बाळ जन्मले गं सये!

स्मिता सुहास मुंगळे
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

बाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी.

बाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी.

तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड रस्ता. बाळंतपणासाठी कडूसला गेले; पण काही कारणाने मला पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. खेडच्या शासकीय रुग्णालयातून रात्री दहा वाजता रुग्णवाहिका निघाली. गाडीने वेग घेतला अन्‌ चाकणला चाक पंक्‍चर झाले. वेळ रात्रीची. दुकाने बंद होती, पण अल्लाच्या रूपाने रफिकभाईचे गॅरेज अर्धवट उघडे होते. वडिलांनी त्याला विनंती केली, गाडीतून मुलीला बाळंतपणासाठी पुण्याला नेतोय, हे सांगितले. तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन त्याने तातडीने पंक्‍चर काढले. गाडीने पुन्हा वेग धरला. सलाइन लावले होते. पुन्हा दुसरा प्रसंग घडला. गाडीतील पेट्रोल संपले. आता काय करायचे? कुठे जायचे? डोळ्यांसमोर काजवे चमकले. आई-वडील तर अक्षरशः रडू लागले; पण गाडी थांबली, तेथेच पेट्रोल पंप होता. एक सद्‌गृहस्थ पेट्रोल पंपाजवळ उभे होते. वडिलांनी त्यांना विनंती केली, की मी अत्यंत अडचणीत आहे. मुलगी बाळंतपणासाठी पुण्याला नेतोय; पण पेट्रोल संपले. त्या गृहस्थांनी पंप सुरू केला आणि गाडीत पेट्रोल भरले. माझा परमेश्‍वराचा धावा सुरू होता. माझी परिस्थिती अत्यंत बिकट होती. वेदना असह्य होत होत्या. गाडीने वेग घेतला. शिवाजीनगर मार्गाने फडके हौद, दारूवाला पूल येथून शेठ ताराचंद रामनाथ या ठिकाणी गाडी आली. तत्पूर्वी डॉक्‍टरांना निरोप गेला होता. डॉक्‍टर सर्व तयारीसह सज्ज होते. स्ट्रेचरवरून मला थेट "ऑपरेशन थिएटर'मध्येच नेले. डॉक्‍टरांनी पाहिले. परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. दोघांपैकी एक जणच वाचेल. प्रयत्नांची शिकस्त करतो, असे कुटुंबीयांना सांगितले. परिस्थिती कठीण होती; पण डॉक्‍टरांनी आम्हा दोघींनाही वाचवले. कन्यारत्न झाले होते. तेव्हा माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंदाला उधाण आले. मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा सर्व प्रसंग मला समजला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smita mungle write article in muktapeeth