लंडनची कर्दळ

सुचेता पावसकर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

हॉलंडला टुलिपचा कंद मिळाला नाही. लंडनला बागेत टाकलेला कंद टुलिपचा असावा म्हणून उचलला, पण तो कर्दळीचा निघाला.

पूजा करताना केवळ लाल रंगाची म्हणून कर्दळीची फुले गणपतीच्या मुकुटावर खोचते. पूजा झाल्यावर गणपतीचं स्तोत्र म्हणत असताना मला सारखे जाणवते, की गणपतीच्या मस्तकावर विराजमान झालेले कर्दळीचे फूल मला म्हणते, की "बघ कशी जिरवली तुझी! तुला आवडत नाही ना मी! तू नाराजीनेच मला तोडतेस. पण गणपतीच्या डोक्‍यावर विराजमान होण्याचा मान मलाच मिळतो ना रोज!' माझे मन म्हणते, "खरे आहे रे बाबा तुझे. जन्माला येतानाच प्रत्येक जण आपले प्राक्तन घेऊनच आलेला असतो हेच खरे!'

माझ्या बागेतील ही कर्दळ "फॉरेन रिटर्न' आहे. त्याचे असे झाले, आम्ही दोघे काही वर्षांपूर्वी युरोप टूरला गेलो होतो. टूरचे शेवटचे ठिकाण लंडन होते. "यांच्या' ऑफिसातील एक सहकारी मैत्रिणही तेव्हा तिच्या लंडनच्या बहिणीकडे गेली होती. त्यामुळे आम्ही दोघी टूरबरोबर परत न येता तिच्याकडे आणखी चार दिवस राहिलो. ट्रेनने व पायीही फिरलो. लंडन ब्रिजवरून फिरलो. धुके व पाऊस असल्याने "लंडन आय'चा अनुभव घेता आला नाही. भारतात येण्याच्या आदल्या दिवशी आम्ही जवळच्याच एका बागेत फिरत होतो. सार्वजनिक बाग होती ती. माळ्याने नुकतीच खुरपणी केलेली होती. त्या मातीत मला एक कंद दिसला. मी उचलला. मला हॉलंडमध्ये टुलिपचे कंद विकतही कुठे मिळाले नव्हते. तो कंद उचलताना मी विचार केला, की हा टुलिपचा निघाला तर उत्तमच. घरी आल्यावर त्याला घराच्या दर्शनी भागात लावला. कंदाला कोंब येऊन पाने येऊ लागली, तेव्हा माझी निराशाच झाली. कारण ती कर्दळ होती. कर्दळ निदान मोठ्या पाकळ्यांची, वेगळ्या रंगाची असेल म्हणून वाढू दिली. पण फुले आली ती छोट्या पाकळ्यांची लाल रंगाची. एकदा कवयित्री मैत्रीण आली होती, तेव्हा दारातल्या त्या कर्दळीचे फूल पाहून म्हणाली, "किती लाल चुटूक रंग आहे ना!' माझ्या लक्षात आले, की प्रत्येक गोष्टीतले जे चांगले आहे, ते पाहिले पाहिजे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sucheta pawaskar write article in muktapeeth