सामाजिक विषमतेची दरी

social inequality.
social inequality.

आपला समाज असंख्य अशा विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. हे फायदे आणि तोट्याचे प्रमाण आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो (शहर किंवा गाव), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा, आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अशा अनेक मोजता न येणाऱ्या बाबी आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिती आपण स्वेच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवाऱ्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल, हे नक्की.

एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असताना किंवा एखाद्या व्यक्तीने जीवनात किती यश संपादन केले याचा विचार होत असताना त्याला अवगत असलेले कौशल्य, ज्ञान आणि मिळवलेले गुण याचाच नेहमी विचार केला जातो. तो व्यक्ती राहतो कुठे, किती पैसे कमावतो, कुणासोबत उठतो-बसतो यावरून त्याचे समाजातील स्थान आणि ती व्यक्ती किती यशस्वी आहे हे मोजले जाते. पण त्या व्यक्तीने हे सर्व कौशल्य आणि यश कुठल्या परिस्थितीत मिळवलेले आहे याबद्दल कधीच बोलले जात नाही आणि त्याचा विचार पण केला जात नाही. सर्वांना कधीच एकसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागत नाही. दररोज वर्तमानपत्र वाचणाऱ्‍याला साहजिकच जगभरात सुरू असलेल्या घडामोडींचा बऱ्‍यापैकी अंदाज असतो व त्याचे सामान्यज्ञान पण बरे असते. वर्तमानपत्र ही शहरात राहणाऱ्‍या लोकांसाठीची एक गरज आहे. पण हेच वर्तमानपत्र गावातील किंवा दुर्गम भागातील व्यक्तीसाठी एक चैनीची वस्तू असते व ती सर्वसामान्य लोकांच्या घरी दिसून येत नाही. साहजिकच आहे की बहुतांश लोकसंख्या वर्तमानपत्रापासून वंचित राहते व सोबत येणाऱ्‍या ज्ञानापासूनपण. एका साध्या वर्तमानपत्राचा इतका मोठा परिणाम होत असेल तर इतर महत्त्वाच्या बाबींनी किती मोठा फरक पडत असेल याचा अंदाज बांधणे केवळ अशक्य. कारण कुणासाठी कुठली बाब महत्त्वाची असेल हे आपण कधीच ठरवू शकत नाही.

तीन-चार पिढ्यांपासून शिक्षणाची परंपरा असलेल्या घरातील लोकांना साहजिकच शिक्षण क्षेत्राची माहिती कितीतरी पटीने जास्त असते. त्या घरातील लोकांची तुलना आपण जेमतेम या पिढीपासून शिक्षण सुरू झालेल्या घरातील लोकांशी करूच शकत नाही. हेच साहित्य, क्रीडा, कला, संशोधन, मनोरंजन इत्यादी साठी लागू होते. तुम्हाला साहित्याबद्दल माहिती नाही, खेळाबद्दल माहिती नाही यासाठी कमी लेखले जाते. ज्यांना वर्तमानपत्र वाचणे हे भाग्याचे काम वाटते त्यांना असल्या मोजपट्टीत बसवणे हा आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांचा मोठा मूर्खपणा आहे. चारचाकी नसलेल्या व्यक्तीला चारचाकी चालवता येत नाही यासाठी हिणवणे यात कोणता शूरपणा ? सर्व बाजू जमेच्या असतील तर काम करणे किंवा यश संपादन करणे हे नेहमीच सोपे जाते. त्यामुळे कुठल्या परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे याला जास्त महत्त्व असले पाहिजे.

गेल्या काही वर्षात ‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’ या चळवळीला बरीच बळकटी येताना दिसतोय. म्हणजेच काय तर गुणवत्ता असलेल्या लोकांना वाचवा म्हणजे देश वाचेल. याचा अर्थ असा की जे आधीच हुशार आणि गुणवान आहे त्यांची गुणवत्ता वाढवायला आणखी प्रयत्न करा व त्यांना अतिरिक्त अधिकार द्या. भारत देश आधीच विविध प्रकारच्या वर्गवारीने ग्रासलेला आहे त्यात आणखी एका वर्गवारीची भर घालणे कितपत बरोबर हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. समजा आपण हे केले सुद्धा तर नेमके काय होईल? आधीच विविध स्वरूपात असेलेल्या फायद्यांमध्ये आणखी काही फायदे फक्त काही निवडक लोकांसाठी जोडले जातील व वंचित असलेले अनंत काळासाठी वंचितच राहतील. यामुळे समाजात आधीच मोठी असलेली आर्थिक आणि सामाजिक विषमतेची दरी आणखी मोठी होत जाणार जी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बाधा ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com