सख्खे शेजारी

सुभाष नातू
गुरुवार, 12 जानेवारी 2017

तात्या आणि काकू दोघंही आयुष्यभर दुसऱ्याला देतच आली. एकाला आश्रमातल्या मुलांची काळजी तर, दुसऱ्याला शाळेतील मुलांची चिंता. दुसऱ्याविषयी निव्वळ प्रेम घेऊन जगले दोघेही. त्यापरते जणू त्यांना आयुष्य नव्हते.

जीवनात काही काही व्यक्ती अशा काही भेटतात, की त्यांच्याशी रक्तांचं नातं नसलं तरी जन्मजन्मांतरीच्या गाठी जुळतात. वसंतराव काणे व मालती काणे हे दोघे आमचे शेजारी होते. वसंतरावांना त्यांची मुलगी मीरा "तात्या' म्हणायची, म्हणून आम्हीही त्यांना तात्या म्हणायचो. मालतीबाईंना मात्र आमची मुलं आजी म्हणायची व आम्ही दोघं काकू म्हणायचो. तात्या काही वर्षांपूर्वी गेले. तर काकू नुकत्याच गेल्या व आमचा सख्खा शेजार हरपला. सतत दुसऱ्यासाठी काही तरी करत राहाणे हे त्या दोघांचे व्रत होते. तात्या कल्याण आश्रमासाठी निधी संकलनाचं काम करत. त्यामुळे आम्ही सुटीसाठी बहारिनहून आलो, की तात्यांचा मला पहिला प्रश्‍न ""कल्याण आश्रमासाठी कितीचा चेक देतोस, ते सांग.'' बाकी गप्पात त्यांना स्वारस्य नसे. काकू जात्याच शिक्षिका. त्यामुळे सोसायटीतील मुलांना किंवा कामवालींच्या मुलांना शिकवायला त्यांना आवडे. त्यांचा वैयक्तिक कामासाठीचा थोडा वेळ सोडला तर बाकी दिवसभर त्या सतत कामात असायच्या त्या दुसऱ्यांसाठी. दुसऱ्यांना आपली मदत व्हावी म्हणून त्या सतत व्यग्र असायच्या.

मुंबईहून निवृत्त होऊन आल्यावर त्यांच्या मुलीनं त्यांना स्वतंत्र राहण्याचा सल्ला दिला, तेव्हा काकूंना राग आला. पण नंतर त्यांना स्वतंत्रपणातलं सुख कळलं व त्या मीराला म्हणाल्याही, ""तू म्हणालीस म्हणून माझं मी आयुष्य जगू शकले.'' अर्थात "माझं आयुष्य' या शब्दातही दुसऱ्यांसाठी मोकळेपणानं करण्याचं स्वातंत्र्यच गुंतलेलं होतं.

आमची मुलगी पुण्यात शिकायला होती आणि आम्ही बहारिनला होतो. तेव्हा काकू तिला वरचेवर भेटायला जायच्या. पुढे ती घरी राहून नोकरी करू लागली, तेव्हा तिच्या सकाळी ऑफिसला जाण्यापासून रात्री ती घरी येईपर्यंत काकूंचं लक्ष असायचं. त्यामुळे आम्हाला इतकं दूर असूनही तिची काही काळजी नसे. तिच्या लग्नात तर काकूंना काय करू आणि काय नको असं होऊन गेलं.
वेगवेगळ्या आश्रमातील मुलं पुणे पाहायला यायची. तेव्हा दोघांचा उत्साह पाहण्यासारखा असे. पुढे पुढे तात्यांना वयोमानाप्रमाणे काम होईनासं झालं. निधी संकलनाची वणवण थांबवून ते पुण्यात आले व शेवटी वर्षभर तर अंथरुणावरच होते. काकूंनी त्यांची खूप सेवा केली व एक दिवस तात्या गेले. काकू एकट्या झाल्या. मग काकूंनी वेळ जावा म्हणून पुरणाच्या तसेच इतर प्रकारच्या पोळ्या करून द्यायला सुरवात केली. त्यांच्या या पोळ्या जगभर पोचल्या. अर्थात, यामध्ये धंद्याचा किंवा फायद्याचा भाग नव्हता. होतं ते दुसऱ्याविषयीचं निव्वळ प्रेम आणि त्यातच रमवलेलं मन.
पाच वर्षांपूर्वी मी निवृत्त होऊन पुण्याला परतलो. त्यानंतर काकूंचा संबंध रोज येऊ लागला. पोळ्या करणं काकूंनी आता सोडलं होतं. शरीर थकलं होतं. त्या शरीरानं काम तरी किती करायचं? सकाळी मी फिरून आलो की पहिली काकूंचीच भेट व्हायची. कारण काकूंनी त्यांचा दिंडी दरवाजा उघडला की रात्री झोपेपर्यंत तो उघडाच असे. टीव्हीचा ढणढणाट चालू व्हायचा आणि सोसायटीला दिवसभर जाग असायची. मग पत्नीबरोबर आज खायला काय, जेवायला काय, कोणते कार्यक्रम मिळून करायचे यावर खलबत व्हायची. दुपारी काकूंकडे पत्ते खेळायला बायका यायच्या. परत संध्याकाळी कट्ट्यावर सगळ्यांशी गप्पा, असा तो दिवसभराचा कार्यक्रम चालायचा.

नोव्हेंबरच्या सुरवातीस आम्ही जपान पाहायला गेलो आणि इकडे हिंडत्याफिरत्या काकू आजारी पडल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. मीरानं आम्हाला व्हॉट्‌स ऍपवर निरोप धाडला, "आई आजारी. परत आलात की लगेच हॉस्पिटलमध्ये या.' जपानमध्ये आता आम्हाला लक्ष लागेना. पुढचे दिवस काकूंच्या चिंतेतच गेले. तेथून परतलो, तसेच हॉस्पिटलमध्ये गेलो. आम्ही जाताना प्रकृतिमान ठीक असलेल्या काकू आता हॉस्पिटलमध्ये खाटेला खिळल्या होत्या. काकूंच्या नाकातोंडात नळ्या होत्या. अन्नासाठी, श्‍वासासाठी नळ्या. त्या नळ्यांचा त्यांना किती त्रास होत असेल हे कळत होतं. पण आम्हाला पाहताच त्या नळ्यांआडूनही त्यांचा चेहरा फुलला. त्यांना खूप आनंद झाला आहे, हे त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यांतही स्पष्ट दिसत होते. आमचे दोघांचेही हात त्यांनी हातात घेतले. धरून ठेवले बराचवेळ. जणू काही आमच्या येण्यासाठीच, आमचा निरोप घेण्यासाठीच त्या उंबरठ्याशी थांबल्या होत्या.

दुसऱ्याच दिवशी काकू गेल्या. आता त्यांच्या बंद दाराकडे पाहिलं की गेल्या इतक्‍या वर्षांच्या आठवणी उचंबळून येतात आणि सख्खा शेजार हरपल्याचं दुःख मनाला टोचणी लावतं.
दिंडीदरवाजा वाऱ्याबरोबर नुसताच हालत राहतो. कर्र कर्रर्र...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: subhash natu's article in saptarang