शपथा अन्‌ वचने पाळली जायला हवीत, अन्यथा आपण दुसऱ्यांना दुखावतो

स्मिता पत्की 
सोमवार, 30 जुलै 2018

शालेय मुलांच्या गप्पा कानावर आल्या. एक आईला विचारत होता, ""तू मला क्रिकेट कोचिंगसाठी पाठवणार आहेस ना? मला नवीन किट घेऊन दे.'' आई उत्तरली, ""हो रे, नक्की.'' लगेच त्याचा चेहरा खुलला. लहानपणी सुटीत कोकणात आजोळी जायचे, पोहायचे, भाड्याची सायकल चालवायची, रोज समुद्रावर पाण्यात लाटांशी खेळायचे अशा मजेत दिवस संपायचे.

शालेय मुलांच्या गप्पा कानावर आल्या. एक आईला विचारत होता, ""तू मला क्रिकेट कोचिंगसाठी पाठवणार आहेस ना? मला नवीन किट घेऊन दे.'' आई उत्तरली, ""हो रे, नक्की.'' लगेच त्याचा चेहरा खुलला. लहानपणी सुटीत कोकणात आजोळी जायचे, पोहायचे, भाड्याची सायकल चालवायची, रोज समुद्रावर पाण्यात लाटांशी खेळायचे अशा मजेत दिवस संपायचे. "मामाच्या गावाला' जाण्याचे बेत तर सर्व लहानग्यांचे ठरलेले! आमच्या खेळायला नक्की भेटण्याच्या जागा, खाऊची देवाणघेवाण, खेळण्यांची अदलाबदल आणि इतरही बऱ्याच गोष्टींसाठी "हो, देवाशपथ नक्की' असे शब्द असत. शपथ घेताना गळ्याला चिमटा घेतला जाई. वयाप्रमाणे, स्थळकाळानुसार ही "आश्‍वासने' बदलत जातात. पण त्याची पूर्तता होते का? दिलेला शब्द पाळला जातो का? काही ठिकाणी नशीब साथ देत नाही. काही ठिकाणी कष्ट वा प्रयत्न कमी पडतात. काहींमध्ये जुनी मते, प्रथा आड येतात, तर कधी हेतुपुरस्सर गोष्टी विसरल्या जातात. "दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे,' हे विसरले गेल्यास सोसावी लागणारी निराशा, वेदना, विरस माणसाला कुठल्या कुठे नेऊन सोडते! 
घरातील ज्येष्ठांबाबत असेच काहीसे घडत असते. दुसऱ्यांवर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्या वृद्धांसाठी ही आश्‍वासने पाळणे फार गरजेचे असते! त्यांना दिनक्रम सांभाळताना क्षणोक्षणी मदत लागते. अशा परिस्थितीत त्यांची मानसिक आंदोलने, शारीरिक व्याधींमधील चढ-उतार जपावा लागतो! परावलंबित्व त्यांना निराधार करते. त्यामुळे एखादा प्रेमाचा शब्द, आर्थिक मदत, आवडत्या व्यक्तींची भेट, चांगल्या चवीचा पदार्थ त्यांना भरभरून सुख देतो. त्यांचा आनंदी चेहरा, उत्साह ओसंडतो. कोणी त्यांना "मी येईन भेटायला' म्हटले तर ते त्या दिवसाची वाट बघत राहतात! "वचने किं दरिद्रता' या उक्तीप्रमाणे आश्‍वासने देणे सोपे आहे, पण ती पाळणे फारच कठीण असते. त्यांच्या मनासारखे न झाल्यास आतल्या आत घुसमट होऊन, मूक रूदनाने आजार बळावतात. थोडक्‍यात काय, तर शपथांवर विश्‍वास न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून एखाद्याला बोलते करावे वा त्यांना अचानक भेटून आनंदी करावे! तरच वृद्धांची मानसिकता बदलेल. घराघरांतील लहानथोरांचे नाते सुधारेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smita patki write blog muktpeeth