कथा श्रीकृष्णजन्माच्या सोहळ्याची

डॉ. अनुपमा साठे
Tuesday, 11 August 2020

कृष्णजन्माच्या घटकेचं अतिशय विलोभनीय विवरण भागवत पुराणात दिलेलं आहे. आपला एखादा आवडता पाहुणा येणार असला तर जसे आपण संपूर्ण घर सुंदर प्रकारे सजवून तयार करतो तसेच श्रीकृष्णावताराच्या घटकेवर सर्व समष्टीच्या शुद्धीचे वर्णन आहे.

द्वापर युगातली गोष्ट आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या माहितीतली. प्राचीन असली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी. पृथ्वीतलावर दैत्यांनी मानवाचा जन्म घेऊन आकांत माजवला होता. गाईचे रूप धारण करून पृथ्वी ब्रह्मदेवांकडे आपलं दु:ख सांगायला गेली. ब्रह्मदेवांनी तिचे गाऱ्हाणे ऐकून घेतले व सर्व देवादिकांना घेऊन विष्णू भगवानांना शरण गेले. भगवंताने सर्वांना आश्वस्त केले व पृथ्वीतलावर जन्म घेऊन दुष्टांचा संहार करण्याचे वचन दिले. सर्व देवादिकांना आपल्या अंश रूपाने जन्म घेण्यास त्यांनी आदेश केला. ब्रह्मदेव मग पृथ्वीची समजूत घालून आपल्या धामास परतले.

यथावकाश विष्णू भगवानांनी पृथ्वीवर यदुवंशात वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेतला तर देवीदेवतांनी आपल्या अंशाने गोपगोपिकांच्या रूपाने जन्म घेतला. कृष्णाच्या जन्माची कथा अतिशय लोकप्रिय आहे. ही कथा ज्ञात नसलेला कुणीतरी विरळाच असेल.

कृष्णजन्माच्या घटकेचं अतिशय विलोभनीय विवरण भागवत पुराणात दिलेलं आहे. आपला एखादा आवडता पाहुणा येणार असला तर जसे आपण संपूर्ण घर सुंदर प्रकारे सजवून तयार करतो तसेच श्रीकृष्णावताराच्या घटकेवर सर्व समष्टीच्या शुद्धीचे वर्णन आहे.

अथ सर्वगुणोपेत: काल: परमशोभन:।
यह्येर्बाजनजन्मर्क्ष शान्तर्क्षग्रहतारकम् ॥
शुकदेव परीक्षिताला सांगतात, परीक्षित, सर्व शुभ गुणांनी सुशोभित वेळ आली. रोहिणी नक्षत्र आहे. आकाशात सर्व नक्षत्र व ग्रहतारे शान्त व सौम्य आहेत. सर्व दिशा स्वच्छ व प्रसन्न आहेत. आकाश निर्मळ आहे. पृथ्वीवर सर्व गावं व वस्त्या मंगलमय स्वरूपात आहेत. सर्व नद्या निर्मळ स्वच्छ जलाने युक्त आहेत व रात्रीच्या वेळेस सुद्धा तळ्यांत कमळाची फुलं उमलली आहेत.

अरण्यात सर्व वृक्ष सुंदर फळं व फुलांनी बहरलेले आहेत. पक्षी मधुर गान करताहेत. शीतल मंद व सुगंधी वायूचा सर्वत्र संचार आहे. ब्राह्मणांचा अग्निहोत्रातला अग्नी स्वयं प्रज्वलित झाला. संतांचे हृदय सहज प्रसन्न झाले. स्वर्गात देवतांचे वाद्य सुमधुर सूर छेडू लागले. सिद्ध व चारण देवाच्या स्तुतीपर गीत गाऊ लागले व अप्सरा प्रसन्न नृत्यात मग्न झाल्या. देवगण व ऋषिमुनी आनंदाने पुष्पवृष्टी करू लागले. जलसंपन्न मेघ मंद गर्जना करू लागले. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणाऱ्या जनार्दनाची जन्मवेळ ‘निशीथ’ अर्थात मध्यरात्रीची आहे. सर्वत्र अंधकाराचे साम्राज्य आहे. सर्वांच्या हृदयात घर करणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या उदरातून प्रकटले. जणू पूर्व दिशेत सोळा कलांनी युक्त चंद्रमाचा उदय झाला. संपूर्ण कारागृह दिव्य तेजाने उजळून गेले.

वर्षाऋतूमधील आभाळासम मेघवर्ण, त्यावर मनोहर पीतांबर, गळ्यात कौस्तुभमणी, कमळाप्रमाणे कोमल व विशाल नेत्र, चार सुंदर हातांमधले शंख चक्र गदा व पद्म; वक्षस्थळावर श्रीवत्साचे सुरेख चिन्ह, सुंदर दागिन्यांनी नटलेली बालमूर्ती बघून वसुदेव व देवकीचे नेत्र धन्य झाले. दोघेही दोन्ही कर जोडून प्रभूच्या स्तुतीत लीन झाले. विष्णू भगवान यांनी प्रसन्न मुद्रेत त्यांना पूर्वजन्मीची आठवण करून दिली व दिलेल्या वचनाप्रमाणे ते तिसऱ्यांदा त्यांच्या पोटी जन्माला आल्याचे सांगितले. त्यांच्या समोरच मग त्यांनी रूप बदललं व एका साधारण बालकाप्रमाणे दिसू लागले. कृष्णजन्माचे हे मनोहारी वर्णन आबालवृद्ध सर्वांनाच प्रिय आहे.

