आंधळे असून डोळस!

सुभाष नातू
बुधवार, 12 एप्रिल 2017

 

जन्मापासूनच त्यांच्या डोळ्यांपुढे काळोख होता. पण त्यांचे कान व स्मरणशक्ती उत्तम होती. त्या जोरावर त्यांनी स्वतःच्या जीवनात प्रकाश आणलाच, पण गावकऱ्यांसाठीही ते उजेड होऊन राहिले.

 

 

जन्मापासूनच त्यांच्या डोळ्यांपुढे काळोख होता. पण त्यांचे कान व स्मरणशक्ती उत्तम होती. त्या जोरावर त्यांनी स्वतःच्या जीवनात प्रकाश आणलाच, पण गावकऱ्यांसाठीही ते उजेड होऊन राहिले.

 

गत आयुष्यात मला अशा काही व्यक्ती भेटल्या, की त्यांनी माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवला. त्यातलेच एक म्हणजे कर्जतजवळच्या जांभिवली गावातील राजाभाऊ. राजाभाऊ जन्मापासून आंधळे होते व माझ्या पत्नीचे ते लांबचे नातेवाईक होते. त्यांची व माझी पहिली ओळख झाली, तेव्हा जांभिवलीत वीजदेखील आलेली नव्हती. राजाभाऊ चारी बाजूंनी अंगण असलेल्या व परसदारी रहाटाची विहीर असलेल्या बैठ्या घरात राहत होते. उन्हाळ्याच्या सुटीत तरुण मुले जांभिवलीत आपल्या आजोळी आली, की त्यांच्याकडून अभ्यासाची पुस्तके वाचून घेऊन ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते.

माझ्या व त्यांच्या पहिल्या भेटीतच त्यांनी मला पत्र लिहायला सांगितलं. झालं होतं काय, की त्यांनी नुकताच कर्जतहून नवीन कंदील आणला होता व त्याची वात नीट वर-खाली होत नव्हती व तो नीट पेटत नव्हता. कर्जतचा दुकानदार त्यांना दाद लागू देत नव्हता व म्हणून त्यांना कुलाब्याच्या (आताचा रायगड जिल्हा) जिल्हाधिकाऱ्याकडे आपले गाऱ्हाणे मांडायचे होते.

मी राजाभाऊंना म्हटले, की राजाभाऊ तुम्ही असे आंधळे, तेव्हा तुम्हाला दिवस काय आणि रात्र काय, सारखीच. तेव्हा हवा कशाला कंदील? तेव्हा ते म्हणाले, ""अरे, संध्याकाळी माझ्याकडे गावकरी येतात तेव्हा पडवीत उजेड नको का? म्हणून मला कंदील लागतो.'' मग त्यांनी फडताळात पोस्ट कार्ड कोठे ठेवली आहेत, कुठे पेन आहे हे बरोबर सांगितले. त्यांनी सांगितल्या बरहुकूम मी पत्र लिहिले व माझ्या परतीच्या प्रवासात ते कर्जतच्या पोस्टात टाकले.

पुन्हा सहा महिन्यांनी जांभिवलीस जाणे झाले, तेव्हा त्या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी काय कृती केली हे जाणून घ्यायला मी उत्सुक होतो. राजाभाऊंनी सांगितले, की पत्रानंतर दहा दिवसांतच कर्जतचा दुकानदार नवीन कंदील घेऊन आला होता व परत असे होणार नाही, असे म्हणून राजाभाऊंचे त्याने पाय धरले.

जांभिवली गावातील लोकही राजाभाऊंना भिऊन असत. म्हणजे रेशनचा दुकानदार साखर किंवा इतर धान्य दुकानात आले की पहिले राजाभाऊंना येऊन सांगत असे.
राजाभाऊंचा दिनक्रम ठरलेला असे. भल्या पहाटे उठून ते रहाटाने विहिरीतून पाणी काढत. दूधवाला आला की ते दूध स्टोव्हवर तापवत. पण त्यांचे दूध कधीही ऊतू जात नसे. साधारण दहाच्या दरम्यान ते डाळ व तांदळाची भांडी पाणी घालून सोलर कुकरच्या ट्रंकेसारख्या डब्यात ठेवत व तो सोलर कुकर बाहेर अंगणात आणत. दुपारी साधारण बारा वाजता त्यांचा वरण भात तयार झालेला असे. त्यांची थोडीफार भात शेती होती व कुळ ती लावीत होते. तेच त्यांचे निर्वाहाचे साधन होते.

संध्याकाळ झाली, की आपापली कामे आटपून गावकरी राजाभाऊंच्या पडवीत गोळा होत. मग कुणाला राजाभाऊंकडून भविष्य जाणून घ्यायचे असे. तो मग आपल्या पत्रिकेत कोणते ग्रह कोणत्या स्थानावर आहेत हे सांगे. तेवढ्या सांगण्यावरून राजाभाऊंच्या न दिसणाऱ्या डोळ्यांपुढे आख्खी कुंडली उभी राहत असावी. कारण ते फडाफड भविष्य सांगू लागत. कुणाला एखाद्या मंगलकार्यास मुहूर्त पाहिजे असे. शिवाय दिवसभर जगामध्ये कोठे काय घडले हे गावकऱ्यांना समजेल अशा भाषेत ते सांगत. कारण दिवसभर बीबीसीचे रेडिओ स्टेशन त्यांच्या कानाशी असे.

अशाच दरबारात मी एकदा बसलो होतो व त्या वेळी पूर्व युरोपातील बोस्निया हरझागोनिया प्रश्न बराच चिघळलेला होता. तेव्हा राजाभाऊंची परीक्षा घ्यावी म्हणून ही सगळी काय भानगड आहे, असा प्रश्न विचारला, तर त्यांनी अथपासून इतीपर्यंत, त्या दोन देशांच्या जन्मापासून ते सध्याच्या भांडणापर्यंत काय घडले हे इतके सविस्तर सांगितले, की मी त्यांची कुठून परीक्षा पाहू गेलो, असे मला झाले.
स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून, तसेच आपण आंधळे आहोत याचे अजिबात दुःख न करता आपला जगाला उपयोग कसा होईल, तसेच आंधळे असून आपण किती डोळस असू शकतो याचा राजाभाऊ म्हणजे वस्तुपाठ होते.

आज विज्ञानाने जगाला माहितीचा जणू सागरच बहाल केला आहे. आज हवी ती माहिती आपण इंटरनेटवरून काढू शकतो. पण एक वेळ अशी होती, की खेड्यामध्ये अशिक्षितपणा आणि अंधश्रद्धा होती. बाहेर काय चालले आहे हे माहीत नसे. त्या काळी राजाभाऊंसारखे लोक हे त्या लोकांना आशेचा किरण होते.

आज राजाभाऊ नाहीत, पण ज्या ज्या वेळी जातो त्या त्या वेळी त्याच्या पडझड झालेल्या घरात अजूनही राजाभाऊ आहेत आणि गावकऱ्यांना त्यांना पडलेल्या प्रश्नांची उकल करून सांगत आहेत, असे भासते. आता मला पडलेले प्रश्न मी "गुगल'ला विचारतो. पण एक वेळ अशी होती, की त्या प्रश्नाचे उत्तर राजाभाऊंकडे नक्की मिळेल याची मला खात्री होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: subhash natu write article in muktapeeth