नाते माणुसकीचे

सुधा सहस्त्रबुद्धे
बुधवार, 31 जानेवारी 2018

सामान्य माणसांना आपआपसात लढवून कुणीतरी स्वतःचा स्वार्थ साधत असतात. त्याचवेळी या लढायांपासून स्वतःला दूर ठेवत कुणी माणुसकीही जपत असतात. आपण कोणत्या बाजूने उभे राहणार हे प्रत्येकाने ठरवायचे असते.

सामान्य माणसांना आपआपसात लढवून कुणीतरी स्वतःचा स्वार्थ साधत असतात. त्याचवेळी या लढायांपासून स्वतःला दूर ठेवत कुणी माणुसकीही जपत असतात. आपण कोणत्या बाजूने उभे राहणार हे प्रत्येकाने ठरवायचे असते.

आज अगदी छोट्या-छोट्या कारणांवरून माणसे आपआपसात लढतात. देशाच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. हे पाहून मन कासावीस होते. बेचैनी वाढते. खरेच माणसापेक्षा त्यांचा "अहं' प्रबळ झाला आहे का?
खरे पाहिले तर, सामान्य माणसाला जात, धर्म यांच्या नावावर होणाऱ्या राजकारणापेक्षा स्वतःच्या पोटाची जास्त चिंता असते. पण कधी कधी प्रक्षोभक शब्दांना, भूलथापांना बळी पडून सामान्य माणूस द्वेषाच्या आगीत होरपळला जातो. सुरक्षित अंतरावरून काचेतून जळती काडी टाकणारे मूठभर धूर्त आरामशीर मजा मारत बघत बसतात. त्यांच्या भूलथापांना भुलून आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो हे लक्षातच येत नाही या भोळ्या सामान्य माणसाला. या सामान्य माणसातही माणुसकी जपणारी उदार हृदयाची माणसे भेटली की खूप आनंद होतो. असाच एक अनुभव.

माझे माहेर सोलापूर. पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर अशी धार्मिक तीर्थस्थळे आसपास. खरे तर या सगळ्याचा प्रभाव पडून सहिष्णुता वाढायला हवी. तशी ती आहेही. पण त्याहूनही अधिक हे शहर अतिशय संवेदनशील. कधी माणसात तेढ निर्माण होऊन ठिणगी पडेल हे सांगता येणार नाही. आमचे घर नव्या पेठेत मध्यवर्ती भागात. घरासमोर पीराचे थडगे आणि त्याची इमानइतबारे राखण करणारा तानाजी. शिंदे चौकाचा तो राखणदारच. कोणीही त्याच्या भरवशावर निर्धास्त असावे. आमच्या घराजवळच काळ्या मशिदीच्या मागे आईची मैत्रीण शालिनी कुलकर्णी राहात असे. पती निधनानंतर दोन मुले व एका मुलीची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारी अनुभवी व कुशल नर्स. स्वभावाने अतिशय प्रेमळ. साधी सरळ व परोपकारी स्वभावामुळे केवळ माणुसकीच्या नात्याने सर्वांच्या संकटकाळी धावून जाणारी. गर्भारपण, बाळंतपण अशावेळी आपणहून मदतीचा हात देऊन धावून जाणाऱ्या शालिनी मावशीला कधी कधी तिची दोन लहान मुले शेजाऱ्यांच्या भरवशावर सोडून दवाखान्यात जावे लागे. तिचा शेजार चांगला होता. सगळे त्या कुटुंबाला मदत करीत असत. त्यामुळे माझ्या आईला तिची व तिच्या कुटुंबाची फार काळजी वाटत नसे. सोलापुरात तिचे कुणी नातेवाईक नव्हते. त्यामुळे आईचा तिला आधार वाटे. दोन्ही मैत्रिणी दोन बहिणीसारख्या एकमेकींना होत्या.

पण एक प्रसंग कसोटी पाहणारा आला. 1970 चा प्रसंग असेल. सोलापुरात दोन दिवसांपासून दंगल, गोंधळ सुरू झाला होता. त्यामुळे शालिनी मावशीशी काहीच संपर्क नव्हता. रस्त्यावर सोडा वॉटरच्या बाटल्यांच्या काचेचा खच पडलेला होता. सर्वत्र कर्फ्यू लागू होता. घराबाहेर पडण्यास कोणासही परवानगी नव्हती. शालिनी मावशी व तिची मुले कशी असतील? कितपत त्रास झाला असेल त्यांना? काय व्यवस्था असेल? दोन दिवस कसे-बसे काढले. रात्र झाली होती. वडील "आरएमएस'मध्ये असल्याने मुंबईला लाईनवर गेले होते. आम्हालाही भीती वाटत होती. आमच्याकडेही कुणी मोठे नव्हते. एवढ्यात रात्री अकरा वाजता मागील दार कोणीतरी वाजविले. कोण असेल एवढ्या रात्री? तेही मागील दाराने आलेले? घाबरतच आईने दरवाजा उघडला. समोर काळोखात एकजण उभा. अंग, तोंड झाकलेले. ओळख पटू नये याची काळजी घेतलेली. आई दचकली. काळजात भीतीची लहर चमकून गेली तिच्या. कोण असेल? काय घडले असेल? काय घडणार आहे? तिच्या मनात अनेक शंकांनी एकाचवेळी तोंड वर काढले. एवढ्यात, अंगावर शाल पांघरून तोंडही झाकलेली ती व्यक्ती म्हणाली, ""बहेनजी, मत घबराना। मैं हुसेन। शालिनी दीदी का पडोसी हूँ। उनकी या उनके बच्चो की चिंता मत करना। वो हमारे घर में सुरक्षित है। आपको उसकी चिंता लग रही होगी इसलिये दीदीने मुझे भेजा है। दीदीने हमारी बहोत मदद की है। हम उनका बाल भी बाका नहीं होने देंगे। मेरी लडकी को उसने बच्चा होते वक्त बचाया है। जाता हूँ मैं... फिक्र मत करना।'' क्षणात वाऱ्याच्या वेगाने आला तसा तो गेला. त्या गल्लीतील शालिनीमावशीच्या सुरक्षिततेची आम्हाला भीती वाटत होती, तशीच कदाचित त्याला आमच्या गल्लीत भीती वाटत असावी.

त्याच्या त्या दोन वाक्‍यांनीही मनावरचे मणामणाचे ओझे उतरले होते. तरीही पापशंकी मन त्यावर विश्‍वास ठेवण्यास तयार नव्हते. केवळ जात-धर्मावरून अराजक माजविणाऱ्या लोकांची दुष्कृत्ये उफाळून आलेली असतानाच, माणुसकी जपणारा हा धागा पाहून मन भरून आले. जगाला ओरडून सांगावे वाटते... एकमेकांना जखमी करणे थांबवा. सामान्य माणसाला डोक्‍यावर छप्पर, भुकेपुरती भाकर व रात्री सुखाची झोप याखेरीच आणखी काय हवे? जगा आणि जगू द्या. माणुसकीचा झरा खळाळत ठेवण्यातच समाज सुखी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudha sahasrabudhe write article in muktapeeth