बयो

सुचेता पावसकर
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

जुन्या आठवणींसारखी बयो पायाशी अंग घासत राहते आणि ती चावेल दुखऱ्या आठवणीसारखी म्हणून मी हाकलते.

जुन्या आठवणींसारखी बयो पायाशी अंग घासत राहते आणि ती चावेल दुखऱ्या आठवणीसारखी म्हणून मी हाकलते.

"बयो.' आमच्या मांजरीचे नाव. सुनेने ठेवलेले हे जरा हटके असलेले नाव मलाही एकदम आवडले. आम्ही बंगला बांधला आणि एक मांजराचे पिलू यायला लागले. माझ्या सुनेने त्याला भांड्यात दूध दिले. दूध मिळतेय म्हटल्यावर रोज स्वयंपाक खोलीच्या बाहेरच्या पायरीवर बसू लागले. दिसामाशी वाढले. एकदा रस्त्यावरून बयो आली ती डोळ्याजवळ जखम घेऊन. त्यातून रक्त वाहत होते. माझ्या मुलाने प्राण्यांच्या दवाखान्यात बयोला उपचारासाठी पाठवले. साधारण दोन महिन्यांनी तिची जखम बरी झाल्यावर ती परतली. पण तिचा तो डोळा मात्र अधू झाला. तो डोळा वेगळा दिसू लागला. तेव्हापासून बयो दरवाजा उघडला की पटकन्‌ घरात येऊन सर्वत्र फिरू लागली. नंतर तर आराम खुर्चीवर आरामात झोपून जायची. मुलगा-सून दोघेही तिच्यावर प्रेम करू लागली.

एकदा कशी काय कोण जाणे ती सुनेला चावली. दुधाचे भांडे देताना तिचे दात लागले. त्या वेळी माझ्या मिस्टरांनी तिला काठीने मारले. सुनेने इंजेक्‍शने घेतली. माझ्या मिस्टरांनी मारल्यावर ती जी गायब झाली ती सहा महिने आमच्याकडे आलीच नाही. शेजारच्या बंगल्याच्या आवारात दिसायची. तिच्या मनात भीती बसली असावी. एकदा आमच्या गेटजवळ आली. सुनेने "बयो ये' म्हटल्यावर आली. हळूहळू पुन्हा ती येऊन बसू लागली. मधूनच दोन-तीन महिने गायब. गेले वर्षभर तिचा मुक्काम पुन्हा आमच्याकडेच आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत स्कूटरवर झोपते. सकाळी आळस देऊन उठते. पण माझ्या मिस्टरांचा आवाज ऐकला की धूम ठोकते. खिडकी उघडली की टुणकन उडी मारून आत येते आणि आराम खुर्चीवर झोपून जाते. मी बाहेरचा दरवाजा उघडला रे उघडला की स्कूटरवरून उडी मारून येते आणि पायाशी अंग घासत चालते. ती चावेल या भीतीने मी हाकलते तर माझ्या पुढे भालदार- चोपदारांप्रमाणे चालत राहते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sucheta pawaskar write article in muktapeeth