अमृतसरची रिक्षावाली  (मुक्‍तपीठ)

sonali-kale
sonali-kale

मी आणि मुक्ता दोन दिवस अमृतसरला गेलो होतो. दोन दिवसांच्या अमृतसर भेटीत काही गोष्टी ज्या माझ्या कायमच्या लक्षात राहतील त्या म्हणजे येथील रस्ते, वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्षा आणि रिक्षा चालविण्याची पद्धत. येथे तीन प्रकारच्या रिक्षा बघायला मिळाल्या, एक आपली नेहमीची इंजिनवर चालणारी रिक्षा, दुसरी बॅटरीवरची रिक्षा आणि सायकल रिक्षा. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे येथील एकाही रिक्षाला मीटर नव्हते. त्यामुळे एक तर रिक्षावाले जे काही भाडे सांगतील ते मान्य करायचे किंवा दुसरा पर्याय म्हणजे तेथील रहिवाशाला विचारून आपल्याला जायचे तिथे जाण्यासाठी रिक्षाला किती पैसे द्यावे लागतील, याचा अंदाज घ्यायचा. 

एका संध्याकाळी आम्हाला बाजारातून सुवर्ण मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा हवी होती. इंजिन रिक्षावाल्याला विचारले, तर तो दोनशे रुपये म्हणाला. वास्तविक त्या बाजारापासून सुवर्ण मंदिर फार लांब नव्हते; मग आम्ही सायकल रिक्षावाल्याला विचारले तर तो तीस रुपये म्हणाला. आम्ही दोन दोन वेळा विचारून नक्की करून घेतली. कारण इंजिन रिक्षापेक्षा सायकल रिक्षा चालवायला नक्कीच कष्ट जास्त आहेत. ते पण दोन जणांचे ओझे घेऊन त्या गल्ल्यांमधून, खडबडीत रस्त्यांवरून तो आम्हाला घेऊन जाणार म्हणजे तो पैसेपण जास्त मागेल असे वाटले होते. 

एकदा रात्री एका ढाब्यामधून जेवून बाहेर पडलो आणि आता हॉटेलवर परत जाण्यासाठी रिक्षा बघत होतो. आम्ही जेवून बाहेर पडलो तेव्हा पावणेअकरा वाजले होते. मनामध्ये थोडीशी धाकधूक होती. पंजाबमधील एकदम अनोळखी शहर. रिक्षावाला कसा मिळेल काय माहीत, असे काही प्रश्न मनात डोकावून गेले. इतक्‍यात एक बावीस तेवीस वर्षांची मुलगी आमच्या जवळ येत म्हणाली, ‘‘ताई रिक्षा चाहिये क्‍या, मेरी रिक्षा से चलो ना.’’ आम्ही काही क्षण विचार केला, तिच्याकडे बघून असे वाटत नव्हते की ही रिक्षा चालवत असेल. एकदम बारीक, जुने पुराणे कपडे घातलेली, थंडीने कुडकुडणारी; पण ती म्हणाली, ‘‘ताई, चला ना माझ्या रिक्षामधून, मी तुम्हाला नीट तुमच्या हॉटेलवर सोडेन.’’ आम्ही तिच्या रिक्षामध्ये बसलो. तेवढ्या त्या पंधरा मिनिटांच्या प्रवासात तिने आम्हाला तिची हकिकत सांगितली. 

अमृतसरमध्ये ती रिक्षा चालवणारी एकमेव मुलगी आहे. सोनिया एकदम बिनधास्त आणि प्रामाणिक मुलगी. आपण मोठ्या शहरांमध्ये टॅक्‍सी चालवणाऱ्या बायका बघतो, पुण्यात एक-दोघी रिक्षा चालवतात हे ऐकून होतो; पण रिक्षा चालवणारी मुलगी आम्ही प्रथमच बघतली. पहिल्या दिवशी तिने आम्हाला आमच्या हॉटेलवर सोडले. दुसऱ्या दिवशीसुद्धा कर्मधर्म संयोगाने ती आम्हाला भेटली; पण या वेळी तिच्या रिक्षामध्ये आम्ही आणि अजून एक कुटुंब होते. 

‘‘दीदी, मेरे मॉं बाप नही है. तो मेरी दादीने मेरी जल्दी शादी कर दी. मेरा पती कुछ भी नही करता, दारू पीता है और मुझे मारता है. मै मेरे बच्चे के लिए रिक्षा चलाती है.’’आमच्याबरोबरच्या कुटुंबातील बाईने तिला विचारले, ‘‘एवढ्या रात्रीची रिक्षा चालवायला तुला भीती वाटत नाही का गं?’’ ती म्हणाली, ‘‘दीदी यहॉं पर सभी 

मुझसे डरते है. किसीकी हिम्मत नही है, मुझे कुछ भी करने की. मै तो रात के साडेग्यारह-बारह बजे भी पॅसेंजर लेके जाती है. आप फिकर मत करो, मै ठीक से पहुँचाएगी आपको.’’

लोक कितपत तिला घाबरतात ते माहीत नाही; पण इतर रिक्षावाले तिला मदत करत होते. ते दुसरे कुटुंब आमच्याबरोबर होते, त्यांच्या हॉटेलचा पत्ता तिला नीट माहीत नव्हता, तिने एका रिक्षावाल्याला बोलावून पत्ता नीट विचारून घेतला. तिचे त्या ठराविक पद्धतीत त्या रिक्षावाल्यांशी बोलणेदेखील तिच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देत होते. स्वतःच्या लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी तिला हे काम करावे लागत. वीस-बावीस वर्षांची मुलगीपण जबाबदारीने तिला केवढे मोठे बनवले. रात्री अपरात्री रिक्षा 

चालवणे काही सोपे काम नव्हे. एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, सोनियाला भेटल्यावर याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी संस्कृती आणि परंपरा आहे. ती आपल्या देशाला समृद्ध करते. या राज्यांमधून जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा त्या प्रवासात येणारे अनुभव आपल्याला बरेच काही देऊन जातात; पण देशाच्याच काय, जगाच्या कोणत्याही भागात गेले तरी एक गोष्ट मात्र सारखीच आढळते आणि ती म्हणजे एका आईचे आपल्या मुलांवर असलेले जीवापाड प्रेम आणि त्यासाठी काहीही करायची वृत्ती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com