...अन्‌ स्वयंपाक बिघडला! (सुजाता लेले)

सुजाता लेले
गुरुवार, 28 जून 2018

स्वयंपाक बिघडायला फोनची किंवा दारावरची बेल कारणीभूत असते, हे समस्त सुगरणी सांगतील; पण त्याबरोबरच खिडकीत बसून शीळ घालणाऱ्या पक्ष्यांमुळेही स्वयंपाक बिघडू शकतो, बरं का!

स्वयंपाक बिघडायला फोनची किंवा दारावरची बेल कारणीभूत असते, हे समस्त सुगरणी सांगतील; पण त्याबरोबरच खिडकीत बसून शीळ घालणाऱ्या पक्ष्यांमुळेही स्वयंपाक बिघडू शकतो, बरं का!

स्वयंपाक घरामध्ये एखाद दिवशी सकाळी सकाळी दूध ऊतू जाण्यापासून ते पदार्थ करण्यापर्यंत सारेच बिघडते. त्यादिवशी डाळ-मेथ्याची उसळ करण्याचे ठरविले होते. गॅस बारीक करून डाळ-मेथ्या मंद भाजायला ठेवल्या. एकीकडे विरजण लावण्यासाठी म्हणून दूध कोमट करायला दुधाचे पातेले दुसऱ्या गॅसवर ठेवले... अन्‌ बेल वाजली. घड्याळाकडे बघत म्हटले, दूधवाला दादा आला असेल म्हणून दुधाचे पातेले घेऊन दार उघडले, तर केर टाकणारी मावशी. तिला केर दिला अन्‌ दार लावून घेतले... एवढ्या वेळात डाळ-मेथ्यांनी डाव साधला. तळाला खरपूस झाल्या. गॅस बंद केला आणि डाळ-मेथ्यांवर पहिले पाणी घातले... जरा वेळ त्या भिजायला ठेवल्या, तर इकडे दूध थोडे जास्तीच तापले. तेही उतरवले आणि दही लावायच्या भांड्यात वरखाली केले. स्वयंपाकाची घाई होतीच. त्यामुळे घाई-घाईत दूध घातलेले भांडे कॅसेरोलमध्ये ठेवून दिले.

आज जेवणाच्या डब्यामध्ये नक्की डाळ-मेथ्याची उसळच असणार अशी खात्री बाळगून माझे मिस्टर खेळून घरी आल्यावर म्हणाले, ""आज डब्यात डाळ-मेथ्यांची उसळ आहे ना? अगदी पार्किंगमध्ये वास येतोय.'' मी "हो' म्हणाले खरी; पण काय वाटले कोणास ठाऊक? मी चष्मा लावला अन्‌ डाळ-मेथ्यांवर नजर फिरवली. बघते तर काय. काही लब्बाड मेथ्या अन्‌ डाळीचे काही दाणे खरपूसच्याही पलीकडले काळे कुट्ट झाले होते. त्या करपलेल्या डाळ-मेथ्या बाजूला काढायचा एक व्यापच झाला होता! मग पुन्हा मोठा गॅस करून त्यात भरपूर पाणी घालून शिजवायला ठेवल्या. पुन्हा बेल वाजली. आता दूधवाला दादाच आला होता. त्याला दुधाचे बिलही दिले. तेवढ्या वेळात पाणी आटले आणि डाळमेथ्या तळाला लागायला लागल्या होत्या. हे पाहून माझी सटकलीच (सिंघम सारखी)... त्यांच्याकडे बघत म्हणाले, इतकी वर्षे संसार केलाय... आणतेच तुम्हाला वठणीवर, असे म्हणत त्यांना दुसऱ्या पातेल्यात "शिफ्ट' केले... आणि बोटचेपी झाल्यावर भरपूर लसणाची खमंग फोडणी त्यावर घातली अन्‌ भरपूर कोथिंबीर पण! हा खटाटोप कशाकरता? हे सूज्ञ गृहिणींना सांगायला हवे का?
जेवताना या उसळीचा पहिला घास घेतला... मेथ्या आधीच कडवट, त्यात काही जणींनी स्वतःला करपून घेतल्यामुळे कडवट चव लागत होती; पण मी आपणहून मिस्टरांना फोन केला नाही. त्याचं काय होतं, भिशीला किंवा सणा-वाराला सवाष्ण म्हणून जेवायला जायचं असतं. अन्‌ याच दिवशी स्वयंपाक बिघडतो. मग आमच्या पंतांचा हसत हसत फोन येतो, "आज तुला जेवायला कुठे जायचे होते का?' तेवढ्यात फोन खणखणलाच! पंत म्हणाले, ""आज भरपूर लसूण-कोथिंबीर घालूनसुद्धा उसळ खमंग आणि खरपूस चवीच्या पुढची झाली आहे... चक्क तुला कुठेही जायचे नसूनसुद्धा!' अर्थात हसत-हसतच बोलणे चालू होते; पण मला मात्र "टोमणा' वाटला. चूक झाली होती, ती कबूल करण्यापेक्षा "वाद' न घालता, काही न बोलता मी फोन ठेवून दिला. कडवट चव जाण्यासाठी म्हणून दही घ्यायला गेले तर दही विरजलेच गेले नव्हते... विरजण न लावताच नुसतेच दुधाचे भांडे कॅसेरोलमध्ये ठेवले होते ना!.. पण हे सर्व बिघडायला माझी चूक नव्हतीच! म्हणजे बघा ना... पोळी तव्यावर असली की बेल वाजते. दार उघडेपर्यंत इकडे पोळी जळते... कडक... वातट.. होते. म्हणजेच स्वयंपाक बिघडायला आपण कारणीभूत नसतो.

माझा स्वयंपाक कधी-कधी बिघडायला आणखीन एक कारण म्हणजे आमच्या खिडक्‍यांवर येणारे पक्षी! स्वयंपाक करताना माझे कान त्यांची किलबिल ऐकू येतीय का, इकडे असतात. त्यांची शीळ ऐकू आली, की मी हातातले काम टाकून बघायला जाते. मागच्या वर्षी हॅगिंग कुंडीमध्ये लालगाल्या बुलबुल जोडीने घरटे केले होते, तर पावसाळ्यात दरवर्षी मुनियांच्या तीन-चार जोड्या तरी कुंड्यांमधील झाडांवर घरटे करतात. यांच्याशिवाय सूर्यपक्षी, टेलर बर्ड, लालबुड्या बुलबुल, चिमण्या, ग्रेट टिट हे येतातच, पण कधी कधी कोकिळासुद्धा ग्रीलमधून येण्याचा प्रयत्न करते. हे बघायला मला फार आवडते; पण या पक्ष्यांची यायची, स्वयंपाक करण्याची आणि दारावरची बेल वाजायची वेळ एकच असते. हीच वेळ साधत माझे मिस्टर कडक पोळीकडे बघत असतात.

स्वयंपाक करताना पक्षी बघण्याचा छंद चालूच ठेवणार आहे. म्हणून खिडक्‍यांतून कुंड्यांमध्ये झाडे लावली आहेत. पक्ष्यांनी इथे येऊन घरटी करावीत. झाडावरचे किडे-मकोडे खावेत. उन्हाळ्यात त्यांच्यासाठी पाणीही ठेवते... असे त्यांचे स्वागत करताना कधीतरी स्वयंपाक बिघडला तरी चालेल... आताही समोरच्या तारेवर वेडा राघू (बी-ईटर) बसलाय, तो पटकन बघून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sujata lele write article in muktapeeth