स्पेनमधील बससेवा

समीर जोशी
सोमवार, 8 मे 2017

स्पेनमध्ये पहिल्यांदा गेलो. पुण्याच्या सवयी पटकन जात नव्हत्या. बसमध्ये रांग मोडून घुसण्याची, दरवाज्यात लटकून प्रवास करण्याची, मागच्या-पुढच्या कोणत्याही दाराने आत घुसण्याची सवय येथे येऊन पार मोडली.

स्पेनमध्ये पहिल्यांदा गेलो. पुण्याच्या सवयी पटकन जात नव्हत्या. बसमध्ये रांग मोडून घुसण्याची, दरवाज्यात लटकून प्रवास करण्याची, मागच्या-पुढच्या कोणत्याही दाराने आत घुसण्याची सवय येथे येऊन पार मोडली.

गेली दोन वर्षे मी स्पेनमध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्रीत पीएच.डी. करत आहे. माझ्या मनात सतत पुणे व स्पेन यांची तुलना होत राहते. येथील आजूबाजूचा परिसर पाहिला, सर्व व्यवस्था पाहिली आणि माझे मन थक्क झाले. येथील प्रत्येक वाहन पादचाऱ्यांना रस्ता सहजरीत्या ओलांडता यावा, याकरता कटाक्षाने थांबते. बसची सेवा अतिशय उत्तम आहे. बसथांब्यांवर कोणत्या क्रमांकाची बस किती वाजता येणार आहे, याची सर्व माहिती इलेक्‍ट्रॉनिक्‍स बोर्डावर वीस मिनिटे अगोदर दर्शविली जाते. बसगाड्या नेहमी वेळेवरच येतात आणि वेळेवरच सुटतात. येथे जोडबसची व्यवस्था आहे. एका बसमध्ये चाळीस व दुसऱ्या बसमध्येही तेवढेच प्रवासी एकाच वेळी बसून आरामात प्रवास करू शकतात. पुण्यात धावत-पळत बस पकडावी लागते, त्या सवयीने पहिल्या दिवशी मी बसथांब्यावर पळत सुटलो. तेव्हा एका प्रवाशाने स्मित करून रांगेतूनच यायची खूण केली.

येथे फक्त बसचालक असतो. बसमध्ये वाहक नव्हता. येथील बसमधून प्रवास करताना आपल्याकडील एटीएम कार्डप्रमाणे एक कार्ड असते. पुढील दारापाशी असलेल्या मशिनमध्ये कार्ड पंच करून बसमध्ये आत प्रवेश करावा लागतो व उतरतानाही ते कार्ड पंच करावयाचे असते. जेवढा किलोमीटर प्रवास झाला तेवढी रक्कम आपल्या कार्डवरून कमी होते. हे कार्ड रिचार्ज केले जाते. या कार्डवर किती रक्कम होती व किती रक्कम खर्च झाली, याची नोंद कार्ड पंच झाल्यावर आपणास मिळते. ज्याच्याकडे पंचिंग कार्ड आहे, त्या प्रवाशाला तेथील प्रवास निम्म्या दरात करता येतो. एखाद्या प्रवाशाकडे पंचिंग कार्ड नसेल, तर तो प्रवासी चालकाकडे पैसे देऊन तिकीट घेऊन प्रवास करू शकतो. फक्त त्याला निम्म्या दराची सवलत मिळत नाही. मी पहिल्यांदा बसने प्रवास करताना चालकाला विनंती केली की, मला डोनोस्टिया हॉस्पिटल या ठिकाणी जायचे आहे आणि मी नियोजित स्थळाची वाट पाहत बसलो; पण चुकून पुढच्या थांब्यावर गेलो. नंतर माझ्या लक्षात आले, की बसच्या उजव्या बाजूला थांब्याचे बटण असते. तेथील बटण दाबल्यानंतरच बस थांबते. प्रत्येक बाकाच्या समोर "स्टॉप' नावाचे बटण असते. हे बटण दाबायचे म्हणजे इच्छित स्थळापाशी गाडी थांबते.

सर्व बस प्रवाशांची विशेषतः अंध, अपंग, तसेच कडेवर मूल असलेल्या प्रवाशांची व ज्येष्ठांची योग्य ती काळजी घेतली जाते. स्पेनमध्ये बस प्रवाशांना बसमध्ये चढण्या-उतरण्याकरिता कधीच भांडणे होत नाहीत. तेथे रांगेतूनच बस प्रवासी बसमध्ये चढतात व उतरतात. सर्वांना आरामात गाडी मिळते व त्यांचा प्रवासही आरामात होतो. दांडीला लटकून, दरवाज्यात लोंबकळत प्रवास करावा लागतो आहे, असे कधी येथे घडत नाही.
स्पेनमध्ये दोन प्रकारच्या बसगाड्या असतात. काही बसगाड्यांना ए1, ए2, ए3 असे क्रमांक असतात, तर काही बसगाड्यांना केवळ 1, 2, 3, 4 असे क्रमांक असतात. पहिल्या प्रकारच्या गाड्यांमधून प्रवास करताना गाडीत चढताना व उतरताना असे दोन वेळा कार्ड पंच करावे लागते. त्यात बसचा किती किलोमीटर प्रवास झाला व किती भाडे लागले, याची नोंद केली जाते.

याउलट केवळ क्रमांक असलेल्या बसगाड्यांमध्ये फक्त बसमध्ये चढताना पंचिंग करायचे असते. स्पेन येथील बसचा प्रवास करताना एकदा काढलेले तिकीट हे पाऊण तास चालू शकते. पाऊण तासाच्या प्रवासात दोनदा-तीनदा प्रवास केला, तर तुम्हाला जादा युरो द्यावे लागत नाहीत.

मी एकदा बसमध्ये बसलो. पंधरा मिनिटांनी इच्छित स्टॉपवर गेलो. तेथून पुन्हा दुसरी बस केली, त्या वेळी मी पुन्हा कार्ड पंच करण्यास गेलो असता कार्ड पंच झाले; पण शिल्लक आहे तेवढीच राहिली. माझे नंतरच्या प्रवासाचे युरो घेतले गेले नाहीत. तेव्हा मला समजले, की पाऊण तासापर्यंतचा प्रवास हा एकाच तिकिटावर करता येतो.
माझे एकदा कार्ड हरवले होते, त्यामुळे मी गांगरून गेलो. मला वाटले, की आता ते परत मिळणार नाही; परंतु मला आठ दिवसांनी तेथील स्थानिक पोलिसांनी दूरध्वनी करून माझे कार्ड घेऊन जाण्यास सांगितले. मी कोणतीही तक्रार न करताही माझे कार्ड परत कसे मिळाले, याची उत्सुकता होती. पोलिस म्हणाले, तुमचे कार्ड रस्त्यावरच्या एका माणसास सापडले, ते त्यांने ड्रायव्हरकडे दिले. संबंधित ड्रायव्हरने पोलिसांकडे ते आणून दिले. त्यावरील मोबाईल नंबर पाहून पोलिसांनी मला फोन केला. एखादी वस्तू ज्याची आहे, त्याच्यापर्यंत ती पोचवण्यासाठी स्पेनचे नागरिक व पोलिस तत्पर असतात. मी त्यांना माझे ओळखपत्र दाखवून त्यांच्याकडून बसचे कार्ड परत घेतले. त्या कार्डवर आपले छायाचित्र असते. त्यामुळे एकाच्या कार्डचा वापर दुसरा कोणीही करू शकत नाही. हरवलेले कार्ड परत मिळाल्याचा आनंद खूप होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spain bus service writes about samir joshi