मृत्यूशी झुंजणाऱ्या शेतकऱ्याने मानले 'सकाळ'चे आभार

हर्षदा परब
शनिवार, 3 डिसेंबर 2016

शिक्षण घेता घेता शेतीत धडपडणारा एक तरुण होतकरू शेतकरी मुंबईतील केईएम या पालिकेच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असतो...त्याच्या उपचारांसाठी वडील दाही दिशांना धावाधाव करीत असतात...'सकाळ'मधून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो. त्यावर तब्बल तीन महिन्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी औरंगाबादहून मुंबईला येतो...आणि आग्रहाने भेटतो...आणि कृतार्थपणे 'सकाळ'ला मनःपूर्वक धन्यवाद देतो. 

शिक्षण घेता घेता शेतीत धडपडणारा एक तरुण होतकरू शेतकरी मुंबईतील केईएम या पालिकेच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असतो...त्याच्या उपचारांसाठी वडील दाही दिशांना धावाधाव करीत असतात...'सकाळ'मधून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो. त्यावर तब्बल तीन महिन्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी औरंगाबादहून मुंबईला येतो...आणि आग्रहाने भेटतो...आणि कृतार्थपणे 'सकाळ'ला मनःपूर्वक धन्यवाद देतो. 

या सर्व प्रयत्नांमध्ये तुमचा सक्रिय सहभाग असतो तेव्हा त्या बळीराजाच्या आशीर्वादांनी तुम्हाला आभाळ ठेंगणं वाटू लागतं. त्या दिवशी माझ्या आयुष्यात आणखी एका छान दिवसाची नोंद झाली. मी काम करीत असलेल्या सकाळ माध्यम समूहाच्या मुंबईचे सहकारी आणि माझ्या वृत्तपत्राने अनेक वर्षं सामजिक जाणिवा जपत सुरू ठेवलेल्या मदतीचे आवाहन करण्याच्या उपक्रमाचे हे यश. 

'सकाळ'मध्ये मुंबईत 6 ऑगस्टला एक बातमी छापून आली. एका तरुण मुलाला त्याच्या उपचारांसाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन त्यात होतं. तो रुग्ण ऑफिसला येऊन भेटला आणि मला फुलांचा गुच्छ आणि पेढ्यांचा बॉक्‍स दिला. खास औरंगाबादहून मला भेटण्यासाठी त्याचे बाबा, तो स्वत: आणि त्याचे एक नातेवाईक आले. सकाळी सहा वाजता मुंबईत आल्यावर त्यांनी दहाच्या सुमारास सकाळचं परळ ऑफिस गाठलं. तेव्हा मी तिथे नव्हते. ऑफिसमधून फोनवरून बोलणं झालं. त्या मुलाने मला भेटायचंच असल्याचं सांगितलं. मी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भेटेन असं सांगून फोन ठेवला. संध्याकाळी ते सर्वजण ठरल्यानुसार आले. त्यांनी भेटून मला पुष्पगुच्छ आणि पेढ्यांचा बॉक्‍स दिला. 

या सत्कारामागची गोष्ट -

मी त्या मुलाचं नाव लिहिणं टाळतेय, कारण तो मुलगा 20 वर्षांचा तरुण आहे. त्याला समाजात वावरताना त्रास होऊ नये म्हणून पत्रकाराने घ्यायची खबरदारी ही पोस्ट लिहिताना घेतेय.

त्याची पुण्याच्या एका नामांकित रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. काही महिन्यांत त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं. त्यातच त्याला टी.बी. झालेला. रुग्णालयात उपचार सुरू असताना राजीव गांधी जीवनदायी योजनेतून मिळणारी मदतीची रक्कम संपली होती. वडील उपचारांसाठी दारोदार भटकत होते. मदतीसाठी आमच्या ऑफिसमध्ये आले. आम्ही मदत केली. (मदत तपशीलवार सांगणं आणि लिहिणं मुद्दाम टाळत आहे). त्यापूर्वीदेखील रुग्णाच्या खात्यावर आर्थिक मदत मिळू लागल्यावर त्याच्या बाबांनी येऊन माझी भेट घेतली होती. मदत मिळाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्याचे बाबा येऊन भेटले होते. मात्र त्यांच्या मुलाला मला भेटायला येणं शक्‍य नव्हतं. 

त्यावेळी केलेल्या मदतीचं फलित आम्हाला मिळालं ते तीन महिन्यांनी. रुग्ण चालत आनंदी होऊन भेटायला आला. मला या चांगल्या कामात मदत केली माझे सहकारी वैभव गुरव, बाळा वाघमारे आणि रंजना मॅडम, नवले आणि त्यांच्या मित्राने. बाळू आणि रंजना मॅमने माझ्या मागे लागून त्यांनी त्या रुग्णाच्या म्हाताऱ्या वडीलांची आणि माझी भेट करवून दिली. शक्‍य तिथे माझ्या शब्दावर सांगेन ते काम केलं आमच्या दगडू उर्फ वैभवने. एक महत्त्वाचं औषध त्याने धावत पळत जाऊन मिळवलं. खरं तर ज्या दिवशी वैभव औषध आणायला गेला होता त्या दिवशी रुग्णाला सांगितलेलं औषध बाजारात नव्हतं. त्याऐवजी दुसरंच औषध केमिस्टने दिलं. रुग्णाची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानं कुठलंही औषध देणं योग्य नव्हतं. मग मी डॉक्‍टरांशी फोनवरून बोलणं केलं. वैभवने मला पाठविलेला औषधाचा फोटो त्यांना फॉरवर्ड केला. डॉक्‍टरांनी हिरवा कंदील दिल्यावर वैभवने ते औषध आणून आंभारेंच्या हवाली केलं. ते औषध दिल्यानंतर त्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. सुशील अंबेरकर यांनी ती बातमी संपादित करून ठळकपणे प्रसिद्ध केल्याने त्याचा परिणाम साधला गेला. या मुलाला कलकत्ता, गुलबर्गा आणि परदेशातून मदत मिळाली. अकाउंटमध्ये पैसे जमा करणाऱ्या प्रत्येकाचे त्याच्या वडिलांनी फोनवरून आभार मानले. के.ई.एम.चे डॉ. तुकाराम जामले यांचे विशेष आभार मानायला हवेत. त्यांनी या केसमध्ये फोनवरून आवश्‍यक त्या सूचना दिल्या. 

मी या विद्यार्थ्याला मदत केली ती एका वाक्‍यासाठी... 'बाबांचे हाल बघवत नाही. चालता-फिरता आलं असतं तर मी पैसे कमवून उपचार घेतले असते. मी आजारी पडण्यापूर्वी 16 पोती गहू घेतला. जमत नाही म्हणून.. नाहीतर आमच्या आणि दुसऱ्यांच्या शेतात राबलो असतो.' 

हा तरुण जिद्दी शेतकरी असा अंथरुणात संपताना बघायचा नव्हता. इथे आवर्जून सांगावंस वाटतं की उपचारांसाठी आर्थिक मदत आवश्‍यक असलेल्या रुग्णासाठीचं आवाहन सकाळ पेपरमध्ये छापलं जातं. मुंबईत अशा आवाहनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रुग्णाची गरज खरी असेल तरी लोक नक्की मदत करतात. काही जणांनी रुग्णाला भेटून मदत देऊ केली आहे. हेल्थ आणि कम्युनिटी या क्षेत्रातील खूप प्रेरणादायी माणसं भेटली आणि भेटतात. जी मला जगण्याची उमेद देतात. त्या सगळ्यांना खूप खूप 'थॅंक यू'. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: struggling farmer survives, thanks sakal