आईचे थालिपीठ

सुजाता सुभाष कुलकर्णी
शनिवार, 30 जून 2018

आईचे उपवासाचे थालिपीठ खुसखुशीत असायचे. तिच्या ताटातला दही लावलेला नितकोर "कुंतीघास' अजून आठवतो. तिच्या साध्या साध्या कृतीतूनच संस्कार होत गेले.

आईचे उपवासाचे थालिपीठ खुसखुशीत असायचे. तिच्या ताटातला दही लावलेला नितकोर "कुंतीघास' अजून आठवतो. तिच्या साध्या साध्या कृतीतूनच संस्कार होत गेले.

रविवारी माझ्या आईचा खंडोबाचा उपवास असायचा. खंडोबा माझ्या माहेरचे निरगुडकरांचे कुलदैवत. आम्ही दोन बहिणी, एक छोटा भाऊ. आम्हा भावंडांची संध्याकाळी साडेआठला जेवणे होत. मग माझे वडील व आई बसत. आई रविवारी संध्याकाळी उपवासाला साबुदाण्याचे थालिपीठ करीत असे. साबुदाणा भिजवून त्यात तिखट, मीठ, दाण्याचे कूट, कोथिंबीर घालणे. हे तिचे थालिपीठ थोडे खुसखुशीत असे. आई आम्हा तिन्ही भावंडांना थालिपीठ खायच्या अगोदर हाक मारी व थालिपिठाचे नितकोर तुकडे दही लावून देत असे. तिच्या ताटातील तो "कुंतीघास' मी अजूनही आठवते. कुंती पांडवांना नेहमी पहिला घास भरवायची, म्हणून त्यास "कुंतीघास' म्हणतात.

जेजुरी जवळील वाल्मीकी ऋषींच्या वाल्हे या छोट्याशा खेड्यातील मांडके घराण्यात तिचा जन्म. अकरा भावंडांतील ती सर्वांत मोठी. माहेरी तिला सर्वजण "माई' म्हणत. माझ्या आजोबांचे घर खूपच मोठे होते. प्रथम सुरवातीला प्रशस्त अंगण. वीस मुले अंगणात सहज खेळू शकतील. ओसरी, माजघर, माजघरात देवघर, देवघरात परत लाकडी मोठे देवघर. त्यात विठोबा-रुक्‍मिणीच्या मोठ्या मूर्ती. ओसरी-माजघरामधून एक जीना वर जाई. तिथे खूप सामान. तसेच माजघरात एका भिंतीला धान्याची पोती. स्वयंपाकघरातील चुलीना अर्ध्या भिंतींचा आडोसा. मागच्या बाजूला अंगण. अंगणात कर्दळी. आड विहीर-रहाट. त्या अंगणात सर्वत्र जाती टाकलेली असत. म्हणजे पायाला चिखल लागत नसे. शेजारी काकांचे घर. त्याच्या घरी जायला आडाकडून एक छोटा दरवाजा.

आजीने सांजा खायला केल्यावर ती तो कर्दळीच्या पानावर देत असे. मला फार आवडायचा. कारण पुण्यातल्या बशीतल्या सांज्यापेक्षा तो चवदार वाटे. पुढच्या अंगणात मेंदीचे झाड. मेंदीची पाने काढून पाटऱ्यावर वाटायची व हाताला फासायची.
आजोबांची आई म्हणजे माझी पणजी होती. आलवण नेसलेली. डोक्‍यावरून पदर, वाकलेली, अंगावर खूप सुरकुत्या व खूप सोवळे पाळणारी. तिच्या हाताच्या सुरकुत्यांचा स्पर्श मला फार आवडायचा. वाल्ह्याला गेले की मी पणजीच्या कुशीत शिरून तो स्पर्श भरून घेत असे. माझ्यात तिला तिचे कोवळेपण दिसत असेल का?
माझी आजी (ताई) सतत चुलीपुढे बसून स्वयंपाकात गढलेली. शांत स्वभावाची. तिच्या हातची शंकरपाळी व कडबोळी जाडसर व वीतभर लांब असायची. तशी मी अजून कुठेच पाहिली नाहीत. गावात वीज नव्हती, त्यामुळे संध्याकाळी कंदील, चिमण्या राखेने घासून स्वच्छ करणे हे तीच करत असे. रात्री सर्वत्र अंधार, देवघरात समई तेवते, इतरत्र कंदील, चिमण्या लागलेल्या. खरेच अशा वातावरणात एक सुंदर शांतता असते. माणूस पटकन निद्रेच्या अधीन होतो.

माझे आजोबा शिक्षक होते. त्यांची शेतीही होती. मळ्यात ते दिवसातून दोनदा जात. संध्याकाळी देवापुढे भजने म्हणत. माझे मामा, मावशी अतिशय प्रेमळ. आनंदी, विनोदी आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही खूप खेळलो. माझी आई माहेरची "कुसुम.' लग्नानंतर "मंगला बाळकृष्ण निरगुडकर' झाली. पुण्यात आली. शिक्षकाची पत्नी झाली. इंग्रजी शिकलेला तिला नवरा हवा होता. तो मिळाला. आमच्या घरी सतत नातेवाईक येत असत. आजोबा दर महिन्याला पेन्शन नेण्यासाठी आमच्या घरी येत. एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी जात. माझ्या आईबरोबर पत्ते खेळत. बहुतेक ते लेकीची करमणूक करीत असतील. आजी दर महिन्याला नारळ बर्फी पाठवे. काही मामा, मावशी यांची लग्ने, गृहयज्ञ, मुंजी आमच्या घरी झाल्या. संपूर्ण वाडा लग्नघर असे. माझे आत्येभाऊ शिक्षणासाठी, नोकरीसाठी कराडहून आमच्या घरी येत. आईने या सर्वांच्यात स्वतःचा संसार केला. या सर्वांच्या प्रेमात आम्ही भावंडे मोठी झालो. माझी आत्येभावंडे "आमची मामी' म्हणून सतत माझ्या आईची अजूनही आठवण काढतात. ही भावंडे सत्तरीच्या पुढे आहेत.

माझी आई अत्यंत प्रेमळ व स्वाभिमानी होती. वडील बी.ए.बी.टी. तर आई सातवीपर्यंत शिकलेली. पण दोघांचे बौद्धिक जुळत होते. आईचा हात सुगरणीचा सढळ होता. दिसायला देखणी, लांब केसाच्या एक वेणीचा अंबाडा, नऊवारी साडी, दोन्ही खांद्यांवरून पदर, लग्नकार्यात नथ, दागिने घातल्यावर लक्ष्मीसारखी दिसे. समाजातील, काही चुकीचे तिला कळले तर आम्हां मुलांसमोर ते ती कधीच बोलत नसे. "निंदा' हा शब्द तिच्या शब्दकोशात नव्हता. कान, जीभ, डोळे नेहमी आवरते घ्यावे असे तिचे म्हणणे. तिच्याइतके जमले नाही, पण आम्हीही तसा प्रयत्न केला. किंबहुना, अनावर झाले की आई आठवून आवर घातला जातो.

नकळत रविवारी थालिपीठ लावले गेले आणि आईच्या थालिपिठाची चव जिभेवर पसरली. इतकेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sujata kulkarni write article in muktapeeth