चालवुया हात, गिरवुया धडे काळाच्याही पुढे, वेध घेऊ

social work
social work

शतकांच्या प्रत्येक दालनात काळाचा आगाज ऐकणारी माणसं जन्माला आली. तत्कालीन माणसाने त्यांचे विचार समजून घेतले नाही. म्हणून, पुढे माणसाला अनेक संकटांशी सामना करावा लागला. सभावेताल दिसणारी सत्यता कथन करताना अनेकांना मृत्यूचा कराल जबडा आपलासा करावा लागला. सुकरात दार्शनिक सत्यता कथन करायचा म्हणून त्याला विषाचा प्याला ग्रहण करण्याची शिक्षा भोगावी लागली. भूतदया आणि प्रेम प्रचारक प्रभू येशूला काटेरी मुगुटासह वधस्तंभावर प्राण सोडावे लागले. संत तुकोबांना जनतेचा कळवळा होता म्हणून, तत्कालीन समाजद्वेषांनी तुकोबांना इंद्रायणी काठी ठार मारले. दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे यांना स्वतःचे प्राण गमावून सत्य कथनाची किंमत चुकवावी लागली. समाजासाठी विवेकशील विचारांची पेरणी करताना; सत्याला नेहमीच अग्निदिव्यातून प्रवास करावा लागतो. अभ्यासक, संशोधक, चिकित्सक उद्याच्या प्रश्‍नांची, समस्यांची जाणीव आपणास करून देतात, त्यावर उपायही सुचवतात. पण, त्याची उपयुक्‍तता समकाळाच्या माणसाला कळत असूनही "हे असे चालायचेच' म्हणून कानाडोळा करणारा सुस्त समाज काळाच्या प्रत्येक कालखंडात जन्माला आला.
अशी लुप्त झालेली विचारशील माणसे काळाच्या पुढे होती. त्यांना उद्याचे भविष्य कळायचे. पण, अविवेकाचा वारसा जपणाऱ्या पिढ्याही काळासोबत जन्माला आल्या. आपले हित, वर्चस्व, धर्म-राजसत्ता, अस्तित्व इत्यादी वादाच्या लढाईत समाजाचे माणिक-मोती गमावून बसलो. उद्या निसर्गातील प्राणी धोक्‍यात येईल म्हणून अहिंसेच्या तत्त्वाचा परिपोष करणारा धर्म अस्तित्वात आला. माणसाच्या मनाच्या नाना अवस्थांवर वेगवेगळ्या धर्म विचारधारा निर्माण झाल्या. थोरपुरुषांनी समाजाला चांगलं काय आहे, ते देण्याचा प्रयत्न केला. पण, भक्‍त आणि अनुयायांनी याचे अवडंबर माजवून माणसाला विकासाच्या मूळ प्रवाहापासून परावृत्त केले.
एक जुना प्रसंग आठवतो. वैनगंगेच्या काठावर वसलेल्या आष्टीत काही वर्षे घालवण्याचा योग आला. तिथे एक वेडसर माणूस फक्‍त अंडरविअर घालून दिवसभर महामार्गावर फिरायचा. त्याचा हा दिनक्रम होता. कुणी देईल ते खायचा. ऊन, पाऊस, थंडीत अंगावर त्याच्या वस्त्र नसायचे. कुणी वस्त्र दिले तरी तो स्वीकारायचा नाही. मात्र, त्याचा नित्यक्रम वाखाणण्याजोगा होता. रस्त्यावर पडलेले काचेचे तुकडे, खिळे, दगड उचलून रस्त्याच्या कडेला फेकायचा. प्लॅस्टिकचा तुकडा, कागदाचा बोळा कुणी टाकताना दिसला की, लगेच धावून यायचा; उचलून रस्त्याच्या बाजूला फेकायचा. त्याच्या कृतीचे तत्त्वज्ञान बघून सुज्ञ माणसालाही लाज वाटायची. आमचे मित्र प्रा. डॉ. राज मुसने म्हणायचे, "हा वेडा नाही, संत आहे.' आज हयात आहे की नाही, माहीत नाही. पण, त्याच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आम्हाला बरेच काही सांगून गेले. त्याच्या कृतीत दडलेला मूलमंत्र गाडगेबाबांच्या विचारांशी नाते सांगणारा होता. दुसऱ्यांच्या वाटेतील काटे वेचण्याचे त्याला वेड लागले होते. तो संतांच्या कुळाचा होता.
संशोधक वेडे असतात, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. संत, संशोधक, विचारवंत, समाजसेवक यांना सकल समाज म्हणजे आपलं घर, कुटुंब वाटत असते. त्यांना समकाल अवगत झालेला असतो. भविष्याची नांदी कळत असते. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे' या ओळीतून तुकोबांना जंगल आणि प्राणी आम्हाकरिता किती महत्त्वाचे आहेत, हे सांगायचे होते. आपले आणि त्यांचे नाते सग्या-सोयऱ्यांचे आहे, त्यांवर आम्ही निर्भर आहोत. पण, त्यांचे तत्त्वज्ञान बुडबुड्यागत मानवी अंधकाराच्या डोहात विरून गेले. आज होणारी वृक्षतोड, प्राण्यांच्या कत्तली आपल्या विकासाला हजारो वर्षे मागे नेत आहेत. तुका काळाच्या पुढे होता. त्याला मानवाचे अंतर्बाह्य जग उमगले होते.
