संस्कृती जपणारी माणसं

स्मिता पतकी
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

अमेरिकेच्या संस्कृतीविषयी बोलले जाते. पण अमेरिकेतच वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत. आमिश कम्युनिटीही आपली संस्कृती जपून आहे. समूहाने राहायचे, निसर्गात जगायचे अशी आदिम व आधुनिक जगाच्या सीमारेषेवरची ही जीवनपद्धती आहे.

अमेरिकेच्या संस्कृतीविषयी बोलले जाते. पण अमेरिकेतच वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत. आमिश कम्युनिटीही आपली संस्कृती जपून आहे. समूहाने राहायचे, निसर्गात जगायचे अशी आदिम व आधुनिक जगाच्या सीमारेषेवरची ही जीवनपद्धती आहे.

यंदाच्या माझ्या डॅलस (अमेरिका) येथील मुक्कामात बेव्हर्ली लुईस या श्रेष्ठ लेखिकेच्या कादंबऱ्या वाचनात आल्या आणि त्यातील "आमिश कम्युनिटी'बद्दल एक औत्सुक्‍य मनात निर्माण झाले. नवलाची गोष्ट म्हणजे जूनअखेरीस फिलाडेल्फियापासून दीड तासाच्या अंतरावर आम्हाला पेनसिल्व्हेनिया राज्यातील लॅंकास्टर काउंटीमध्ये या अमिश लोकांच्या वसाहतीत फिरण्याचा योग आला. आमिश लोक हे पहिल्या महायुद्धाच्या आधी 1720 च्या सुमारास अमेरिकेत मुख्यतः पेनसिल्व्हेनिया, कॅनडा, ओहायो भागात येऊन राहिले. दक्षिण जर्मनी व स्वित्झर्लंडहून तत्कालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्यांनी देशांतर केले. त्यांना डच, जर्मन, इंग्लिश भाषा येते. आजही हे लोक रोज बायबलचे वाचन, जीझस हा देव मानतात. शेती व त्यावर निगडित कामे करून आयुष्य जगतात. त्यांची घरे साधी, स्वच्छ, मोठी व शेतात बांधलेली असतात. एकेका घरात दहा-बारा मुले असतात व काही घरातून चार पिढ्या वावरताना दिसतात. नव्वद व त्याहून मोठे वय असलेली स्री-पुरुष शेतात काम करताना दिसले. मका, गहू, सोयाबीन, फळे, भाज्या, तंबाकू अशी पिके घेतली जातात. सायलो नामक उंच सिलेंडरसारखे धान्याचे कोठार असते. त्यांच्या घरात आजही केरोसीनवर पेटणारे दिवे, कंदील आहेत. त्यांना विजेचा वापर करायचा नसल्यामुळे टी. व्ही., कॉम्प्युटर, सेलफोन, म्युझिक सिस्टिम यांचा वापरही नाही. घरी बनवलेल्या स्कूटरवरून तरुण मुले- मुली रस्त्यांवरून लांब ये जा करतात. घरातील स्रिया, मुली पूर्ण वेळ स्वयंपाक, घरकाम, विणकाम, शिवणकाम करून जॅमजेली, लोणची व इतर पदार्थ करून विकतात. स्रिया गोऱ्या व सुंदर असतात. पण आजही त्यांना सौदर्यप्रसाधने, मेकअप, पार्लर यांची गरज वाटत नाही. ठराविक प्रकारची केशरचना, त्यावर बॉनेट, अंगात लांब झगा, त्यावर काळे एप्रन्स घालतात. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या या लोकांना चार रंग महत्त्वाचे वाटतात. निळे आकाश, हिरवी झाडे, मातकट विटकरी रंगाची जमीन, धूळ व काळा रंग! पुरुष लग्नानंतर दाढी मिशी वाढवतात. स्रिया व पुरुष साधारण आठवीपर्यंत शिक्षण घेतात. नंतर पुरुष शेती, बांधकाम, सुतारकाम, लोहारकाम अशी मेहनतीची कामे करतात. मुलींना लग्न होईपर्यंत फक्त शाळेत शिक्षिकेची नोकरी करता येते. लग्नानंतर मात्र तिने फक्त कुटुंबाकडे बघायचे! स्रियांसाठी स्वयंपाक घरातच कॉट असते. वृद्ध, आजारी बायकामुले यांनी आतच आराम घ्यायचा. शिवणाचे पायमशिन असते. शेजारील मुली, बायका मिळून एकोप्याने लग्नाची कामे, रुखवत बनवतात. रविवारी कोणाच्या तरी घरी मोठ्या खोल्यामध्ये चर्चमधील धर्मगुरू व इतर मोठी माणसे जमून कौटुंबिक वादाचे प्रश्‍न सोडवतात, सामाजिक ग्रंथाचे वाचन करतात. त्यांच्या घराला मोठा गोठा असतो. तेथे धष्टपुष्ट गायी, घोडे, खेचर तसेच कोंबड्या, शेळ्यामेंढ्या, मोर असतात. शेतातली जुनी अवजारे, बग्गी, घोडागाडी वापरतात.

हे सर्व बघायला, फिरायला त्यांच्या वस्त्यांमध्ये जाण्यासाठी व नमुना म्हणून एखादे घर आतून बघायला आपण तिकीट काढून टूर घेऊ शकतो. घर फिरून दाखवायला, माहिती द्यायला गाईड असतात. घरगुती वस्तू विकण्यासाठी बायका लहान मोठी स्टोअर्स चालवतात. मोठी क्विल्टस्‌, बॉनेट्‌स, एप्रन्स, हॅट्‌स, बाळंतविडे, पर्सेस, डेकोरेटिव आर्टिकल्स, घर सजवण्याच्या वस्तू हे बघून छान वाटले. खाण्याचे पदार्थ वेगळे व फक्त स्रियांनी चालवलेले हॉटेलही होते. उत्तम नाश्‍ता, जेवण, तिखट गोड पदार्थ (त्यांच्या पद्धतीचे) असतात.

"अमिश, प्लेन, मेनोनाईट्‌स' अशा प्रकारचे लोक आपापल्या रुढी, परंपरा, जुनी मते व विचार यांना धरून पिढ्यान्‌पिढ्या राहात आहेत. आता मात्र काही तरुण मुलामुलींना या अशा बंधनातून बाहेर पडावेसे, मुक्त व्हावेसे वाटते आहे. मला मात्र पुस्तकामधून वाचायला मिळालेल्या या संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन घडले व एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smita patki's muktapeeth article