्हणत नाही, आई, आज मला शिळं वाढ. तू ताजी पोळी खा. आपणच कशाला! बाबा, ताई, दादा एवढे मोठे. पण ते देखील म्हणत नाहीत.

मला टेबल टेनिस खेळायची आवड आहे, म्हणून आईने माझ्या वाढदिवसाची वाट न बघता मला त्याचं साहित्य आणलं. आईला कसली बरं आवड आहे? बरोबर! वाचनाची आणि हार्मोनियम वाजवण्याची. पण गेली काही वर्षे हार्मोनियम बिघडला आहे. आईनं त्याच्या दुरुस्तीबद्दल सगळ्यांना सुचवून पाहिलं. सर्वांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे वर्ष झालं हार्मोनियम बंदच आहे. थोडा जरी वेळ मिळाला तरी आई काही वाचत असते. पण एखादं पुस्तक खरेदी करायचं असेल तर बाबा म्हणतात, ‘पुस्तकांच्या किमती फार वाढल्या आहेत. त्या पैशांत ताईच्या अभ्यासाचं एखादं पुस्तक येईल.’ आई हे पटवून घेते.

रंग? आईला कुठला बरं रंग आवडतो? काही कळत नाही. कारण आई स्वतःला फारच क्वचित साडी घेते. लग्नकार्यात वगैरे मिळालेल्या साड्या ती वापरते. त्या ज्या रंगाच्या असतील त्या ती चालवून घेते. पण बेडशीटची खरेदी करताना मात्र आईने आकाशी रंग निवडला होता.

आईचा वाढदिवस कधी बरं असतो? आईलाच विचारायला हवं. पण बाई म्हणाल्या ‘आईला काही विचारायचं नाही.’ ताईलाच विचारावं. ‘अरे, १२ सप्टेंबर!’
काय करतो बरं आपण या वाढदिवसाला? छे, तो साजरा केल्याचं आठवतच नाही. ताईचा, माझा व बाबांच्या वाढदिवसाला मात्र आई आमच्या आवडीचे पदार्थ करून करते. ताईसाठी दुधी हलवा, माझ्या वाढदिवसाला गुलाबजाम, बाबांच्या वाढदिवसाला पुरणपोळी. आईला कोणता गोड पदार्थ आवडतो? काही माहीत नाही. ‘अहो बाबा, जरा इकडे लक्ष द्या ना!’
‘अरे कटकट करू नकोस. मी वाचतोय, दिसत नाही? आईला काय आवडतं, ते तिला विचार. मला काय माहीत?’
ताईला विचारलं, तर तिला पण माहीत नव्हतं.

गेल्या आठवड्यात ताई तिच्या मैत्रिणींबरोबर सहलीला जाणार होती. आई लवकर उठली. तिने दुधी हलवा बनवला. तिखट-मिठाच्या पुऱ्या करून दिल्या. बाबांनी बरोबर दिलेल्या पैशांखेरीज तिच्या जवळची पन्नासची नोट दिली. माझ्या सहलीच्या वेळी आणि बाबांच्या सहलीच्या वेळेसही आई असंच काही ना काहीतरी करते. ती कधी बरं गेली होती सहलीला? बरोबर, गेल्या महिन्यात तिच्या महिला मंडळाची सहल होती. पण बाबांनी त्यांच्या मित्रांना जेवायला बोलावलं होतं. म्हणून आईला सहलीला जाणं रद्द करावं लागलं.

आईचं शिक्षण? कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापर्यंत, असं आठवतं. कारण एकदा आई म्हणाली होती, शिकून डॉक्‍टर व्हायचं होतं. पण दोन मामांच्या शिक्षणाकरिता आईला शिक्षण सोडावं लागलं आणि तिचं लग्न करून दिलं. लग्नानंतर मुलांचे जन्म आणि संसार. आईला पुढे शिकता आलं नाही. आई तिच्या मैत्रिणीला असं काहीतरी सांगत होती, असं अंधुकसं आठवतंय.

वर्तमानपत्र वाचायला मात्र आईला फार आवडतं. दुपारी सगळी कामं झाली की आई पेपर वाचते. पण ताई कॉलेजला जायला लागल्यापासून आणि मी पाचवीत गेल्यावर आमचं इंग्लिश सुधारायला हवं म्हणून बाबांनी मराठी पेपर बंद करून टाकला आणि इंग्लिश पेपर सुरू केला. तेव्हापासून आईचं पेपर वाचनच थोडं कमी झालं आहे. पेपर चाळून ती ठेवून देते. फावल्या वेळात टीव्ही बघावासा वाटतो तिला. पण बाबा घरात आले की इंग्लिश न्यूज किंवा इंग्लिश चर्चेचे कार्यक्रम लावतात. ताई तिच्या आवडीचे केबलचे पिक्‍चर्स लावते आणि मला कार्टून्स हवी असतात. या सगळ्या भानगडीत आईला फारच कमी वेळ टीव्ही बघायला मिळतो.