कृष्णजन्माच्या सोहळ्यात संपूर्ण सृष्टी एकाग्रतेने भगवंताच्या आगमनास साधना करताना दिसून येते. यामध्ये काल, दिशा, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन एवं आत्मन्, या नऊ द्रव्यांचा विशेष नामोल्लेख आहे. कृष्णावतारात या सर्वांचा उद्धार भगवंताच्या हातून होणार, हे त्यांना ज्ञात होतं. काल अर्थात वेळ, सर्व शुभ गुणांनी युक्त होऊन काल विशेष आनंदाने प्रतीक्षा करू लागला कारण त्याच्या आत कृष्ण अवतीर्ण होणार होते. अष्टमी ही तिथी पक्षाच्या मध्यावर, संधीस्थलावर येते. कृष्णपक्षाचे तर नावच श्रीकृष्णाशी निगडीत आहे. मध्यरात्रीची वेळ योगीजनांना प्रिय असते.

निशानाथ चंद्राचा वंशात जन्म घ्यायचा तर निशेचा मध्यभागातच जन्म घेणे उचित. म्हणूच चंद्रमाची प्रिय पत्नी रोहिणी या नक्षत्रात भगवंत जन्म घेतात. प्राचीन शास्त्रांमध्ये दिशांना देवी म्हटलं आहे व त्यांचे प्रत्येकी देवता आहेत.

या सर्व देवतांना कंसाच्या कैदेतून सुटका मिळेल या आशेने सर्व दिशा आनंदित आहेत. पृथ्वी ही भूदेवी, भगवंताची पत्नी आहे. वैकुंठातल्या श्रीदेवीस सोडून काही काळ प्रभू भूदेवी जवळ राहतील,
या आनंदाने त्यांचा स्वागतास तिने मंगल चिन्ह धारण केले. ‘जल’ याला विशेष आनंद झाला कारण जन्मताच श्रीकृष्णाच्या पायांचा स्पर्श यमुनाजलाला होणार होता. ग्वालबाल व गोपिकांसमवेत श्रीकृष्ण सहवासाचा आनंद तिला देणार होते. कालिया दमन करून कालिया-डोहाला मुक्ती प्रदान करणार होते.

आपल्या या अवतारात कृष्णाने व्योमासूर, तृणावर्त व कालियाचे दमन करून अनुक्रमे आकाश, वायू व जलाची शुद्धी केली. दोनवेळा अग्नीपान करून अग्नीला तृप्त केलं व त्याची शुद्धी केली. योगीपुरुषाचे मन निरोधी असते, मुमुक्षूचे निर्विषय. जिज्ञासू आपल्या मनाला मुक्त संचार करू देतात. परंतु, या सर्वांनाच कृष्णावतारात भगवंताने उपदेश केले आहेत. मनाचाही उद्धार करणारा हा अवतार मनास निर्मळता व प्रसन्नता देणारा आहे.

ज्याप्रमाणे संपूर्ण सृष्टी शुद्ध, साधक होऊन कृष्णावताराचे स्वागत करते त्याचप्रमाणे साधकाचे अंतःकरण शुद्ध झाल्यास त्यात परब्रह्माचे आगमन होते. ‘कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा’, काया, वाचा, मन, इन्द्रिय, बुद्धी, भाव व प्रकृत स्वभाव, हे सर्व शुद्ध ठेवून सर्व कर्म परमार्थास अर्पण केले तर तो कृष्ण आपल्या आत पण अवतीर्ण होईल. ज्याप्रमाणे संपूर्ण अवतारात त्याने जनाचा उद्धार केला त्याप्रमाणे तो आपल्या मनाचाही उद्धार करेल. गीतेत तो अर्जुनाला हाच उपदेश करतो

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्त: संगवर्जित: ।
निर्वैर: सर्वभूतेषु य: स मामेति पाण्डव ॥(११.५५)
हे पांडव, जो आपले सगळे कर्म मला अर्पण करतो, माझी भक्ती करतो व माझ्यात परायण होतो, जगाप्रति आसक्ती सोडून कुणाशीही वैर धरत नाही, तो मला सहज प्राप्त होतो. कृष्णाने सांगितलेले हे सर्व लक्षण चित्तशुद्धीचेच आहेत. तर मग आज श्रीकृष्ण जन्माष्टमीला कृष्णाचे स्वागत केवळ सृष्टीतच नाही तर आपल्या मनात सुद्धा करूया !

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of krishna-Janma