ठपक्यानुसार होणारी वर्गवारी

aadivasi
aadivasi

गेल्या महिन्यातील सदरामध्ये आपण समाजात असलेल्या विविध प्रकारच्या वर्गवारीवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला. त्यांचे प्रमाण, गुणधर्म, समाजावर होणारे परिणाम या बाबींचा पण विचार करण्यात आला. याप्रकारची वर्गवारी भूतकाळात होती आणि त्या भविष्यकाळात पण राहणारच. त्यांना ओळखणे, त्याबद्दल विचार करणे आणि चर्चा घडवून आणण्याचे धाडस आपण अंगीकृत करणे ही काळाची गरज होत चाललेली आहे. आपल्या सतत प्रयत्नांनी आपण त्यांची तीव्रता आणि त्यांच्या होणाऱ्या परिणामांवर मात्र थोडा का होईना आळा घालू शकतो.

आता चालू दशकामध्ये भारत देशाने आणि भारतातील जनतेने अनेक प्रकारचे चढ-उतार (बहुतेक टोकाचे) बघितले आहे. यात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, वैयक्तिक, शैक्षणिक, सांप्रदायिक, इतर जटील व न दिसणाऱ्या बाबींचा पण यात समावेश आहे. मागील काही वर्षापासून एक वर्गवारी (तशी जुनीच) नव्याने वर डोक काढत आहे. ती वर्गवारी म्हणजे समाजातील लोकांना आपल्या पूर्वग्रहित विचारांमुळे सोयीस्कर अशे ठपके लावणे व या ठपक्यानुसार त्यांची विविध गटांत विभागणी करणे. प्रत्येक विभागाला एका विशिष्ट प्रकारची ओळख आणि विचारांची नेमणूक केली जाते. त्या ठराविक विचारांच्या आणि ओळखीच्या बाहेर त्यांना बोलण्याची मुभा नसते. असे केल्यास त्यांना विविध प्रकारच्या सामाजिक आक्रोशाला तोंड द्यावे लागते. याच सर्व प्रकारातून एक मोठा संच निर्माण होतो ‘तुम्ही आणि आम्ही‘ असा.

शेती आणि उपजीविकेचा क्षेत्रात काम करीत असल्याने सतत वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात व हे अनुभव बरेचदा लोकप्रिय किंवा लोकांना सोयिस्कर असलेल्या मतांपासून भिन्न असतात. भारतातील शेती आणि ग्रामीण भागातील रोजगाराची स्थिति सध्या दयनीय आहे हे सर्वांना माहीतच आहे. या परिस्थितीत काही तरी सुधार व्हावा या दृष्टीने या क्षेत्रातील कार्यकर्ते सरकारकडे काही मागण्या लावून धरतात. इतर लोकांना या दयनीय अवस्थेबद्दल जागरूक करतात.

असाच काही प्रयत्न आदिवासी बांधवांकरिता गेल्या कित्येक वर्षापासून होतो आहे. प्रस्थापित सरकार, भांडवलदार आणि छोटे-मोठे उद्योजक या व्यवस्थेपासून आदिवासी बांधवांचे व त्यांच्या अधिकारचे संरक्षण व्हावे, त्यांच्या जमिनी लुबाडल्या जाऊ नये म्हणून बरेच लोकं त्यांच्या बाजूने सरकारशी आणि लोकांशी सतत चर्चा करीत असतात. शेतकरी, शेतमजुर किंवा आदिवासी या सर्व लोकांचे प्रश्न आपणा सर्वांना माहिती आहे तरीसुद्धा आपण या लोकांच्या हक्काबद्दल काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एका विशिष्ट वर्गात बसवून देतो. या वर्गाचे नाव आहे ''साम्यवादी'' किंवा डाव्या विचारसरणीचे. म्हणजे फक्त लोकांच्या हक्काबद्दल बोलल्याने तुमच्यावर आयुष्यभरासाठी ''डावे किंवा साम्यवादी'' असा ठपका लावला जातो.

अगदी हाच प्रकार दुसऱ्या बाजूला पण दिसून येतो. एखाद्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीने कितीही खरी आणि तार्कीक परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो उजव्या विचारसरणीचा असल्यामुळे तो मूर्खच असणार आणि त्यात काहीच तर्क नसणार असा ठपका पण आपणच ठेवतो. याच धर्तीवर ठपकेबाजी ही सर्वच क्षेत्रात दिसून येते. त्यामुळे एकदा कुणाला आपण ठपका लावला तर त्याचे मत आणि विचारांना क्षुल्लक ठरवण्यात आपण मोकळे. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्याचे सर्वस्वी ज्ञान आणि अनुभव मलाच आहे असा आपला समज होऊन बसतो. त्यामुळे नवीन अनुभव आणि नवीन ज्ञानाला तिथे जागा नसते. प्रस्थापित ठपके लावणाऱ्यांना हे पाहिजेच असतं कारण त्यामुळे त्यांचेच ज्ञान हे एकमेव मानले जात असते. पण या सर्व प्रकारात त्या क्षेत्राचे खूप मोठे नुकसान होते आणि परिणामी या वर्गवारीला कंटाळून बरीच लोक काम सोडून देतात.

मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे (ते दिवसेंदिवस कमी होतं आहे तो एक वेगळाच विषय आहे). त्यामुळे त्याला प्रश्न पडत असतात, प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न होतो आणि आलेल्या अनुभवांतून मते बनवली जातात. ही मते तयार होण्यात बऱ्याच गोष्टींचा वाटा असतो. कधी कधी ही मतं पूर्वग्रह ठेऊन बनली जातात तर कधी कधी पूर्वग्रहाच्या अगदी उलट जाऊन. त्यामुळे जरी लोकं एका विशिष्ट वैचारिक किंवा इतर गटात मोडली जात असेल तरी त्यांचा मतांचा विचार व्हायलाच हवा, त्यावर चर्चा पण व्हायला हवी. हे सारखं सारखं घडत गेलं की विचारांमधील विविधतेचा स्वीकार वाढेल, लोकांमधील संवाद वाढेल व आपोआपच लोकांचे पूर्वग्रह दूर होऊन आपण मनुष्याला एक मनुष्य म्हणून बघायला सुरुवात करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com