पैसा झाला खोटा!

सोमनाथ देविदास देशमाने
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

आपण आयुष्यभर खऱ्या-खोट्या पैशाच्या मागे धावत असतो. पैसा त्या मुलाकडे होता. तसा खोटा असला तरी तो इतरांना आनंद देण्यासाठी वापरला की मोठा होतो आणि खरा पैसा फक्त स्वतःसाठीच वापरला की तो खोटा होतो व वापरणाराही छोटा होतो. 

आपण आयुष्यभर खऱ्या-खोट्या पैशाच्या मागे धावत असतो. पैसा त्या मुलाकडे होता. तसा खोटा असला तरी तो इतरांना आनंद देण्यासाठी वापरला की मोठा होतो आणि खरा पैसा फक्त स्वतःसाठीच वापरला की तो खोटा होतो व वापरणाराही छोटा होतो. 

"बाबा, तुझ्याकडे पैसे आहेत का?'' खेळण्यांच्या दुकानासमोर उभे राहून माझा पाच वर्षांचा नातू मला विचारत होता. त्याला 'बबल मशिन' खरेदी करायचे होते. त्याला बबल मशिन घेऊन दिले आणि मी भूतकाळात हरवून गेलो. आम्ही त्याच्याएवढे होतो, तेव्हा पैसा सहसा बघायला मिळत नसे. आम्हाला त्याची गरजही पडत नसे. बांधावरच्या मुगली एरंडाचे पान तोडले की त्याच्या देठातून दूध टपकायचे. आंब्याच्या कोयीत आम्ही ते जमा करायचो. कडूलिंबाच्या काडीला मराठी एकचा आकार द्यायचो आणि असंख्य बबल्स आकाशात सोडायचो! शरीराची, मनाची सकारात्मक मशागत करणारे खेळ आट्यापाट्या, विटीदांडू, सुरपारंबा, भोवरा, गोट्या... एक छदामही खर्च न करता आम्ही आनंदाचा खजिना लुटायचो. 

आमच्या खेडेगावात एक गोमवर्गीय प्राणी असायचा. अडीच-तीन इंच लांब आणि शिसपेन्सिलीच्या आकाराचा! त्याला स्पर्श केला की गोल वेटोळे घालून बसायचा. ढबू पैशाच्या आकारात! आम्ही त्यालाच "पैसा पैसा' म्हणायचो! अत्यंत गुळगुळीत, बुळबुळीत! तळहातावर घेतला की निसटून जायचा. खरा पैसा कसा असेल याची ती झलक होती. पैसा खोटा असला, तरी आनंद मात्र खरा होता. अवती भवतीचे सुंदर जग खरे होते. 

काही दिवसांपूर्वी एक सुंदर कथा वाचण्यात आली होती. सहा वर्षाचा एक मुलगा त्याच्या चार वर्षाच्या धाकट्या बहिणीसोबत बाजारपेठेतून रमतगमत जात होता. त्याची बहीण पाठीमागे रेंगाळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो परत फिरला. त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी होती. भाऊ म्हणाला, 'तुला काय हवे आहे, ताई?' बहिणीने दुकानातल्या बाहुलीकडे बोट दाखवले. भाऊ तिला घेऊन दुकानदाराकडे गेला. म्हणाला, ""काका, माझ्या बहिणीला ती बाहुली आवडली आहे. काय किंमत आहे त्या बाहुलीची?'' अनेक उन्हाळे-पावसाळे पचवलेला दुकानदार बऱ्याच वेळापासून त्या दोघांकडे कौतुकाने पाहात होता. म्हणाला, ""बाळ, तू किती पैसे देऊ शकतोस?'' मुलाने समुद्र किनाऱ्यावरून गोळा करून आणलेले सर्व शिंपले खिशातून काढून दुकानदाराला दिले. दुकानदार खरोखरची नाणी मोजावीत त्याप्रमाणे शिंपले मोजू लागला. त्याने एकवार त्या बहीण-भावाकडे बघितले. मुलगा काळजीच्या स्वरात म्हणाला, ""काका, पैसे कमी पडतात का हो?'' दुकानदार म्हणाला, ""अरे नाही, तसे काही नाही. उलट बाहुलीच्या किमतीपेक्षा तू जास्तच दिले आहेस. हे घे जादाचे परत.'' दुकानदाराने चार शिंपले ठेवून घेतले आणि बाहुली मुलीच्या हातात दिली. दुकानदाराला अभिवादन करून बहीणभाऊ दुकानातून बाहेर पडले. 

आपल्या मालकाच्या व्यवहाराकडे आश्‍चर्याने पहात उभा असलेला नोकर म्हणाला, ""मालक, महागडी बाहुली तुम्ही त्या पोराला अशीच देऊन टाकलीत? चार शिंपल्याच्या मोबदल्यात!'' दुकानदार हसत हसत म्हणाला, ""अरे, आपल्यासाठी त्या चार शिंपल्यांचे मोल काहीच नाही. परंतु, त्या मुलासाठी ते अनमोल आहे. आज त्याला खऱ्या पैशाची ओळख नाही. तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला त्याचे महत्त्व कळेल. आपण शिंपले- खोटे पैसे देऊन बाहुली विकत घेतल्याची आठवण त्याला ज्या ज्या वेळी होईल, त्या त्या वेळी तो माझी आठवण काढील. जगाच्या चांगुलपणावर त्याचा दृढविश्वास बसेल. सकारात्मक विचार करायची सवय लागेल... त्या निरागस लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे मोल होऊ शकत नाही.'' 

'बाबा, बघ, बबल्स बघ! हाऊ नाईस ना!' नातवाच्या हाकेसरशी मी वर्तमानात परतलो. आपण आयुष्यभर खऱ्या-खोट्या पैशाच्या मागे धावत असतो. आज आजोबाही नातवासंगे बबल्सच्यामागे धाऊ लागले. पैसा त्या मुलाकडे होता तसा खोटा असला तरी तो इतरांना आनंद देण्यासाठी वापरला की मोठा होतो आणि खरा पैसा फक्त स्वतःसाठीच वापरला की तो खोटा होतो व वापरणाराही छोटा होतो. पैसेवाल्यालाही कशी एक लिटर दुधाची पिशवी उधार मागावी लागते, हे नुकतेच आपण अनुभवलेय ना! महत्त्व पैशाला नसतेच, त्या मागच्या मूल्याला असते. हे मूल्य जीवनात जपणे महत्त्वाचे असते. पैशाचा माज नको, मोल करता आले पाहिजे. नुकताच एक एसएमएस वाचला, यंदा आधी मोठा पाऊस आला आणि नंतर पैसा खोटा ठरला. काहीही असो. "पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा' म्हणत जगण्याची मजा काही औरच असते!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: somnath deshmane's muktapeeth article