चहा हवा असा की 'ब्रह्मनंदी टाळी' लागावी!

उमेश वानखडे, लिटल रॉक, अमेरिका
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कधी कधी जीवनाची अशी घडी बसते ना की जरा काही कुठे सुरकुती दिसली कि एकदम कपाळावर आठ्या पडतात. माझा दिवस मग तो सोमवार ते शुक्रवार असो किंवा वीकएंड असो, सकाळी चहाशिवाय सुरु होत नाही. ऑफिसच्या कामानिमित्ताने कधी एखादे वेळी बाहेर गावी हॉटेलमध्ये राहायची वेळ येते, तेव्हाची ती कडवट कॉफी म्हणजे घरापासून दूर असल्याची शिक्षा असल्यासारखी वाटते. माझ्यासाठी सकाळचा चहा म्हणजे अमृतापेक्षा कमी नाही. मरगळलेल्या शरीरात नवीन जीव ओतणारा, दिवसभरात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची शक्ती देणारा असा तो चहा म्हणजे अमृतमय संजीवनी समान असतो. चहाच्या सवयीला व्यसन म्हणता येणार नाही. फारच फार रसिक म्हणू शकतो.

कधी कधी जीवनाची अशी घडी बसते ना की जरा काही कुठे सुरकुती दिसली कि एकदम कपाळावर आठ्या पडतात. माझा दिवस मग तो सोमवार ते शुक्रवार असो किंवा वीकएंड असो, सकाळी चहाशिवाय सुरु होत नाही. ऑफिसच्या कामानिमित्ताने कधी एखादे वेळी बाहेर गावी हॉटेलमध्ये राहायची वेळ येते, तेव्हाची ती कडवट कॉफी म्हणजे घरापासून दूर असल्याची शिक्षा असल्यासारखी वाटते. माझ्यासाठी सकाळचा चहा म्हणजे अमृतापेक्षा कमी नाही. मरगळलेल्या शरीरात नवीन जीव ओतणारा, दिवसभरात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची शक्ती देणारा असा तो चहा म्हणजे अमृतमय संजीवनी समान असतो. चहाच्या सवयीला व्यसन म्हणता येणार नाही. फारच फार रसिक म्हणू शकतो. म्हणजे कसे तंबाखू-बिडीला व्यसन म्हणतात. लावणीच्या सवयीला नाद म्हणतात. पण शास्त्रीय संगीताची आवड असेल तर त्याला रसिक म्हणतात. चहा आणि शास्त्रीय संगीताचे कौतुक करायला रसिकताच असावी लागते.

चहा बनवणे हे ही एक शास्त्रच. लहानपणी म्हणजे मी 10-12 वर्षाचा होतो, तेव्हा आमच्याकडचा चहा म्हणजे एका कपास 3-4 चमचे साखरेचा असायचा. जेवढा गोड चहा तेवढा चांगला. आमच्याकडच्या बासुंदी आणि चहामध्ये रंगाचा तेवढा फरक असायचा. बासुंदी म्हणजे राधेसारखी गौरवर्णीय तर चहा कृष्णाच्या रंगाचा शामवर्णात मोडणारा. गावाला आजी-आजोबांकडे तर नावाला चहा पत्त्ती आणि साखरेचे प्रमाण आणखी जास्त. चहाची खरी सवय आणि उत्तम प्रतीचा चहा कसा असतो हे मला नागपूरला शिकायला गेल्यावरच कळले. अमरावतीवरून येणाऱ्या बसेसचा रवीनगरला एक स्टॉप आहे. तिथे एक चहावाला त्यावेळी (1998 मध्ये) दोन रुपये कप चहा विकायचा. जेव्हा पहिला कप प्यायलो, तेव्हा चहाच्या सगळ्या व्याख्याच बदलल्या. साखर नुसतीच चवीला आणि धो-धो चहापत्ती आणि जवळ जवळ अर्धा-पाऊण तास त्या भक-भक करणाऱ्या स्टोव्ह वर उकळलेला तो चहा नुसता जिभेला लागला तरी झणकन वीज शरीरातून गेल्यासारखी वाटायची. अस्सल "पिणारा' कसा स्कॉचच्या पहिल्या घोटाला तोंड अगदी वेडेवाकडे करतो, पण क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर "ब्रम्हानंदी टाळी' लागल्याची अनुभूती दिसून येते. अगदी तशीच माझी अवस्था रवीनगरचा चहा पिल्यावर व्हायची.

मुळातच फर्स्ट इयरचे जीवन खूप हलाखीचे. व्हेटरिनरी कॉलेजचे फर्स्ट इयर म्हणजे गुन्हा न करता भोगलेल्या तुरुंगवासासारखे आणि मेसचे जेवण म्हणजे नुकत्याच प्रेमळ माहेरातुन जाचक सासुरवासात पडल्यासारखे. दिवसभर रॅगिंगच्या नावाखाली सिनिअरचा मार खाऊन, मजुरी कामगार वापरतात, त्या हिरोच्या सायकलीवरून रूमवर परतत असताना आम्ही मित्र न चुकता रवीनगरमध्ये त्या चहावाल्याकडे थांबायचो. त्या चहाच्या एका घोटात आम्ही आमचे सगळे दुःख विसरून आणि तरतरीत होऊन घरी जायचो.

जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा मात्र चहाच्या बाबतीत खूप गैरसोय झाली. माझे दोन्हीही रूममेट हे दोनच महिन्यात पूर्णपणे अमेरिकनाईज्ड झालेले. त्यामुळे घरी त्यांनी ती वॉलमार्टमध्ये 20 डॉलरला मिळते. ती ब्रुविंग मशीन वगैरे आणून ठेवलेली. मला ते कडवट पाणी प्यायला खूप कंटाळा यायचा. आणि मला चहा नीट बनवता येत नव्हता. आमच्या खाली दोन इंडियन मुली राहायच्या. त्यांच्याकडे चांगला चहा प्यायला मिळणार म्हणून त्यांच्याशी बोलचाल वाढवली. कसले काय राव, एकदा गेलो चहाला, भलामोठा कपात कसलेसे गौर आणि शामवर्णीय यांच्यामध्ये मोडणारे रंगीत पाणी होते. हा असला चहा उकळण्यात कंजुषी केल्यावर होतो. कदाचित पहिल्या उकळीनंतरच हा चहा कपात ओतला होता. हे म्हणजे राहुल द्रविडला पहिले 50 चेंडू खेळू द्यायचे आणि मग म्हणायचे आता तू रिटायर हर्ट हो. द्रविडच्या बॅटिंगची मजा जशी तो सेट झाल्यावरच येते तसेच चहाचेसुद्धा. त्या कपाचा आकार आमच्या घरच्या चहाच्या भांड्यापेक्षा पण मोठा होता. तेवढा मडकं भर चहा पिल्यावर मला दोन दिवस तहान लागली नाही. अजूनही अशी आमंत्रने येतात. ते चहाचे मोठं-मोठे कप दिसले की उरात धडकी भरते. जेवढा चहाचा कप मोठा, चहा तेवढाच पांचट आणि बेचव. आणखी एक, कापडाच्या छोट्या छोट्या पिशव्या म्हणजे टी-बॅग गरम पाण्यात बुडवून जर एखादा व्यक्ती चहा बनवत असाल तर त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्वच रद्द करायला पाहिजे, इतक्‍या वेदना होतात.

या प्रिय पेयाशी विरह सहन करण्याचे पण दिवस आले. PhD करताना आम्ही चार रूममेट राहायचो, आम्ही जेवायचो सगळेच पण भांडी घासायला कुणीच समोर यायच नाही. इंडियन कम्युनिटीमध्ये आमचे अपार्टमेंट स्वच्छतेच्या नव्हे तर अस्वच्छतेच्या बाबतीत जरा नाव कमावून होते. त्यामुळे एक भांड कमी म्हणून मी बरेच दिवस चहाचीच सावत्र बहीण इन्स्टंट कॉफीला जवळ केले होते. वॉशिंग्टन DC ला होतो. त्याठिकाणी किचनची सोय नव्हती. त्यामुळे तिथे पण कधी ब्रयूड तर कधी इन्स्टंट कॉफीचा सहारा घ्यावा लागला. कधी कधी तर हा विरह इतका असह्य व्हायचा कि मी इंडियन रेस्टारंटमध्ये जाऊन जेवणानंतर कधी कधी चहा ऑर्डर करायचो. तेव्हा तो वेटर साशंकपणे माझ्याकडे बघायचा. कारण इकडे इंडियन लोक इंडियन रेस्टारंटमध्ये जाऊन चहा क्वचितच ऑर्डर करतात. जेवणाआधी चहा ड्रिंक म्हणून मागवण्याचे काम अमेरिकन लोकांचं. त्या दरम्यान "पाणी का काम पाणी ही करता है' हे सांगणारी "जब वई मेट'मधील करीना आठवली आणि स्वतःशीच बोललो चांगल्या चहाला दुसरा पर्याय नाही.

शेवटी 'चांगल्या' चहाच्या दुष्काळामुळे मी स्वतःच महत्प्रयासानंतर चांगला चहा बनवायला शिकलो. चांगला चहा बनवता येणे म्हणजे एक तपस्या असते. लॅबमध्ये बरीच वर्ष झाले काम करतोय त्यामुळे कुठल्याही प्रोटोकॉल चा पहिले SOP (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बनवतो. चहा बनवन्याचा पण एक SOP बनवून घेतलाय. अर्धा कप पाण्याला एक कप दूध. व्होल मिल्कच, उगाच ते 1-2% वाले स्कीम मिल्क नको, एवढेच हेल्थ कॉन्शस आहात तर चहा पिऊच नका. नळाचे स्वच्छ पाणी प्या. एक चमचा चांगल्या प्रतीची चहापत्ती आणि एक चमचा साखर, आलं असेल तर उत्तम. पहिली उकळी आल्यानंतर बरोबर 7-8 मिनिटे चहा अजून उकळू द्यावा. हे उकळणे खूप महत्त्वाचे. चहामध्ये संजीवनी-समान अर्क यायला पहिल्या उकळीनंतर किमान सात मिनिटे तरी लागतातच. या चहाचा पहिला घोट घेता क्षणीच जर तुमची "ब्रम्हानंदी टाळी' नाही लागली तर बोला! आणि हो चहा म्हणजे फक्त चहाच. उगाच त्याच्या सोबतीला फरसाण, बिस्किटासारखी बाहेरून मागवलेली दुय्यम दर्जातले खाद्यपदार्थ ठेवून चहाचा दर्जा घसरवू नका. पाहुण्याना सांगा, चहाला बोलावलय जेवायला नाही.

शेवटी (पु.लं. च्या 'पानवाल्या'ची क्षमा मागून) चहाचे महत्व श्रीकृष्णाला समजावून सांगताना राधापण हेच म्हणत असावी.
कृष्ण चालले वैकुंठाला, राधा विनवी पकडून बाही
इथे चहा पिऊनी घे रे, तिथे कन्हैया चहा नाही

Web Title: a story of tea