आईच्या मैत्रिणी? तशी एखादीच तिची खास मैत्रीण आहे. म्हणजे सगळ्यांचं करता करता मैत्रिणींकरिता तिला वेळच मिळत नाही. ताई मैत्रिणींबरोबर सिनेमाला किंवा पिकनिकला जाते. मी तर दररोजच मित्रांबरोबर संध्याकाळी खेळायला जातो. बाबांचे मित्र शनिवार-रविवार पत्त्यांचे डाव टाकतात. आई सर्वांसाठी चहापाणी करते. पण आईची ती मैत्रीण आली की सर्वजण तिची टिंगल करतात. ती उषा बोलते कशी, ती भटकभवानी आहे, कुणाकडं कधी जावं असे मॅनर्स तिला नाहीत, अशी टीका बाबा नि ताई करतात. त्यामुळं आईसुद्धा तिच्याशी मोकळेपणाने बोलत नाही.

आईला संध्याकाळी फिरायला जायला आवडतं. पण शेजारच्या काकूंना नाही आवडत, असं आई एकदा म्हणाली होती. बाबांना एक तर ऑफिसमधून यायला उशीर तरी होतो किंवा लवकर आले तर कंटाळा येतो. ताई तिच्या मैत्रिणींच्या घोळक्‍यात. मग आई एकटीच भाजी घेऊन फिरून येते. पण तिला घरी परतायची घाई असते. कारण तिला उशीर झाला तर आम्ही भूक-भूक करून तिला हैराण करणार.

कधी कधी ती उगीचच का चिडते, वैतागते ते आता मला थोडं थोडं समजतंय. एके दिवशी मी खेळायला गेलो होतो. तिन्हीसांजा झाल्या होत्या. मला तहान लागली म्हणून मी घरी आलो, तर आई दूरवर खिडकीतून बघत रडत होती. मी आईला विचारलं, ‘आई काय झालं?’ ‘काही नाही, कुठं काय?’ चटकन डोळे पुसत आई म्हणाली. ‘आई, सांग ना काय झालं?’ परत म्हणालो. तर ती म्हणाली, ‘अरे काय सांगू? लहान आहेस तू! आणि मोठा झालास तरी काय फरक पडणार आहे म्हणा!...’ आई पुटपुटत म्हणाली मला. पण काही कळलं नाही. मी तिच्याकडे दुर्लक्ष करून खेळायला धूम ठोकली.

बाईंनी पंधरा दिवसांची मुदत निबंध लेखनासाठी दिली होती. राहुलचं निरीक्षण चालू होतं. आईचं वागणं व घरातील इतरांचं वागणं याची थोडीफार तुलना करत असताना आई थोडीशी का होईना त्याला उमगली होती. आईवरचा निबंध पुरा होत आला होता. आणि निबंधाचा शेवट करता करता त्याच्या वहीवर त्याच्याच डोळ्यांतले दोन अश्रू ओघळले.

खरं तर फ्रेंडस्‌, आपली आई, या गोष्टीतल्यासारखी मन मारून जगणारी पारंपरिक गृहिणी असो किंवा पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडलेली आजची आधुनिक गृहिणी अधिक करिअरिस्ट वुमन असो, आई या भूमिकेत ती नेहमीच त्यागमूर्ती असते. स्वतःआधी आपल्या काळजाच्या तुकड्यांचा विचार करणारी कोमल हृदयांगिनी असते. काळानुरूप, परिस्थितीनुरूप तिच्या त्यागाचे विषय बदलले असतील, तिच्या काळजी-चिंतांचे मुद्दे बदलले असतील, पण तरीही आईचं हृदय ही गोष्ट मात्र तीच आहे. तिच्या त्या वैशिष्ट्यपूर्ण हृदयाचा, मातृहृदयाचा आपण नेहमीच आदर करूया. तिला जाणून घेऊन तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं ‘कारण’ होण्याचा प्रयत्न करूया... कारण ‘माँ की दुवा’ हा केवळ फिल्मी डायलॉग नाहीय;
आईच्या आशीर्वादासारखी दुसरी चीज या जगात, केवळ
‘आईचा आशीर्वाद’ हीच आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smartsobati article for mother