काही माणसं आपल्या आजूबाजूला समकालासोबत उद्याचा काळ सुंदर करण्यासाठी धडपडत असतात. सर्वानंद वाघमारे असाच ध्येयवेडा माणूस. आठ वर्षांपासून आपल्या आयुष्यातील सकाळ-संध्याकाळ ग्रामपंचायतीच्या बागेसाठी खर्ची घालतो. मौजा बामणवाडा, राजुरा जि. चंद्रपूर येथील कृष्णनगरीच्या ओपन स्पेसवर त्यांनी एक सुंदर बाग तयार केली आहे. मुलांनी यावं, तिथे मनसोक्‍त आनंद घ्यावा. म्हणून सतत धडपडणारा माणूस. जेव्हा तिथे झाडे लावल्या गेली तेव्हा पाण्याचे साधन नव्हते. जमेल त्याला विनंती करून, झाडांना पाणी देऊन, भरउन्हाळ्यात झाडं जगवली. त्यांच्या स्वभावातील नम्रता वृक्षांच्या अंगात आल्याचे जाणवते. "एका माणसाची बाग' म्हणून त्या बागेची ओळख झाली आहे. हे करताना स्वतःला प्रसिद्धी अथवा कुठलाही लाभ प्राप्त व्हावा, अशी अपेक्षा त्या माणसाच्या मनात मुळीच नाही. शासनाच्या दरबारी खेटरा झिजवून ओपन जिम, बोरिंग तयार केली. आता झाडांना मुबलक मिळणारे पाणी बघून त्यांचे मन आनंदून जाते. या माणसाचा मुक्‍काम नोकरीचे कर्तव्य बजावल्यानंतर पूर्ण वेळ बगीच्यातच असतो. ते शोधूनही स्वगृही सापडणार नाही. त्यांचा सर्वाधिक काळ बागेतील झाडांशी संवाद साधण्यात जातो. सर्वानंद नावाप्रमाणेच सर्वांना आनंद देणारे, वृक्षाचा वसा घेतलेले माणसांच्या बागेतील महावृक्ष आहेत. येणाऱ्या पिढीसाठी आबालवृद्धांसाठी त्यांच्या कामाचा सुगंध कायम असणार आहे. खरं तर गावाचे शहर झालेल्या अनेक भागात, बालकांचा वृक्षसंवाद, खेळ घराच्या चार भिंतीत लुप्त झाले आहे. पण, अशी मोहक; मानवी ओलाव्याने तयार झालेली उद्याने बालकांचे भावविश्‍व समृद्ध करीत आहे. या कामात त्यांना शारीरिक कष्टापेक्षा मानसिक पातळीवर खूप खस्ता खाव्या लागल्या. तरी ते डगमगले नाही. येणाऱ्या पिढीसाठी आपण वैभव उभे करीत आहोत, याचा आनंद त्यांच्यात ऊर्जा निर्माण करीत होता. सर्वानंदसारखी माणसे काळाच्या पुढे आहेत. त्यांना वर्तमानाचा हात भविष्याच्या हातात ठेवायचा आहे.
जाणुनिया वर्म, आतल्या गाभ्याचे
सांधुयात खोचे, एकजीव.
काळ येतो जातो, बदलते जग
अंतरीची धग, शेष राही.
चालवुया हात, गिरवुया धडे
काळाच्याही पुढे, वेध घेऊ.
काळाच्या पुढे विचार करणाऱ्या माणसांना समकालाची व्यवस्था कवेत घेत नाही. काळाचा पट पुढे सरकला की; कौतुक, स्मरणतिथ्या साजऱ्या करणाऱ्या परंपरा अस्तित्वात आहेत. जी माणसं काळाच्या पुढे विचार करतात, त्यांच्यात डोंगराएवढं बळ असते. वादळाची पावलं कितीही आक्रमकतेनं पुढे आली तरी त्यांना थोपवून धरण्याचे सामर्थ्य डोंगराच्या भुजात असते. तसेच समाजाच्या कल्याणाचा विचार करणारी माणसं डोंगराच्या उंचीची असतात. त्यांच्यात सामाजिक समस्यांना थोपवून धरण्याचे बळ असतेच, सोबतच त्यावरील उपायही असतात. सर्वांनाच विश्‍वात्मक प्रार्थनेसाठी ज्ञानेश्‍वर होता येत नाही. मात्र, सुरात सूर मिळविण्यासाठी पसायदानाचा धागा निश्‍चितच होता येतो. असंख्य अशी माणसे काळाच्या पडद्याआड गेली. मात्र, विचारांनी ती आजही जिवंत आहेत. सत्य आणि न्याय कृतीतून, समाजाचे चांगभलं चिंतणाऱ्या माणसांच्या आम्ही पाठीशी उभे राहू. किंबहुना त्याच्या हाताचा सुगंध आपल्याही हाताला लावू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com