प्राजक्ताचा सडा अन्‌ साठवणी

सुजाता लेले
मंगळवार, 17 जानेवारी 2017

पारिजातकाच्या फुलांचा सडा पहाटवेळ प्रसन्न करून गेला. वाऱ्याबरोबर केवळ गंधच आला नाही, तर मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या आठवणीही लहरत आल्या. ओंजळीत निव्वळ फुलंच जमा झाली नाहीत, तर आठवणींचीही साठवण झाली.

पारिजातकाच्या फुलांचा सडा पहाटवेळ प्रसन्न करून गेला. वाऱ्याबरोबर केवळ गंधच आला नाही, तर मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या आठवणीही लहरत आल्या. ओंजळीत निव्वळ फुलंच जमा झाली नाहीत, तर आठवणींचीही साठवण झाली.

वर्तक बागेमधून सकाळी फिरायला जाताना तिथे असलेल्या पारिजातकाच्या झाडाच्या फुलांच्या मंद सुवासाने पावले थबकतात... हा सुगंध आजचा दिवस ‘प्रसन्न’ जाणार आहे, असा नकळत सूतोवाच करून जातो. निसर्ग हाच आपला देव आहे, असे मानले तर देवाचिया द्वारी उभा क्षणभरी... खरंच किती तथ्य आहे या ओळींमध्ये! कारण रोज प्रत्येकाने निसर्गाच्या दारात क्षणभर उभे राहून तो न्याहाळला ना... तर खूप काही रोज नवीन अनुभवायला मिळते. सुगंधी फुलांपाशी क्षणभर उभे राहून तो सुगंध साठवून ठेवायचा. मन प्रसन्न करायचे...

मग बनावट सुवासाची गरज काय? या फुलांचा सडा बघत असताना मला माझी मैत्रीण भेटली व म्हणाली, ‘‘अगं आजीने पारिजातकाच्या फुलांचा लक्ष वाहण्याचा नेम केला आहे.’’

हे ऐकून मी हसले, ते पाहून ती म्हणाली, ‘‘आज जग कुठे गेले आहे आणि आजीचे काय चाललेय... म्हणून हसलीस का?’’ मी म्हणाले, ‘‘अगं, आज सिमेंटच्या जंगलामध्ये झाडे दिसणं मुश्‍कील झालेय, त्यातून पारिजातक, बकुळ यासारखी झाडे दिसणं तर आणखीनच दुर्मिळ! म्हणून मी हसले, बरं जाऊ देत, जशी मिळतील तशी देईन मी फुले तुझ्या आजीला!’’

बागेत फेऱ्या मारून मी घरी आले. चहाचा घोट घेता... घेता डोळ्यासमोर ‘सकाळ’ वाचायला म्हणून घेतला.. पण मन मात्र लहानपण घालविलेल्या पेंडसे चाळीत हरवून गेले. नवी व जुनी चाळ मिळून साधारणपणे तीस-पस्तीस बिऱ्हाडकरूंचे एक मोठे कुटुंबच राहत होते. चाळीमध्ये नारळाचे उंच झाड, एक पारिजातकाचे व एक पेरूचे झाड अशी तीन मोठी झाडे होती.

तळमजल्यावरच्या बिऱ्हाडकरूंनी त्यांच्या समोरच्या अंगणात गुलबक्षी, तुळस, कर्दळ यासारखी छोटी-छोटी झाडे लावली होती. शिवाय सडा शिंपून रांगोळीही काढली जाई. बाकीचे अंगण खेळायला मोकळे होते...आता हे सारे सरले! 

पहाटे-पहाटे पारिजातकाच्या फुलांचा सडा अंगणात पडत असे तेव्हा चाळीतल्या आजी फुले वेचायला येत असत. फुले वेचता वेचता प्रत्येक घरातील इत्थंभूत बातम्यांची देवाणघेवाण होत असे, त्यामुळे दूरचित्रवाणीची गरजच पडली नाही. आजच्या लोकप्रिय व्हॉट्‌सॲपप्रमाणे या बातम्यांची देवाणघेवाण देवळातून, भाजी आणताना कथा-कीर्तन ऐकताना, पारावर शेअर केली जात असे म्हणजे त्या वेळी अशा प्रकारचे दूरचित्रवाणी व मोबाईल होते. लाइव्ह कार्यक्रम असत. त्या वेळी इतक्‍या पहाटे कारणांशिवाय उठणाऱ्यातले आम्ही नव्हतो. आम्ही नंतर फुले वेचायला जायचो, झाड जरासे हलविले, की उरलेल्या फुलांचा सडा आमच्या अंगावरून पडतानाच मातीशी नतमस्तक व्हायचा असेच वाटायचे. तो सुवास प्रसन्न करून ओघळायचा! खाली पडलेली फुले अहंकार गळून धरणीमातेला शरण गेल्यासारखी दिसत! या निसर्ग-लेकरांकडून केवढे तरी घेण्यासारखे आहे; पण आपण बुद्धिजीवी असल्यामुळे सर्व सृष्टीवर आपलाच हक्क
आहे, असे समजून या सृष्टीच्या कुशीतल्या बाळांना उखडून टाकत आहोत, चैनीपोटी आणि पैशाच्या हव्यासापोटी सिमेंटची जंगले तयार करत आहोत... त्यामुळेच फुलांचा सडा बघायला मिळतो का? आता वाडे-चाळीही गेल्या, मग या झाडांनी आपला हक्क कुठे शोधायचा? कारण त्यांची जागा आता पार्किंगने घेतली आहे.

मला आठवते, माझ्या शाळेतल्या मैत्रिणीची आजी, पारिजातकाची पाने गरम करून गुडघे शेकत होती. ते पाहून मी म्हणाले, ‘‘काय करतेस गं, आजी?’’ ती म्हणाली, ‘‘अगं सांधे दुखायला लागले की या पानांनी शेकते. बरे वाटतं गं!’’ एवढ्या-तेवढ्या आजाराला घरगुती औषधे बरी पडतात; पण आता बहुतांशी झाडे-झुडपे, वेली उखडल्यामुळे आजीबाईचा बटवाही
रिताच झालाय जणू!

लहानपणी या झाडाच्या किंवा बिट्टीच्या झाडांच्या बिया घेऊन खेळायचो... आता सारे सरले! उरला फक्त फुलांचा सडा आणि त्यांचा मंद सुवास!

या फुलांचा रंग पांढरा अन्‌ देठ किंचित केशरी - भगव्याकडे झुकतो आहे. ती मातीवर नतमस्तक झालेली पाहिली, की असे वाटायचे... जणू शुचिर्भूत होऊन, पांढरे वस्त्र परिधान करून कपाळावर भगवे-केशरी गंध लावून ऋषी-मुनी धारणेला बसले आहेत की काय? अशी झाडे जपलीत तर त्यांचे सौंदर्य व त्यांचे औषधी गुणधर्म जपले जातील म्हणजे त्यांनी आपल्यासाठी भावी आयुष्य उत्तम जगता यावे म्हणून केवढी तरतूद करून ठेवली आहे. आधुनिकतेपायी आपण मात्र हे सौंदर्य नष्ट करू लागलो आहोत. अपवाद असतीलच. वर्णन करावे तेवढे कमीच आहे... पण या फुलांची ‘कमी’ आहे हे मात्र सत्य आहे.

Web Title: sujata lele article mukatpeeth